February 1, 2009

डायरी २००७

२९ एप्रिल

आज रविवार. एरवी रविवारचे आमचे रूटिन म्हणजे उशिरापर्यंत लोळत पडायचे, आरामात उठायचे, कुठल्या ना कुठल्या मित्रांबरोबर ब्रेकफास्ट झोडायला बाहेर जायचे, दुपारी घरी आलो की झोपायचे, संध्याकाळी टवाळक्या, मग रात्र होतेच ! End of Day !
आजचा रविवार वेगळा आहे ! ’पाणीप्रश्न" अजून पूर्णपणे सुटला नसल्याने बराच गोंधळ आहे. पहिले काम म्हणजे पाणी भरून ठेवणे. पण नळाला पाणीच नसल्याने ते पण काम हलके झाले ! मग चहा पाणी करून दहा वाजता कॉलेजला गेलो. बारा वाजेपर्यंत लेक्चर आटोपले. मग सावंत सर भेटले. कॉलेजच्या कामासाठी ते US ला जाणार आहेत. थोड्या व्हिसा प्रोसेसिंगच्या आणि कॉलेज ऍक्रेडिटेशनच्या गप्पा झाल्या. आज कॉलेजला बाईकने गेलो होतो. परत येताना ’हाल कुत्रा न खाणे’ याचा अर्थ नीट समजला. उन्हाच्या झळा असह्य होत्या. काही वर्षांपूर्वी याच उन्हात सायकलने ये-जा करायचो. आणि आज सिग्नलला एक मिनिट उभे राहणे ही एक शिक्षा वाटत होती. ऊन अक्षरश: भाजून काढत होते. किंवा एसी मध्ये बसून उकाड्याची सवय राहिली नसेल. तापमान आत्ताच ४० डिग्री आहे. अजून वाढणार आहे म्हणतात.
येताना वाटेत क्षुधाशांती करायला सब वे मधून व्हेजी डिलाईट आणि वाचायला ’द प्रेस्टिज’ हे पुस्तक घेतले. या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट निघाला आहे. जानेवारी महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित झाला पण एखादा आठवडा टिकला असेल नसेल. रामानंदने हा चित्रपट मुंबईला पाहून मला चांगला अभिप्राय दिला होता. एकमेकांशी काही कारणाने व्यक्तिगत शत्रुत्व निर्माण झालेल्या दोन जादूगारांच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. जादूचे टोकाचे वेड आणि सूडाग्नी याने दोन आयुष्यांची कशी वाताहत होते आणि त्यात इतरही काही कसे होरपळतात अशी ही एक विलक्षण प्रभावी कथा आहे. योगायोगाने रामानंदकडून या चित्रपटाबद्दल समजल्यानंतर एक महिन्याने मी अमेरिकेस गेलो आणि फ्लाईटमध्ये मला हा चित्रपट सापडला. आणि पहिल्यांदा पाहिल्यावर या चित्रपटाने मला एवढे झपाटले की फ्लाईट संपेपर्यंत हा चित्रपट मी चक्क चार वेळा (आणि त्या नंतरही असंख्य वेळा) पाहिला ! जबरदस्त ताकदीची कथा, चित्रपटाची मांडणी आणि कसलेला अभिनय ! चित्रपट पुस्तकावर आधारित असला तरी चित्रपटाच्या कथेत काही मोठे फेरबदल केले असल्याने मूळ कथाही वाचायची मला उत्सुकता होती.

घरी आलो तर पाणी अवतीर्ण झाले होते. सिंक भरून भांडी विसळताना कंबरडं मोडलं. आई बाबा इतके घरकाम रोज कसे करतात नवल आहे !

संध्याकाळी दूध आणि फूलपुडी आणायला बाहेर पडलो तर एक दोन मित्र भेटले. आतापर्यंत ज्या ज्या लोकांना माहीत झाले आहे की आई बाबा यूएस ला गेले आहेत, त्यांनी "वा !! मग काय, फ़्रीडम !!" आणि "मग खाण्यापिण्याचे काय ?" एवढीच प्रतिक्रिया दिली आहे. यापलीकडे किंबहुना यापेक्षा अधिक मी आई बाबांना emotionally miss करतोय असं कोणालाच वाटलेलं दिसत नाहीये !

दुपारी दहाच्या सुमारास आई बाबांचा अर्चनाच्या घरून फोन आला. प्रवास छान झाला, सामान सर्व नीट पोहोचले, कोणतीही गैरसोय झाली नाही हे ऐकून बरे वाटले. अर्चनाचे घर छान आहे असे आई म्हणली. पाहू ते पाहायचा योग कधी येतो ते ! आई ने घरी पोचल्या पोचल्या हातात लाटणे घेऊन पोळ्या केल्या :) अर्चना धन्य झाली असेल. जेट लॅग ची नाटके फक्त आमचीच दिसतायत !

मी गेले दोन दिवस सर्व घरभर दिवे लावत नसून मी असलेल्या खोलीतच दिवा लावत आहे ! हा बदल कसा काय झाला कोण जाणे ! एरवी बाबा प्रत्येक खोलीतला दिवा बंद करत असल्याने त्याविरुद्ध रिऍक्शन म्हणून एरवी मी दिवे लावत असेन !

घरकाम म्हणजे काय हे ’चांगलेच’ समजत आहे. एरवी मी घरात ’नॉन पेईंग गेस्ट’ म्हणून राहत असतो ! आई बाबा परत आल्यावर माझ्या वर्तणुकीत positive फरक पडेल असे वाटतेय !

३० एप्रिल

दुपारी दीड वाजता आई बाबांचा फोन आला होता. निवांत बोलणे झाले. आता तेथे नीट सेटल झाल्यासारखे दिसत आहेत. आईने इंडियन स्टोअरमधे अर्चनाबरोबर जाऊन नवलकोल आणि कारले पैदा केले !! अर्चनाने डोक्याला हात लावला असेल. फार कौतुकाने आई बाबांना अमेरिकेस बोलावलेस ना, खा आता कारल्याची भाजी !!

1 Comments:

Blogger R उवाच ...

2007! vintage diary vachun chaan vatle. I was waiting for you to post.

6.2.09  

Post a Comment

<< Home