December 15, 2005

शाप आणि वरदान

खरं तर मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना 'अमुक अमुक' 'शाप की वरदान' अशा विषयांची सवय असते. उदा. 'दूरदर्शन शाप की वरदान' (दूरदर्शन - मी ज्याचे दुरूनही दर्शन घेत नाही ते. हा कुठला समास ? बहुधा मध्यम-पदलोपी असेल !) किंवा 'विज्ञान शाप की वरदान'. (या विषयावर दोन्ही बाजूने तावातावाने निबंध लिहिणारे बरेच लोक पुढे विज्ञान शाखेला जातात. पोटाची खळगी भरायला लागते ना !! ) असो. पण 'शाप आणि वरदान' हाच निबंधाचा विषय म्हणून तसा नवा आहे...

ज्येष्ठ विचारवंत पामर (सगळे विचारवंत ज्येष्ठच कसे असतात ? 'कनिष्ठ विचारवंत' असा शब्दप्रयोग मी तरी अजून ऐकला नाहीये !) यांच्या मते हल्ली शाप तर बरेच ऐकू येतात पण वर देण्याची प्रथा जवळपास बंद झाली आहे. (परिचय - पामर - मराठी तसेच संस्कृत साहित्य आणि अध्यात्मवाङ्मयाचे गाढे अभ्यासक आणि व्यासंगी विश्लेषक. पाहा : http://paamar.blogspot.com ).

वर आणि शापांखेरीज पुराणांमधील कुठलीच कथा पूर्ण होणार नाही इतके त्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. संस्कृत साहित्यातील उपमा-रूपक-उत्प्रेक्षा अलंकाराच्या वापराच्या धर्तीवर सांगायचे झाले तर,
पुराण कथा हेच जणू मानवी शरीर आहे, आणि शाप आणि वर ह्या त्यातील नीला आणि रोहिणी आहेत. अथवा
पुराण कथा हीच जणू इमारत आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील बीम्स आणि पिलर्स आहेत. अथवा
पुराण कथा हेच जणू टायट्रेशन आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील ब्युरेट आणि पिपेट आहेत. अथवा
पुराण कथा हेच जणू स्टॉक मार्केट आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील गेन-लॉस आहेत (स्टॉपलॉस हा उ:शाप आहे!). अथवा
पुराण कथा हेच जणू सॉफ्टवेअर आहे, आणि शाप आणि वर हे त्यातील Infrastructure Framework Components आहेत. अथवा
पुराण कथा हीच जणू सुंदर स्त्री आहे, आणि
छे छे, तसले काही नाही !!
पुराण कथा हीच जणू सुंदर स्त्री आहे, आणि शाप आणि वर हे तिचे राग - लोभ आहेत.

बस!! बस!!
कसे आहे, एकच गोष्ट चार वेळा जरा फिरवून फिरवून सांगितली की मनावर ठसते. विलायतेत यालाच हल्ली 'Spaced Repetition' म्हणतात. आपल्याकडे हे सगळे ज्ञान आधीपासूनच होते ! What say you ?

पण संस्कृत साहित्यिकांस अशी 'चार वाक्यांत' सांगायची गोष्ट 'चाळीस श्लोकांची' लांबड लावून सांगायची सवय का लागली असेल यावर सखोल चिंतन केल्यावर मला अशी शक्यता दिसली की पुणे युनिवर्सिटी प्रमाणे नालंदा आणि तक्षशिला विद्यापीठातील पेपर तपासनीस सुद्धा उत्तरांची लांबी पाहून गुण देत असावेत. असो. प्राचीन भारतबर्षातील परीक्षापद्धती हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे.

वर देण्याचे काम शक्यतो देवांकडे असायचे. विशेष करून ब्रह्मदेव आणि शंकर उदार हस्ते (आणि विष्णूच्या जिवावर परस्पर उदार होऊन! ) मोठे मोठे वर देऊन टाकत. हो, नंतर बहुतेक करून विष्णूलाच निस्तरायला लागायचे ते प्रकरण ! नाही म्हणायला माणसे सुद्धा आपल्या-आपल्यात वर द्यायची. उदा. मत्स्यगंधेशी विवाह झाल्याच्या खुशीत शंतनूने भीष्माला इच्छामरणाचा वर दिला, तोसुद्धा न मागता ! दशरथाने कैकयीला वर दिला होता, ज्याचा उल्लेख पुढे आहे.

वर मागणा-यांमधे दैत्यांचा क्रमांक फार वरचा लागतो. आणि त्यांपैकी जवळपास बहुतेकांना अमर होण्यासाठीच वर हवे असायचे. बरोबर आहे, अमृत हातचे गेल्यावर ते तरी काय करतील ! बहुतेक त्यांना कोडं-कोडं खेळायला आवडत असेल. कारण ब्रह्मदेवाने 'अमर होता येणार नाही' असे खडसावून सांगितल्यावर ते वेगवेगळ्या युक्त्या काढायचे - मानवाच्या/देवाच्या अथवा पशूच्या हस्ते मरण नको, दिवसा आणि रात्री मरण नको, आकाशात किंवा जमिनीवर मरण नको इ !! मग विष्णूला त्यांची 'सिस्टीम हॅक करायला' काहीतरी सवाई युक्ती करायला लागे ! मला समजत नाही, वर्षानुवर्षे जगून त्यांना करायचे तरी काय होते ! 'आयुष्य व्यर्थ आहे' यावर त्यांचा विश्वास नसावा.

यात फसवाफसवी पण चालायची. बिचारा कुंभकर्ण - इंद्रपद मागायला गेला, आणि तेवढ्यात त्याच्या जिभेवर म्हणे देवी जाऊन बसली ! मग जीभ जड होऊन तो 'इंद्र'पदाच्या ऐवजी 'निद्रा'पद म्हणाला आणि सत्यानाश झाला !

शापाच्या जोडीला उ:शाप आल्याने परिस्थिती अगदीच हाताबाहेर नव्हती! वर देणारे बरेच असतील पण शाप देणा-यांमधे दुर्वास मुनींचा हात धरणारे कोणीही नाही ! त्यांच्या शापाच्या तडाख्यातून भले भले सुद्धा सुटले नाहीत ! आणि त्यांनी कुणाला उ:शाप दिल्याचेही मी ऐकले नाहीये !

काही वेळेला वर आणि शाप देण्याच्या भानगडीत भलत्यावरच अन्याय व्हायचा ! दशरथाने कैकेयीला दोन वर दिले. तिने चतुराईने सांगितले की मी मला हवे तेव्हा हे वर वापरीन, (हल्ली सॉफ्ट्वेअर मधे याला 'लेट बाइंडिंग' म्हणतात!) आणि वर मागताना परस्पर रामाला वनवासात पाठवले !

हुश्श ! बरेच मोठे आख्यान झाले !
माझी खात्री आहे, आतापावेतो तुम्ही 'ब्लॉग- शाप की वरदान' या विषयावर विचार सुरू केला असेल !

7 Comments:

Anonymous Nandan उवाच ...

छान लेख, पामर. शाळेतल्या निबंधांची पुन्हा आठवण झाली.

- नंदन

16.12.05  
Anonymous Akira उवाच ...

"Gela Paamar kuNikade?" asa mhanaychi paaLi aali hoti.......aso...good to have you writing again..

19.12.05  
Anonymous Kaustubh उवाच ...

"Jyeshtha vichaarvant" pramaanech mala padalela prashna mhanaje "dukkhad nidhan". Ajun paryant tari mi "Sukhad Nidhan" asa shabd-prayog aikalela/vachalela nahi. Bahutek mi melyavar maaze asankhya "chaahate" "Sukhad Nidhan" ase paper madhe chhapoon aanatil...(mhanaje mala te vachata yenaar nahich -:() anakhi sutakecha nishwaas taakatil...ajun ek prashna..."Nishwaas" kinva "Uchchhvaas" ha nehemi sodayachaach asato, mag parat "uchchvaas sodala" ase ka mhanataat? Aso.
Tyaach pramaane mazya baal-manala padaleli ajun ek shanka...Ramayan Mahabhaarat yaat "Jyeshtha rushi" hyanna nehemi pandhari daadhi ani paandhari mishi asate, ani "Kanishtha rushi" yanna matra kaali daadhi ani kaali mishi ha protocol koni ani ka tharavala?

(Adhik mahiti saathi bheta agar liha....kaustubh_agashe@yahoo.co.uk-:))

23.12.05  
Anonymous Amruta उवाच ...

झकास !

2.1.06  
Anonymous Mandar उवाच ...

ur writing memerizes me

12.1.06  
Anonymous Vidya Bhutkar उवाच ...

Mastch. I liked ur style of writing and the topics too. :-)) Asech vachayla milat raho hi sadichha. :-)
Vidya.

19.1.07  
Anonymous श्रद्धा उवाच ...

शाळेतल्या निबंध लेखनाची आठवण आली राव.
मी ही कोणे एके काळी असच मनापासून तरी बाईना आवडेल, या भाषेत लिहायचे. :D

26.4.09  

Post a Comment

<< Home