October 13, 2009

फटाके

काल परवापासून आजूबाजूला फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले आहेत. दिवाळी म्हणजे फटाके हे समीकरण जुने आहे. किती जुने हे माहीत नाही.

आवाजाचे फटाके वाजविणे या गोष्टीतील ’मजा’ मला समजण्याच्या पलिकडची आहे. शोभेची दारू - भुईनळे, भुईचक्र, आकाशातले बाण येथपासून नागगोळीपर्यंत - हे प्रकार पाहण्यातला आनंद मी समजू शकतो. या फटाक्यांमधून बनणा-या रचना - पॅटर्न्स - डोळ्यांना सुखावणा-या असतात. नवनिर्मितीला वाव असतो. परंतु आवाजाचे फटाके - ऍटमबॉंब, लक्ष्मी, आपटबार, लवंगी, आणि सर्वात कळस म्हणजे माळा (हजाराच्या का कितीच्या असतात कोण जाणे) - उडविण्यात काय आनंद आहे ? कानठळ्या बसविणारा आवाज, ज्यात ना सूर न लय न ताल. कान बधीर करणे, दचकविणे असे त्रास सोडता या आवाजाचा कोणत्या माणसावर ’चांगला’ परिणाम झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही ! या आवाजांचा कानांवर दुष्परिणाम होतो हे तज्ज्ञ लोक मुलाखती/ लेखांमधून वारंवार सांगत असतात. हे फटाके उडवून आपण काय साध्य वा सिद्ध करतो ? ’आपल्याला मोठा आवाज करता येतो’ हे ? मग पत्रावर हातोडा आपटत बसा, येईल मोठा आवाज ! का आपण किती पैशाचा धूर करतो याचा माज !

रस्त्यावर कचरा फेकणे हा गुन्हा (कागदोपत्री!) आहे, पण फटाक्यांचा कचरा याला अपवाद कसा ठरतो कुणास ठाऊक ! नरकचतुर्दशीची सकाळ आणि लक्ष्मीपूजनाची संध्याकाळ रस्त्यावर बाहेर पडलं तर काय दिसतं ? फटाक्यांच्या कागदांचा रस्त्यांवर पडलेला खच, जळलेल्या दारूचा उग्र दर्प आणि आसमंत कोदून टाकणारा धूर. ’नरका’चीच झलक असावी बहुतेक.

शोभेच्या दारूकामामुळे जरी ध्वनिप्रदूषण फारसं होत नसलं तरी हवा तर प्रदूषित होतेच. मग हे शोभेचं दारूकाम कमी केलं तर कुठे बिघडलं ? परदेशामधे करतात तसं एखाद्या पटांगणात एकत्र जमून सामुदायिक रित्या याचा आनंद लुटता येईल. अधिक मोठ्या प्रमाणात ! बाणाला काडी आपण लावली वा दुस-या कुणी, शोभा तर सर्वांनाच पहायला मिळते न ?


जनावरांपेक्षा माणसाला वेगळं काढणा-या ज्या बाबी आहेत, त्यांतील एक अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ’विचार करण्याची क्षमता’. आपण एखादी कृती करतो ती ’का करत आहोत’ याचा विचार न करता केलेली कृती आपल्याला माणूसपणापासून दूर नेते असं नाही वाटत ?

1 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

Atishay yogya lekh ahe. Junya parampara apan follow karto pan khup kami vela tya ashya ka hyacha shodh ghyacha prayatna karto. Fatake vajavna vait ahe ase sagle mhantat pan tumhi apan te mulatach ka vajavta ha mandlela angle khup avadla...Aso tumhala diwali chya hardik shubecha!!!

16.10.09  

Post a Comment

<< Home