November 30, 2004

अपयश ही यशाची पुढची पायरी आहे !

अपयश ही यशाची पुढची पायरी आहे !
काय ???
अपयश ही यशाची पुढची पायरी आहे ?
मैरेयक मद्याचे अतिरिक्त सेवन केल्याने ज्याची मति भ्रष्ट झाली आहे अशा जंबुद्वीपात राहणा-या पामर नामक क्षुद्र विप्राने तोडलेले हे अकलेचे तारे दिसताहेत !
अपयश ही यशाची पहिली पायरी आहे हे माहीत आहे; हे वचन तर शाळेत सुवचनांच्या फळ्यावर आणि वह्यांच्या समासांत लिहून अतिशय गुळगुळीत झाले आहे. अजूनही नव्या पिढ्या तितक्याच उत्साहाने असली निरर्थक वाक्ये पाठ करून निबंधांत लिहीत असतात. तसा पामराचा या वचनाला विरोध नाही ! अपयशाने माणूस खचून जाऊ नये, त्याने पुन्हा आशेची उभारी धरावी म्हणून असली वाक्ये ठीक आहेत. पण एका ठराविक मर्यादेपर्यंतच ! आता पामराने 'चिकन सूप फॉर द सोल' सुद्धा चार दिवस चाखले. पहिली चार बाऊल्स कुतुहलाने रिचवली. पाचवे अजीर्ण झाले ! पुढले सगळेच छापाचे गणपती वाटायला लागले ! पामराचा विरोध आहे तो अर्धसत्य सांगण्यास.विश्वास बसत नसेल माझ्या विधानावर, तर दाखले देतो.
यवनी जुलमाच्या नरकात महाराष्ट्र पिचत होता तेव्हा एक योगीराज घळीतून 'जय जय रघुवीर समर्थ' म्हणत बाहेर आले. परचक्राच्या रेट्यापुढे स्वत्व गमावलेल्या समाजाची भेकड अगतिकता त्यांनी 'समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ।' च्या गर्जनेनी उडवून लावली. महाराष्ट्रात मठांचे जाळे पसरले. लोकांपुढे कोदंडधारी रामाचा आदर्श ठेवला. मारुतरायांची ठिकठिकाणी स्थापना करून समाजास बलोपासनेची दिशा दिली. मनाचे श्लोक हा एक चिरंतन अलंकार मराठी अध्यात्मवाङ्मयावर चढवला. शिवरायांच्या भवानीतून त्यांचे रामराज्याचे स्वप्न पुरे झाले, महाराष्ट्रात आनंदवनभुवन अवतरले. आणि मग ? पुढला इतिहास आणि अधोगती आपल्याला ठाऊक आहे. आज समाजामध्ये कुठले दुर्गुण यायचे बाकी आहेत ? भ्रष्टाचार, नीतिमूल्यांचा -हास, असहिष्णुता, ऎहिक सुखोपभोगांची लालच ! समर्थांनी पाहिलेले आनंदभुवन ते हेच का ? जर यश हे शाश्वत नसेल तर त्याचा उपयोग काय ?
वेदांपासून फारकत घेणा-या समाजाला खडबडून जागे करायला आद्य शंकराचार्य पुढे सरसावले. अद्वैताची पताका त्यांनी सा-या भारतभर फडकवली. काश्मीरच्या सर्वज्ञपीठावर आरोहण करत वैदिक ज्ञानाला पुनश्च प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. वैदिक धर्माच्या संवर्धनार्थ चार पीठे स्थापन करून शंकराचार्यांची स्थापना केली. आणि आज आमच्या नशिबी काय पाहणे आले ? शंकराचार्यांनी समाजाला धर्म शिकविण्याऐवजी कोणी एक शंकर-रमण शंकराचार्यांना धर्म शिकवू लागला ! शंकराचार्यांनी समुद्र ओलांडू नये म्हणून तो कोर्टाची पायरी चढला ! आज हेच पद खुनाच्या आरोपामुळे वादाच्या भोव-यात सापडले आहे !
विवेकानंदांनी अमेरिकेत जाऊन वैदिक धर्माची महती जगापर्यंत पोहोचवली. आपली मान ताठ झाली, का तर अमेरिकन लोकांनासुद्धा आपला धर्म आवडला म्हणून ! आणि आज आपण तोच धर्म स्वत: विसरत चाललो आहोत. विवेकानंदांनी एक बलिष्ठ,समृद्ध पण धर्माचरण करणा-या समाजाचे स्वप्न पाहिले. त्या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना केली. परंतु आपण त्या स्वप्नाच्या जवळही जाताना दिसत नाही. जातीपातींमधल्या ज्या भिंती विवेकानंदांना तोडणे अभिप्रेत होते, त्या भिंती अधिकच बळकट होताना दिसत आहेत.
चाकोरीबद्ध शिक्षणाला एक समर्थ पर्याय द्यावयास रविन्द्रनाथांनी 'शांतिनिकेतन' नावाचे रोपटे लावले. त्यांनी मुलांची व्यक्तिमत्वे फुलांसारखी फुलवली, त्यांचा विकास केला. हि-यांना पैलू पाडले. आणि आज ? रविन्द्रनाथ आणि त्यांचे सहकारी यांच्या पश्चात हा वृक्ष खुरटला. शांतिनिकेतन आणि इतर रुक्ष शाळा यांच्यातील फरक हळूहळू नाहीसा होत आहे. पु. ल. नी 'वंगचित्रे' मधे रेखाटलेले हे शांतिनिकेतनाचे जुने आणि नवे चित्र पाहून मन विषण्ण होते.
ठीक आहे. धरून चालू की पामर म्हणतो त्यात काहीतरी तथ्य आहे. अपयश ही खरोखरीच यशाची पुढची पायरी आहे ! मग ? अपयशामागून यश आणि यशामागून अपयश तर येणारच. म्हणून मग प्रयत्नच करू नये ? का "कर्मण्येवाधिकारस्ते" वर गाढ विश्वास ठेवावा ?
आजवर भवसागराच्या किना-यावर मानवी हातांनी कितीतरी घरं बनवली, आणि काळाच्या लाटांनी ती उध्वस्त केली. मग घरं बनवूच नयेत ?
मजजवळ कुठे उत्तर आहे ?
पामराजवळ हे उत्तर असतं, तर त्याने स्वत:ला 'पामर' कशाला म्हणवून घेतलं असतं ?

6 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

भाऊ, भाऊ, मैरेयक मद्य म्हणजे काय रे?

13.5.05  
Blogger paamar उवाच ...

am not a specialist of wines :) but i think its some sort of alcoholic drink in ancient india :)

13.5.05  
Blogger asmi उवाच ...

"Failure is the condiment that gives success its flavor."--Truman Capote

25.5.05  
Blogger Shantanu Shaligram उवाच ...

पामर, तुम्ही म्हणता हे अगदी खोटे नाही. तुम्हाला ब्रह्मदेवाचा दिवस ही संकल्पाना माहीत आहे का? थोडक्या त सांगायचे तर प्रगती-अधोगती हे एक चक्र असते. गणितातील साईन वेव्ह (sine wave) सारखे. जे वर असते ते खाली येतेच आणि जे खाली असते ते वर जातेच. कोणतीच गोष्ट चिरंतर नाही. चिरंतर आहे तो बदल! जो बदलतो तो टिकतो. काही बद्ल पुरोगामी असतात किंवा काही अधोगामी. इस्लाम टिकला, टिकेल कारण तो समाजाला सतत सातव्या शतकाचे स्वप्न दाखवतो, तिकडे घेउन जातो.

22.8.05  
Anonymous Anonymous उवाच ...

" Shikhar gatale ki Utar suru honarch ."

7.10.05  
Blogger श्रद्धा उवाच ...

मला वाटते की या सगळ्या प्रश्नांचं उत्तर हेच आहे की प्रत्येकाने आपापल्या परीने रामदास, रविंद्रनाथ, विवेकानंद बनायचा प्रयत्न करायचा आणि तीच शिकवण पुढच्या पिढीला द्यायची.
मग जी काही प्रगती किंवा अधोगती होईल, त्यात आपला खारीचा वाटा असेलच. कुणी खरोखर 'The one writer' म्हणतात तसे 'नविन गोष्ट पहिल्यांदा करणारे' असतील तर कुणी त्यांचे अनुयायी.
पण निदान याची शाश्वती राहील की पामराला जे वाटत आहे त्याची सगळ्यानाच जाणीव नेहेमीच राहील.

29.4.09  

Post a Comment

<< Home