क्वालिटी टाइम
चार वेळेला स्नूज केलेला अलार्म पाचव्यांदा वाजल्यावर चिमण नाइलाजाने डोळे उघडतो. पिल्लाच्या पलीकडे झोपलेल्या चिमणीला तो हातानं ढोसून उठवतो.
चिमणी दचकून उठते.
"काय झालं ?"
"अग किती वाजले बघ की!" चिमण करवादतो.
"ओह् चल उठू या"
"शू .. हळू .. पिल्लू उठेल. तू चहा टाक आणि मला हाक मार. मी तोवर लोळतो."
"नाही रे. मी एकटी नाही जाणार. तू पण चल"
"प्लीज ... 5 च मिनिटं ...प्लीज" चिमण गयावया करतो.
चिमणी फणकारुन एकटीच किचन मधे जाते.
चिमण शेजारी झोपलेल्या पिल्लाला अलगद जवळ ओढून कुशीत घेतो. त्याच्या मुलायम केसांवर हलकेच ओठ टेकवतो.
घड्याळाचा काटा पुढे जाऊच नये असं त्याला वाटतं.
पिल्लाची झोप चाळवते. ते अर्धवट उठून, रागावून, झोपेतच तरातरा रांगत, गादीच्या दुस-या टोकाला जाऊन, इवलंसं कुल्लं उंच करून परत झोपतं.
चिमणला अपराधी वाटतं.
बराच वेळ चिमणीची चाहूल लागत नाही, तेव्हा चिमण नाईलाजानं उठतो.
पंख्याच्या वा-यानं अंग जड झालेलं असतं. सत्तर वर्षांच्या वृद्धासारखं हळू हळू चालत तो बेसिनपर्यंत पोचतो. आरशात त्याला एक केस पिंजारलेलं, दाढी वाढलेलं, डोळे तांबारलेलं भूत दिसतं. रोजसारखंच !
किचनकडे जाताना वाटेत त्याला 'फुस्' 'फुस्' असा आवाज येतो. गेस्ट बेडरूम मधे चिमणी प्राणायाम करत असते.
"अग हे काय चाललंय? चहा?"
"फुस् फुस् - ओट्यावर ठेवलाय - फुस् फुस्"
"तू पण चल ना"
"फुस् फुस् - 10 मिनिटं - फुस् फुस्"
"च्च"
"फुस् फुस् - तू ही व्यायाम कर - इच्छा असेल तर - फुस् फुस्"
चिमणचं डोकं थोडं सटकतं, पण उघडपणे चिडायला काहीच कारण नसतं. चडफडत तो ओट्यावरून चहाचा कप उचलतो, आणि सोफ्यावर फतकल मारतो.
एका हातात चहाचा कप सांभाळत दुस-या हातानं तो मॅक बुक उघडतो आणि ते करताना त्याच्या मांडीला एकदम चिमटा बसतो.
"च्या *** त्या स्टीव जॉब्सच्या.... " चिमण मृतात्म्याला पण सोडत नाही!
मेल बॉक्स मधे 133 अन् रेड मेल्स असतात. आता त्याचं डोकं पूर्ण फिरतं.
"*****, रात्री झोपताना मेलबॉक्स क्लीन केलेली, सकाळी 133 मेल्स ? रात्रभर साले काय **** का काय ?"
मग पुढली काही मिनिटं मुरारबाजीच्या आवेशात तो मेल्स डिलीट करतो.
पिल्लाच्या रडण्यामुळे त्याला एकदम ब्रेक लागतो.
लॅपटॉप बाजूला आदळून तो बेडरुमकडे धावतो. पायात मुंग्या आल्यामुळे त्याला जोरात पळता येत नाही!
चिमणीनं पिल्लाला आधीच पंखाखाली घेतलेलं असतं.
"आता उठवतीये मी त्याला."
चिमण नाराजीनं मान हलवतो. पिल्लाच्या रडण्यात पर्यवसान होऊ शकेल अशा कुठल्याही गोष्टीनं चिमणच्या पोटात गोळा येतो.
"तू ज्जा इथून" पिल्लू डोळे उघडल्या उघडल्या संतप्त फर्मान सोडतं.
"का रे मऊ ?" चिमण आर्जव करून पाहतो.
"तू ज्जा ..."
चिमणी "तुझं चालू देत, मी बघते त्याच्याकडे आता" अशा आशयाची खूण करते.
पण सगळीकडे मधे मधे डुचकून घोळ घालायची सवय असल्याने चिमणचा पाय निघत नाही.
जरा शांतता प्रस्थापित झाल्यावर पिल्लू विचारतं -
"बा-शीप, बा-शीप ... तू आज ऑफिश ला जानालेश ?"
'बा-शीप' :) पिल्लानं चिमणला ठेवलेलं नाव. पिल्लू छोटं असताना चिमणला 'बाबा' म्हणायला शिकत होतं, नेमकं तेव्हाच त्यानं 'बा बा ब्लॅक शीप' चं गाणं पाहिलं, आणि तेव्हापासून त्यानी चिमणला आधी 'बाबा शीप' आणि मग 'बा-शीप' म्हणायला सुरुवात केली !
चिमणला ही 'बा शिप', हजार स्कॉलरशिप्सपेक्षा मोलाची वाटते. मग त्याने पण पिल्लाला कधी 'बाबा' म्हणायला सुचवलं नाही.
पिल्लाच्या मूडनुसार बाशीपची 'बाशा', 'बाश्या', 'बाशूप', 'बाशू' अशी सुद्धा रूपं होतात!
ऑफिसचा विषय निघाल्यावर चिमणच्या पोटातला गोळा मोठा होतो.
चिमणचे उत्तर चटकन् येत नाही, तसा पिल्लाचा चेहरा कावराबावरा होतो.
चिमण वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो - "अम् नाही. म्हणजे मला साहेबांनी फोन केला ना, तरच जाणारे, नाहीतर ना ही !".
"न्नाई जायचं". पिल्लू निर्णय देतं.
"बर बर. नको जायला. आता पट्कन् दातू घाशुन टाकु, चला !"
"दात नाइ धाशायचे. नुस्तं खुलखुल कलायचं"
"'धा'सायचे नाही रे, 'घा'सायचे, घ घ"
"'गा'त 'घा'शायचे"
"'दा'त घासायचे"
"'दा'त 'धा'सायचे"
चिमण गिव अप् करतो.
"आधी माझी टल्न. पन माझ्या टल्न ला पेश्त नाइ लावायची".
पिल्लू निवांतपणे दातावर ब्रश फिरवत बसतं.
चिमणचा एक डोळा घड्याळावर असतो. त्याचे ठोके वाढायला लागतात !
मग चिमणीबरोबर आयपॅड लाऊन पिल्लाचा दूध पिण्याचा कार्यक्रम पार पडतो. चिमणला स्टीव जॉब्सचा उद्धार केल्याबद्दल पश्चात्ताप होतो.
"आज अंगा मी शिलेक् कलनाल".
"चालेल"
पिल्लू बझ् लाइट्-इअर चा शर्ट आणि स्पायडर्मॅनची पँट सिलेक्ट करतं.
"मनी, आपण स्पायडर्मॅनचा शर्ट आणि स्पायडर्मॅनचीच पँट घालायची का ?" चिमणी प्रयत्न करते.
"नको आई, हेच असू दे. हे छान दिसतंय". चिमणीचे पडलेले तोंड बघून पिल्लू तिची समजूत काढतं !
"बा-शीप, मला आज्जी कले न्नाई जायचंय."
"का रे बाळा, आजी वाट बघतिये. तिचा फोन आला होता, पिल्लू कुठे आहे म्हणून"
"पन मग तू आज्जी कलून ऑफिश मधे न्न्नाई जायच"
"बर, नाई जात"
"तू खोतं सांगतोस. तू प्लॉमिस कलतोस की, तू प्लॉमिस करतोस की तू , तू प्लॉमिस करतोस की तू ऑफिश मधे, आज जानाल नाइ आनि, आनि मग जातोस"
वयाला न झेपणारं लांबलचक वाक्य, पिल्लू शर्थीचे प्रयत्न करून, पोटतिडकीनं बोलतं.
"वा, पोरानं चांगली लायकी केली आपली !" चिमणचे डोळे पाणावतात.
गाडीत फक्त पिल्लाच्याच आवडीची गाणी वाजतात. आजचा दिवस "लुंगी डान्स" चा असतो.
"मुचो को तोला लाउंद गुमाके , अन्ना के जैसा चच्मा लगाके ....."
लुंगी डान्स" चा ट्रॅक दोन-तीनदा वाजतो.
पिल्लाला मधेच शहाणपण सुचतं - "बाशीप आपन हे गानं ओल्देली ऐकलंय ना, मग तू फुन्ना फुन्ना का लावतोयस?"
चिमण कपाळाला हात लावतो.
गाडीतून उतरून आज्जीच्या दाराशी जाईपर्यंत रडारडी सुरू होते. घट्ट् बिलगू पाहणा-या पिल्लाला दूर करून, स्वत:च्या आईच्या हातात देताना चिमणच्या हृदयाची कालवाकालव होते.
पालकांना नोकरी का करायला लागते? त्याचं मन कुढतं. घर-कर्जाची आठवण आल्यावर डोकं पुन्हा ताळ्यावर येतं.
मग खचलेल्या मनाला उभारी आणायला तो वाटेत थांबून एक गरम गरम कॉफी घेतो.
ऑफिसमधे मिटिंग मागून मिटिंग मागून मिटिंग चालतात. किचकट समस्या आणि त्यांची उत्तरे एका पानावरून दुस-या पानावर सरकतात.
मतलबी मांजरे, भुंकणारे श्वान, लबाड कोल्हे, डरकाळ्या फोडणारे वाघ सिंह, चिरडणारे हत्ती, आंधळी मेंढरे, गरीब गाई - सगळ्यांशी दिवसभर मुकाबला करता करता तन आणि मन थकून जातं.
संध्याकाळ होते.
मुंगीच्या पावलांनी सरकणा-या ट्रॅफिकबरोबर चिमण त्याच्या आईच्या घरी पोहोचतो.
आज्जीच्या घरी किलकिलाट चालू असतो.
चिमणला पाहताच पिल्लू रुसून आज्जीला बिलगतं. "बा शीप. तू ज्जा. मला घली नै जायचय"
आज्जी म्हणते - "अरे त्याला मगाचपासून झोपाळा खेळायचाय. त्यानं खाल्लं होतं म्हणून जरा थांबलोय".
"झुले बाई झुला माझा झुले बाई झुला" म्हणत पिल्लू झोपाळा खेळतं.
आज्जीनं तिच्या मोठ्या पिल्लासाठी चहा करून ठेवलेला असतो.
चिमणी पिल्लाला भेटायला आतुर झालेली असते. ती चिमणला फोन करून "निघालास का रे?" म्हणून विचारते.
पिल्लाला अज्जिबात घरी जायचं नसतं.
मग चिमण त्याची थट्टा करतो - "काय रे, सकाळी 'आज्जी कले नाई जायचं' असं कोण म्हणत होतं रे?"
खोडसाळपणे हसत पिल्लू सांगतं - "बाशीप म्हणत होता !!"
मग चिमण त्याला "स्टिअरिंग् वील" खेळायचं आमीष दाखवून, उचलून निघतो. चिमणीचा अजून एकदा फोन येतो.
घरी स्वयंपाक तयार असतो. चिमणला आता सिरियल्सचे वेध लागलेले असतात.
जेवता जेवता पिल्लाचं आयपॅडवर ऑक्टॉनॉट, पेप्पा पिग, पिंगू, अन् स्पायडरमॅनचं पारायण सुरू असतं.
चिमणा चिमणी फालतू दर्जाच्या, अतर्क्य अशा सिरियल्स चवीचवीने, टीका टिप्पण्ण्या करत बघत असतात.
रात्रीच्या कार्यक्रमाची सूत्रे चिमणी हातात घेते.
"पिल्लू, आता काय करायचं?" चिमणी कमांडिंग टोन मधे विचारते.
"आता, झोपायचं, ......... नाही!" पिल्लाचा मिष्किल पणा सुरू होतो.
"ना ही ? थांब आता बघतेच तुझ्याकडे !" मग चिमणी आणि पिलाची घरभर पकडापकडी, आरडा ओरडा, आणि दंगामस्ती चालते.
चिमण तेवढ्यात मेल्स चेक करतो.
बेडरूमचा दिवा मालवल्यावर पिल्लाची निषेधार्थ रडारडी होते. मग गोष्टीची मागणी होते.
इवली इवली बोटे उघडून पिल्लू मोजून दाखवतं - "वन, टू, थ्री, फोर, फ़ाईव्" एवल्या गोष्टी सांगायच्या.
"नाही, फक्त दोन". चिमण धैर्य गोळा करून सांगतो.
"बर. म मला वाधोबा, सिंह, ने ने हॉर्स, कांगारू, बाशीप, ससुल्या, आणि शार्क अशी गोश्त सांग. आणि व्हेल. आणि ऑक्टोपस. फक्त एवलेच".
"बर. सांगतो".
चिमण मग झू मधल्या पिकनिक ची गोष्ट सांगतो.
त्यात एक चांगला राक्षस हवा अशी रन-टाईम डिमांड येते.
चिमणच्या गोष्टी सहन करण्याची ताकत आता चिमणीमधे राहिलेली नसते. ती हताशपणे उसासा सोडते.
पिल्लाला एकदम टवटवी येते.
"आई, तू असा ...(प्रात्यक्षिक दाखवून) ... आवाज का केलास?"
पिल्लू झोपेच्या राज्यात रमतं.
चिमण फोन उचलून एकदा मेल्स चेक करतो.
मग "हाउ टु स्पेण्ड क्वालिटी टाईम विथ युअर टॉड्लर" असा सर्च करून वाचत बसतो.
पिल्लू एकदम रडत उठतं.
"मनी, काय झालं ? घाबरू नकोस. आम्ही आहोत ना" चिमणा चिमणी पिल्लाला समजवतात.
"सिद्धपू मला मारायला आलाय" - पिल्लानं हिरण्यकश्यपूला "सिद्धपू" असं सुटसुटीत नाव ठेवलेलं असतं!
"घाबरू नकोस. मी सिद्धपूला बडवून काढेन". सिद्धपू मेलेला असल्यामुळे चिमण बेशकपणे ठोकून देतो.
मग शशिंग आणि "ये ग गाई गोठ्यात" असे आपापले ट्रॅक्स मिक्स करून चिमण आणि चिमणी पिल्लाला दामटतात.
रात्र चढते.
काटे पुढे सरकतात.
चिमण आणि चिमणीच्या समांतर रेषांवर लंब टाकून, आईच्या पोटावर डोकं, आणि बा-शीपच्या शब्दश: पोटावर पाय आणून पिल्लू स्वप्नांच्या दुनियेत बागडत असतं.
हा त्या तिघांचा बेस्ट क्वालिटी टाईम असतो.
2 Comments:
hi nikhil,
khup chaan lihilays. Purna blog kadhi sampawala kalalach nahi... mastach.. keep up the wrirting spirit :)
खूप छान कथा लिहिली आहे तुम्ही, असंच लिखाण भविष्यात पण करत राहा.
Post a Comment
<< Home