October 25, 2004

मी वजन कमी करतो !

कपडे कितीही वाढत्या मापाने घेतले तरी 'वाढत्या मापा'लासुद्धा एक मर्यादा असते ! ती मर्यादा गाठली, की माझ्या मनात 'वजन कमी करण्याचा' विचार उचल खातो.
एखाद्या दिवशी रात्री डायनिंग टेबलवर आई-बाबांशी बोलताना मी विषय काढतो... "बाबा, मला उद्या सकाळी ६॥ वाजता उठवा. मी उद्यापासून दररोज पर्वतीला जाणार आहे".
बाबा हसतात !
हे हसणं सामान्य नाही ! अतिशय अर्थगर्भित आहे ! "पर्वतीला जाणार? तोंड बघ आरशात ! तेरड्याचा रंग तीन दिवस, तुझा दोन दिवस टिकला तरी पुरे ! आजवर दहा वेळा पर्वती धरली आणि बारा वेळा सोडली ! एक दिवस पर्वतीला जायचं आणि पुढला आठवडाभर पाय दुखतात म्हणून बोंब मारायची..." असे अनेक अर्थ त्या हसण्यात दडलेले असतात! तुम्ही म्हणाल, मग हे सगळं सांगायचं की नुस्तं ! हसायचं कशाला ? कशाला ? अहो, कोकणस्थांचा कुळाचार आहे तो ! मोडून कसा चालेल ? थोडं विषयांतर करून सांगतो. बजाज डिस्कव्हर च्या जहिरातीत 'इलेक्ट्रॉनिक स्टार्ट' बद्दल जॅकी चॅन म्हणतो - "जे काम हातानं होऊ शकतं त्यासाठी गुरू पाय वापरत नाही !" तसा कोकणस्थांत एक रिवाज असतो. शक्यतो कुत्सित, कुचकट, छद्मी हास्य करावं. तेवढ्यानं नाही भागलं तर नाक मुरडणं, मानेला हिसका देणं, एक भुवई वर चढवणं यासारख्या देहबोलीचा वापर करावा. अगदीच वैखरीचा वापर करावा लागला तर उपहास, उपरोध, अतिशयोक्ती, वक्रोक्ती, प्रश्नालंकार इ. वापरावे ! असो.
अपमान गिळून मी आईकडे बघतो. आई म्हणते - " अरे ऽऽ, इतक्या दिवसांनी व्यायाम करतोयस, एकदम पर्वती नको... मी काय म्हणते, उद्या आपला सारसबागेपर्यंत पायी जा. एक आठवडा असा संच जमला, की मग आठव्या दिवशी आत उतरून आतल्या जॉगिंग ट्रॅकवर चाल. असं एक आठवडा झालं की " ( बोलणं तोडत मी म्हणतो ) "आई, या गतीनं पर्वतीच्या माथ्यावर पोचेपर्यंत माझी चाळिशी उलटून गेली असेल. मला इन्स्टंट रिझल्ट्स हवेत. व्यायामाची पंचवार्षिक योजना नव्हे." रागारागाने उठून मी हात धुतो.
आई-बाबांचा थंडा प्रतिसाद पाहून माझा पर्वतीला जाण्याचा विचार अधिकाधिक पक्का होतो! बाबा कुत्सित हसल्यामुळे बाबांना सकाळी उठवायला सांगायचा बेत मी रद्द करतो. आता सकाळी आपलं आपण उठायचं कसं ? कुठेतरी वाचलं होतं की रात्री झोपताना स्वत:ला बजावायचं की उद्या अमुक वाजता उठायचं आहे. मग आपोआप जाग येते. झोपताना मी स्वत:ला बजावतो : उद्या सकाळी ६॥ वाजता उठायचं आहे...
रात्री मला रंगीबेरंगी स्वप्नं पडतात. मला दिसतं की माझं वजन कमी होऊन ६० किलोवर आलं आहे. एकदम हलकं हलकं वाटत आहे. मित्र-मैत्रिणी विचारतायत "लेका वजन कमी कसं केलंस ?" मी सुहास्यवदनानं आणि प्रसन्न चितानं सर्वांना वजन कमी करायचे तंत्र सांगत आहे...सकाळी जाग येते. घड्याळ बघतो तो ८ वाजलेले असतात. अरे ! काल तर झोपताना ६॥ म्हटलं होतं ! मग ? बहुतेक Timezone specify करायचा राहिला . चरफडत उठून मी स्वयंपाकघरात जातो. रेडिओवर भक्ति-संगीत चालू असते. आई गॅसपाशी उभी असते. माझ्याकडे सहानुभूतीने पाहून आई म्हणते - "सकाळी जाग आली नाही ना ? असू दे. उद्यापासून जा. तसाही उद्या शनिवार आहे. सुटी आहे. शिवाय मारुतीचा वार. ये, आता खाऊन घे थोडं..." आई ताटात साजूक तूप माखून लुसलुशीत गरम पोळ्या वाढते. आईचं मन मला मोडवत नाही...
दुस-या दिवसासाठी मी मानसिक तयारी करतो. शनिवार - सुटी आहे. चांगलं वाघजाईपर्यंत जाऊन येऊ. परत यायला उशीर झाला तरी चालेल....
सकाळी ७॥ ला जाग येते. तोंड धुऊन कपडे करतो आणि निघतो. स. प. पर्यंत जाईस्तोवर डोळ्यांवरची झोप उडते. तेवढ्यात सेल्फ सर्व्हिस सेंटर मधून कसला तरी छान वास येतो. 'रस्त्यानं जाणा-या सुंदर मुलीकडे वळून न पाहणं हा तिच्या सौंदर्याचा अपमान आहे', तसं 'पाकघरातून पाककृतींचा वास दरवळत असताना त्या चाखून न पाहणं हा बल्लवाचा अपमान आहे' असं माझं प्रामाणिक मत आहे. मग चांगलं झणझणीत इडली-सांबार खाऊन मार्गस्थ होतो. जरा पुढे गेल्यावर एक लांबून बरीशी वाटणारी मुलगी दिसते. पण नीलायमच्या चौकात ती डावीकडे वळते ! माझा नाईलाज होतो. जवळ पोचल्यावर जाणवतं की ती फारशी चांगली नाहीए. आणि हो, आज तसाही मारुतीचा वार आहे. उगाच कशाला ?
इतकं होईस्तोवर पर्वतीचा रस्ता लांब राहिलेला असतो. मग मी विजयानगर कॉलनीत घुसतो. तिथे छान छान बंगले, सोसायट्या दिसतात. इकडे तिकडे बघत विचारांच्या नादात मी परत टिळक रोडवर येतो. जाऊ दे. पर्वती नाही तर नाही. किमान सकाळी पाऊण तास मोकळ्या हवेत फिरणं झालं. Positive Thinking म्हणतात ते हेच.मागून एक हाक ऐकू येते. वळून बघतो तर जोश्या ! मग घटकाभर गप्पा होतात. आठवणी निघतात. १२मध्ये असताना कोचिंग क्लास सुटल्यावर आम्ही अमृततुल्य चहा प्यायचो. जुन्या आठवणींत रंग भरायला आम्ही "ॐ नर्मदेश्वर" मध्ये जाऊन डबल चहा मारतो.घरी आल्यावर आई विचारते - "झाली का पर्वती साजरी ?" "नाही ग, तू म्हणालीस तसं पहिलाच दिवस होता म्हणून सारसबागेपर्यंत जाऊन आलो." आई संतोषानं मान हलवते. गॅसवर चहाचं आधण उकळत असतं. "आई ग, मला पण अर्धा कप टाक ना". "अर्धा कशाला रे मेल्या ? फुल्ल पी की. अर्ध्या कपानं माझं चहाचं प्रमाण बिघडतं."
मी डब्यातून केळा-वेफर्सची पिशवी काढतो. आरामखुर्चीत बसून सावकाश वेफर्स खाताखाता मी कठोर आत्मपरीक्षण करतो..."नक्की काय चुकतंय आपलं ? सकाळी उठायचे एक वांधे आहेत. पर्वतीही तशी उंच आहे. नाही म्हणलं तरी चांगल्या सत्त्याण्ण्व पाय-या आहेत... वाटेत प्रलोभनं पण खूप आहेत.... नाहीतर एम.आय.टी. च्या मागची टेकडी ट्राय करावी काय ? झाल्यास तर तिथे मोर पण आहेत म्हणे...
पण मुळात टेकडीवरच गेलं पाहिजे काय ? उगाच चार लोक जातात म्हणून आपणपण जाण्यात काय अर्थ आहे ? आपण आपलं प्रकृतिमान पाहून वागावं. वजन कमी झाल्याशी कारण..."
कॅलेंडरची पाने उलटलात. डोक्यात विचार चालूच असतो. अचानक मला खांबेटे काकांनी दिलेल्या सीडी ची आठवण होते. सीडी पाहताना माझा निर्णय पक्का होतो. ठाम निश्चयच म्हणा ना...
निश्चयाचे बळ । तुका म्हणे तेचि फळ ॥
रात्री डायनिंग टेबलवर आई-बाबांशी बोलताना मी विषय काढतो..."बाबा, मला उद्या सकाळी ६॥ वाजता उठवा. मी उद्यापासून दररोज रामदेवजी महाराजांचे प्राणायाम करणार आहे".
बाबा हसतात !

6 Comments:

Blogger J Ramanand उवाच ...

Nice one :-)
I can imagine exactly how you would have gobbled up those wafers!

25.10.04  
Blogger paamar उवाच ...

ha ha :) but I didnt gobble :) I do that when I come to yr place ! सावकाश means slowly !

26.10.04  
Blogger Harish Kumar उवाच ...

Very well written.
This not only reminds me of my erstwhile waistline but also the fact that I am not in Pune - missing the usual haunts/the typical maharashtrian sarcasm and of course Joshi Wadewaale.

18.11.04  
Anonymous Anonymous उवाच ...

आहो पामर, तुम्ही सायकल चालवून पहा बरे. सकाळी उठून पायंडिल मारत खडकीस गेलात तर खडखडीत तब्येत होईल. अन तुमच्या मातोश्रींच्या पद्धतीने सांगायचे तर असे करा:
पहिले काही दिवस घराजवळच चक्कर मारून या. नंतर तुमची कार/मोटरसायकल हपिसात ठेवा अन जाताना सायकल घेऊन जाणे, येताना ते दुसरे वाहन (कार/मोटरसायकल) घेऊन येणे. दुस-या दिवशी ते वाहन (कार/मो.सा.) घेऊन जाणे, व सायकल घेऊन येणे. कोणी सांगावे, चिकाटी दाखवलीत तर पुढे दोन्ही दिशांना सायकलवर जाऊ शकाल! [येथे एक छ्द्मी हास्य, not very much unlike your father]
टीप: वाटेत फर्गसन (की फर्ग्यूसन?) महाविद्यालयजवळून जाताना चांगले मनोरंजन होईल.
टीप२: वैशालीचा मोह टाळावा.
कळावे,
सुजय.

17.5.05  
Anonymous Anonymous उवाच ...

Good one :) I could remember Pu la's "batatyachi chal" ;) So finally wajan kithpat kami zala ?? ;) ki pu la an sarakh tumhi pan wajankatya pasun 4 hat dur cha rahatat ;))

13.2.06  
Anonymous Anonymous उवाच ...

fantastic
Mala mazyach gharachi athavan zali
Maze baba pan asech hastat , sakali uthava mhatale ki (Shevati amhi pan koknasthach padalo na)9

26.2.07  

Post a Comment

<< Home