January 28, 2005

अपरांत !

(टीप : अपरांत हे कोकणाचे प्राकृत नाव आहे )

माझा प्लॅनिंग पेक्षा योगायोगांवर अधिक विश्वास आहे :)
म्हणजे काय झाले की कोकणात जायचे असे माझ्या मनात अनेक दिवसांपासून घोळत होते, पण योग येत नव्हता ! मी तसा नावाचाच कोकणस्थ. पूर्वी मी एकदाच कोकणात गेलो होतो; तेही पाच वर्षाचा असताना. आमच्या पाच पिढ्या पुण्यातच वाढल्यामुळे आमचा कोकणाशी तसा संबंध उरलेला नाही. कोकणात जायची इच्छा माझ्या मनात उत्पन्न झाली याला कारण माझ्या स्वभावातली एक खोड आहे. एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची passion आहे असे पाहिले, पण त्याचे कारण मला समजले नाही की मी विलक्षण अस्वस्थ होतो. आमच्या मातोश्री काही काळ कोकणात राहिल्यामुळे त्यांना कोकणाचे फारच प्रेम. तिथले आंबे, समुद्र, घराबाहेर पडू न देणारा पाऊस, ओढे नाले, साप-विंचू, देव-देवस्की, करण्या, भुतं-खेतं, माका-तुका ची कोकणी भाषा आणि सुप्रसिद्ध गजाली हे सारं ऐकून मी जवळपास विटलोच होतो म्हणा ना ! त्यामुळे हे कोकण कोकण म्हणतात ते आहे तरी काय अशी माझ्या मनात एक उत्सुकता निर्माण झाली होती. त्यात 'श्वास' मध्ये टिपलेले कोकण पाहून भरच पडली. अचानक एक दिवस आम्ही जयदीपच्या घरी सहज म्हणून टपकलो, गप्पांत विषय निघाला आणि बसल्या बसल्या कोकण सहलीचा बेत मुक्रर केला !

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न म्हणतात ते काही उगीच नाही !
माझ्यासारखा घर-कोंबडा नवसासायास प्रवासाला निघणार, तेव्हा कटकटी आल्याच पाहिजेत ! मग एका नातलगांचे आजारपण, जयदीपचे प्रोजेक्ट, आणि अस्मादिकांची ऑफिस मधली डेडलाईन असे अडथळे पार करून आम्ही अखेर पर्यटनास सिद्ध झालो ! निघण्याच्या आदल्या दिवशी रात्री अकरा पर्यंत ऑफिस मध्ये थांबून काम करावे लागले त्यामुळे सहलीच्या मूड मध्ये यायला मला वेळच मिळाला नाही. पण त्याचा फायदा असा झाला की प्रवासाच्या तयारीतून माझी सुटका झाली ! आमच्याकडे दोन दिवसांच्या सहलीची तयारीसुद्धा एव्हरेस्टची मोहीम अथवा चांद्रमोहीम यांना लाजवेल अशी असते. आई बाबांचा प्रवासात कोणतीही गोष्ट विकत घेण्यावर भरवसा नसतो. खाद्य पदार्थ तर नाहीच नाही ! जयदीपची आईही याच विचारांची असावी. कारण सुमो मधली निम्मी जागा लाडू, करंज्या, चकल्या, वेफर्स, आणि अशा असंख्य पदार्थांनी भरली होती.

निघताना जयदीपच्या बाबांनी एका कागदावर सहलीचा आराखडा लिहून आणाला होता. पण कात्रजचा घाट ओलांडल्यावर आईने 'क्षेत्र नारायणपूरकडे' असा फलक पाहिला आणि मग कोणत्याही इंडस्ट्री-प्रोजेक्ट मध्ये अनिवार्यपणे घडणारी गोष्ट आम्हीही अनुभवली : 'चेंज इन रिक्वायरमेंट्स' :-) वाटेवर प्रथम कापूरहोळ येथे बालाजी मंदिरात दर्शन घेतले. मंदिर अतिशय भव्य, सुंदर आणि कमालीचे स्वच्छ आहे. भक्तांच्या दर्शनाची व्यवस्था, प्रसाद वाटप इ. अतिशय उत्तम आहे. तिथल्या दगडी पटांगणात बसून दही-भात आणि लाडूचा प्रसाद ग्रहण केला. तेथून पुढे नारायणपूरला गेलो. येथे एकमुखी दत्ताचे मंदिर आहे. मूर्ती मोठी प्रसन्न आहे. परंतु व्यवस्थापन अतिशय गलथान आहे. ना भक्तांची रांग, ना प्रसाद देण्याची काही सोय. भयंकर गलका, एका ध्वनिवर्धकावरून कर्कश्श आवाजात दिल्या जाणा-या सूचना, प्रसाद, फुले इ. पायदळी तुडवले गेल्याने मंदिरात सर्वत्र झालेला चिकटा ! प्रस्तुत देवस्थानच्या भक्तांच्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही हेतू नाही, परंतु अतिशय दुर्दैवाची बाब म्हणजे शिस्त आणि भक्ती एकत्र नांदू शकते याची ब-याच जणांना समज नसते. त्यातूनच नुकत्याच घडलेल्या मांढरदेवी यात्रेतील मृत्यूंसारख्या दुर्घटना घडतात. बालाजी मंदिर आणि दत्त मंदिर या ठिकाणाच्या व्यवस्थेची तुलना मनात करत सातारा रस्त्याला लागलो. पहिल्या दोन तासांत दोन मंदिरे साधून आईने आपला इरादा सुरुवातीसच स्पष्ट केला !

सातारा रस्ता : मुंबई बंगलोर महामार्गाचा हा भाग. गेल्या काही दिवसात याच रस्त्याने तीनदा जाण्याचा योग आला. वाजपेयी सरकारने आपल्या कारकीर्दीत केलेल्या पापांपैकी एक म्हणजे सुवर्ण चतुष्कोन प्रकल्प - अशाच पापांसाठी त्यांना सत्ता सोडावी लागली. होय ! आपल्या देशात 'कर भरणा-या' नागरिकांसाठी अशा सुधारणा करणे हे पापच आहे ! 'डाव्यांच्या कुबड्यांवर' ज्या देशातील सरकार चालते, त्या देशात कदाचित पैसा जवळ असणे आणि तो खर्च करणे हेही पाप मानले जाईल !प्रवास काहीसा एकसुरी असल्यामुळे मग गाडीत गाणी, गप्पा, फराळ इ. सुरू झाले. अखेर कराडच्या पाशी आम्ही चिपळूण फाट्याला वळलो. आता रस्त्याच्या दुतर्फा झाडी, शाकारलेली घरे, शेते, गोठे, गायी-म्हशींचे कळप, कोंबड्या इ. दिसावयास लागले. पाटण ओलांडल्यावर जिकडे तिकडे हिरवाई नजरेत भरू लागली. कुंभार्ली आणि कोयना हे दोन घाट ओलांडून सरतेशेवटी आम्ही ३ च्या सुमारास चिपळूणला दाखल झालो. सकाळपासून प्रवासच करत असल्यामुळे सगळेच कंटाळले होते. मग 'काणे' उपाहारगृहात 'खाणे' आटोपून गुहागरकडे कूच केले.

चिपळूण ते गुहागर हा प्रवास माझ्या स्मृतीत कोरला गेलाय ! नजर जाईल तिकडे निसर्गाने पाचू उधळले होते. मधून मधून कोठे कोठे पाणी नजरेस येत होते. भगवान सहस्ररश्मी सागराच्या पाण्याला क्षितिजावर भेटायला आतुरतेने निघाले होते. सोनेरी संधिप्रकाशाने सारे दृश्य नाहून निघाले होते. मधोमध रस्त्याचा काळा आखीव पट्टा पोटाखाली घेत गाडी धावत होती. प्रभाकर जोगांचे 'गाणारे व्हायोलिन' सूर आळवत होते - 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' ...

गुहागरला पोहोचल्यावर प्रथम श्री व्याडेश्वराच्या मंदिरात गेलो. व्याडेश्वराचे मंदिर पेशवेकालीन आहे. मंदिर विस्तीर्ण आहे. भक्तनिवासाची सोय आहे. पुण्याच्या सवयीनुसार मी अभिषेकाची पावती फाडण्याच्या उद्देशाने कार्यालयात गेलो. परंतु तेथे करंदीकर गुरुजींनी सुचवले की शक्य असल्यास मी स्वत:च पूजा करावी. त्यानुसार दुस-या दिवशी सकाळी यायचे ठरवून निघालो. मंदिराच्या मागेच समुद्रकिनारा आहे. पर्यटकांची फारशी वर्दळ नसलेला तो किनारा पाहून पाण्यात पाय बुडवायचा मोह आवरला नाही ! शेवटी कोणाचेतरी घड्याळाकडे लक्ष गेले आणि आम्ही निघालो. किना-यावरच्या एकमेव दुकानात शहाळे प्यायलो. येथेही शहाळे दहा रुपयांना आहे हे पाहून आश्चर्य वाटले !

गुहागरपासून वेळणेश्वरापर्यंतचा प्रवास असंख्यवेळा रस्ते विचारत आणि चुकत पूर्ण केला !अखेर वेळणेश्वरात श्री. सरदेसाई यांचा पत्ता सापडला आणि हुश्श केले ! वेळणेश्वराचा भक्तनिवास हा काही भक्तांनी दिलेल्या देणगीमधून उभारलेला आहे. निवासावर भक्तांचे नामोल्लेख आहेत. अल्प मूल्य आकारून तो भक्तांस राहण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. येथील व्यवस्था श्री. सरदेसाई यांचे कुटुंब पाहते. पोहोचल्यावर रात्री मोदकाचे जेवण होते ! आईने लगेच मोदकाच्या आकाराचे तंत्र एक-दोन मोदक करून पाहून improve केले ! रात्री कमालीचा उकाडा होता. समुद्र खूपच जवळ असल्यामुळे असेल. आश्चर्य म्हणजे डास अजिबात नव्हते !सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन निघालो. श्री. सरदेसाई यांनी गरम पाणी, चहा इ. व्यवस्था उत्तम केली होती. पाऊण तासात गुहागरला पोहोचलो. करंदीकर गुरुजी पूजेच्या तयारीला लागले होते. मीही सोवळे नेसून 'मम' म्हणायला सिद्ध झालो ! खरं तर मला नेहमीच पूजा वगैरे म्हटले की मनावर थोडे दडपण येते. त्यातून संध्या लहानपणीच सोयिस्कर रित्या सोडलेली ! केशवाय नम:, नारायणाय नम:, माधवाय नम:, गोविंदाय नम: च्या पुढे माझी गाडी कधी गेली नाही. कोल्हापूरला काही वेळा केलेल्या पूजेमुळे माझी भीड जरा चेपली होती इतकेच. येथील पूजा हा मात्र एक अविस्मरणीय अनुभव होता. उष्णोदक स्नान, पंचामृत स्नान {देवाला :-) }, धूप - दीप इ. षोडश उपचारांनी पूजा संपन्न झाली. गाभा-यात बसून शंकराच्या पिंडीवर स्वत: जलाभिषेक करताना माझ्या भावना उचंबळून आल्या होत्या. गुरुजी रुद्रपठण करत होते. एके काळी मीही 'नमस्ते रुद्रमन्यवउतोतइषवे नम:' ची संथा घोकायचा प्रयत्न केला होता, पण माझ्या आरंभशूर स्वभावाने माझा घात केला. पूजा आटोपल्यावर गुहागर मध्येच अजून दोन देवळांना भेट दिली. 'श्री भैरी व्याघ्रांबरी देवस्थान' आणि 'दुर्गामाता मंदिर'. कोकणात एकंदरीतच मला देवळांची व्यवस्था अतिशय उत्तम ठेवल्याचे दिसून आले. मंदिरे सुंदर आणि प्रशस्त होती आणि सर्व देवळांत पूजा-अर्चा पाहण्यास पुजारीही होते. अगत्याने देवस्थानांची आणि तेथील कुलाचारांची माहिती देण्यास आणि भाविकांची चौकशी करण्यास ते उत्सुक दिसत होते. दुर्गामाता मंदिरापाशीही अतिशय अद्ययावत सुविधा असलेला भक्तनिवास आहे आणि तो अत्यल्प आकारात भाविकांना राहण्यास दिला जातो. उरलेला संपूर्ण दिवस ब-याच ठिकाणांना भेट द्यायची असल्याने आम्ही परत निघालो. वेळणेश्वराच्या जवळ पोहोचलो आणि घाटाच्या एका वळणावर अचानक खाली चमचमणारे निळे पाणी दिसले ! आदल्या दिवशी रात्री याच वाटेने गेलो तेव्हा अंधार असल्याने समुद्र इतका जवळ आहे हे ठाऊकच नव्हते! अकरा पर्यंत वेळणेश्वराला पोहोचलो. तेथे दर्शन घेतले आणि मंदिराच्या समोरच असलेल्या टपरीवर गरमागरम भजी खाल्ली. सरदेसाई यांच्याकडे न्याहरी करून हेदवीला जाण्यासाठी निघालो.

हेदवीचे देऊळ हे शब्दांनी वर्णन करण्यापेक्षा प्रत्यक्ष पाहणेच उत्तम ! रम्य, प्रशस्त, स्वच्छ परिसर, रंगरंगोटी केलेले सुबक देवालय, शांतता, एकांत, पक्ष्यांची नाजूक किलबिल ! विलासी प्रवृत्तीच्या माणसालासुद्धा येथे विरक्ती यावी ! मंदिरात गणपतीची दशभुजा मूर्ती आहे. हिरेजडित मुकुट आणि फुलांच्या सुंदर सजावटीने मूर्तीला विलक्षण सात्विक शोभा आणली होती. देवळात दर्शनाला गेले असता तीर्थ-प्रसाद मिळाला की मला विलक्षण समाधान लाभते, जे पुण्यात सहसा आढळत नाही. तीही मनीषा येथे पूर्ण झाली. गाभा-यात बसून आम्ही श्री गणेश अथर्वशीर्षाचे पठण केले आणि मग परमेश्वराचे ते वैभवसंपन्न रूप मनात साठवून परत निघालो. परत वेळणेश्वरास येऊन पुरणपोळीचे जेवण केले. भक्तनिवासाच्या उत्तम व्यवस्थेबद्दल अभिप्राय देऊन आणि सरदेसाई कुटुंबियांचा निरोप घेऊन निघालो.

पुढले स्थळ होते - डेरवण. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगांवर आधारित शिल्पे उभारण्यात आली आहेत. ब-याच शाळांच्या सहली येथे येतात. तेथेच एक गोशाळा आहे. दोन तास शिल्पकृती पाहून तेथून निघालो. आदल्या दिवशी चिपळूणला कॅमेरा रोल धुवायला (!) टाकला असल्याने आणि चिपळूणला काळभैरवाच्या देवळाला भेट द्यावयाची असल्याने चिपळूणला आलो. या दिवसाच्या प्रवासात ब-याच गोष्टी ओढून ताणून साधायच्या असल्याने उलट सुलट फेरे आणि वेळेचा काहीसा अपव्यय झाला ! जयदीपच्या आईला प्रत्येक गावातल्या प्रत्येक नातेवाईकाला भेटायचे होते आणि आमच्या मातोश्रींना प्रत्येक गावातले प्रत्येक देऊळ पाहायचे होते :-) मला फारसा प्रवास न करता निसर्ग सौंदर्य पाहायचे होते आणि आराम करायचा होता. त्यामुळे आम्ही सर्वांना पसंत पडेल असा प्लॅन बनवायचा प्रयत्न करत होतो. बाबा कोकणातल्या विविध ठिकाणांना कमीतकमी वेळात ( आणि अंतरात आणि खर्चात ! ) भेट कशी देता येईल याचा Travelling Salesperson च्या धर्तीवर विचार करत होते ! सध्याचे केंद्र सरकार सर्वांच्या मर्जीने कसे चालते कोणास ठाऊक !

चिपळूणहून निघून आम्ही क्षेत्र परशुराम येथे पोहोचलो. भगवान परशुराम हा अपरांताचा स्वामी. पृथ्वीवरची सारी जमीन दान करून टाकल्यावर परशुरामाने समुद्रात बाण मारून तेथपर्यंतची जमीन समुद्रापासून मिळवली अशी आख्यायिका आहे. हा चिंचोळा प्रदेश म्हणजेच कोकण. चित्पावनांचे मूळही परशुरामापर्यंत पोहोचते. त्यामुळे कोकणात येऊन परशुरामाचे दर्शन न घेणे हे काशीला जाऊन महादेवाचे दर्शन न घेताच परत येण्यासारखे आहे ! चिपळूणपासून साधारण १०-१५ किलोमीटरवर हे देवस्थान आहे. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आम्ही देवळात पोहोचलो. मंदिरात 'काळ काम आणि परशुराम' (ब्रह्मा, विष्णु आणि महेश) अशा तीन मूर्ती आहेत. बाजूला परशुरामांची शय्या आहे. मागे रेणुकामातेचे मंदिरही आहे. अंधार पडत चालल्यामुळे आणि संगमेश्वर वेळेत गाठायचे असल्यामुळे दर्शन आटोपून आम्ही लगेच निघालो.

रात्रीचा मुक्काम संगमेश्वर येथे श्री भिडे (जयदीपचे नातलग) यांचेकडे होता. त्यांचे घर साधारणपणे अर्ध्या पर्वतीइतक्या उंचीवर आहे. सामान घेऊन पाय-या चढत जाताना ब्रह्मांड आठवले ! अपरिचित कुटुंबात मुक्काम करायचा असल्याने, पोहोचल्यावर काही वेळ मी थोडासा अस्वस्थ होतो. माझ्या 'प्रायव्हसी' च्या कल्पना जरा वेगळ्या आहेत ! एखाद्या गावी काही कामानिमित्त जावयाचे असल्यास मी लॉजवर उतरतो. त्या गावात माझे थोडे दूरचे नातलग राहत असतील तरीसुद्धा. त्यांना थोडा वेळ भेटून येणे वेगळे, आणि चांगला परिचय नसताना घरी मुक्काम करणे वेगळे. प्रत्येकाचे खासगी रूटिन असते आणि त्यात व्यत्यय आणायला मला अजिबात आवडत नाही. जिथे स्वत:च्या लांबच्या नातलगांकडे मी राहत नाही, तिथे मित्राच्या नातलगांकडे राहायचे या कल्पनेने मी बराच अस्वस्थ होतो ! पण थोड्याच वेळात चहा पिता पिता चांगल्या गप्पा रंगल्या आणि परकेपणा दूर झाला. काही वेळाने अचानक तीन मांजरांनी तिथे प्रवेश केल्याने मला विलक्षण आनंद झाला ! मी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. पैकी एकाने माझ्याकडे अजिबात लक्ष दिले नाही. दुस-याने 'असेल कोणीतरी अगांतुक' अशी नजर टाकून सोफ्यावर बैठक जमवली ! तिसरे मात्र मी बोलावल्यावर जवळ आले. भिडे यांचे घर जुन्या धाटणीचे आहे. सारवलेले आंगण, पडवी, माजघर, स्वयंपाकघर असे. पण घरात सुविधा मात्र आधुनिक आहेत. फर्निचर आहे. हॉल मध्ये मोठा झोपाळा टांगलेला होता. कोकणातल्या मी भेट दिलेल्या प्रत्येक घरात मला झोपाळा आढळला. चांगली दोन-तीन माणसे बसतील असा. घरात कंप्यूटर होता. मी कंप्यूटर इंजिनियर आहे असे सांगून जयदीपने मला धर्मसंकटात टाकले ! मी कंप्यूटर इंजिनियर आहे हे समजल्यामुळे आजवर माझ्यावर अनेक वेळा मानहानीचा प्रसंग ओढवला आहे. कारण मला कंप्यूटरचे हार्डवेअर दुरुस्त करता येत नाही जे 'कोप-यावरच्या नेट कॅफेवाल्याला' पण येते ! तसेच मला 'Visual Basic' आणि 'Visual C++' येत नसल्याने मी जवळपास काही कामाचा नाही असे ब-याच जणांचे प्रथमदर्शनी मत बनते. सुदैवाने तसे येथे काही झाले नाही ! उलट जयदीपच्या बहिणीने कंप्यूटरवर काढलेली सुंदर चित्रे दाखवली. जेवायला कुळथाचे पिठले आणि भाकरी असा बेत होता. दिवसभराच्या दगदगीमुळे सारेच थकले होते. जेवणखाण झाल्यावर झोपायची तयारी केली. तेवढ्यात त्या तीन मांजरांनी पिंगपॉंग खेळायला सुरुवात केली ! मी प्रथमच मांजरांना चेंडू खेळताना पाहिले ! त्या तीनही मांजरांच्या आईने पिले लहान असतानाच येथली यात्रा संपवली होती. भिडे कुटुंबियांनी मग आईच्या मायेने या पिलांना वाढवले. रात्री भयंकर थंडी पडली ! वेळणेश्वराच्या उबदार वातावरणातून संगमेश्वरास एकदम कडाक्याचा थंडीत ! जर्किन आणि मिळतील तेवढी पांघरुणे अंगावर ओढून झोपलो ! सकाळी न्याहरीला आंबोळीचा बेत होता ! हा पदार्थ मी प्रथमच चाखून पाहिला. थंडी असल्यामुळे मी पाणी तापवण्याच्या चुलीपाशी थोडा वेळ छान शेकत बसलो. जयदीपने तेवढ्यात मला 'प-हा आणि डु-या' या कोकणातल्या नाल्यासारख्या चीजांचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. भिडे काका घराशेजारीच असलेल्या देवळात घेऊन गेले. एकंदरीतच कोकणातले वातावरण धार्मिक दिसते. दुपारी भिडे कुटुंबियांचा निरोप घेऊन आम्ही पुढे निघालो.

संगमेश्वराजवळच संभाजी महाराजांची समाधी पाहून कर्णेश्वर येथे गेलो. तेथे पांडवकालीन शंकराचे देऊळ आहे. ते पांडवांनी वनवासाच्या काळात बांधले आहे अशी आख्यायिका ऐकली. देवळात पालथ्या घातलेल्या दगडी पराती आहेत. ती म्हणे पांडवांची जेवणाची ताटे होती. एका ताटात दहा बारा माणसे सहज जेऊन उठतील ! तेथे मंदिराच्या भिंतीवर एक शिलालेख कोरला आहे. वाचणा-यास त्याचा अर्थ समजला तर म्हणे ती ताटे सुलट होऊन सोन्याने भरणार आहेत. आम्ही थोडा प्रयत्न करून पाहिला. शेवटी तो शिलालेख हा कुण्या उपद्व्यापी कार्ट्याने कर्कटक घेऊन तेथे कोरला आहे यावर माझे आणि जयदीपचे एकमत झाले. असेलच सोने नशिबात तर घरी चालून येईल. जाईल कोठे ? आई प्रत्येक मंदिरात चतुर्विध प्रकारे दर्शन घेत होती. एकदा साध्या डोळ्यांनी, मग सत्तावीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आणि चुकीच्या नंबरच्या चष्म्यातून, मग हिंदी चित्रपटातल्या कुठल्याही खलनायिकेला शोभेल अशा गॉगलमधून, आणि मग दुर्बिणीमधून !! त्यातून कोकणातल्या देवळांत पुजारी इतर ठिकाणांसारखे भक्तांना हाकलत नाहीत. त्यामुळे आईला देवळातून ओढून बाहेर आणण्याची जबाबदारी माझ्याकडे होती !

कर्णेश्वराचे दर्शन आटोपल्यावर आम्ही रत्नागिरीमार्गे पावसला निघालो. थोडा वेळ आम्ही समुद्राला समांतर चाललेल्या रस्त्याने चाललो होतो. एका बाजूला दर्या तर दुस-या बाजूला माडांच्या बागा. खारा वास सर्वत्र भरून राहिला होता. पावसला प्रथम स्वामी स्वरूपानंदांच्या आश्रमात गेलो. आश्रम शांत आणि भव्य आहे. मंदिर आणि स्वरूपानंदांची समाधी आहे. मंदिरात ब-याच संतांच्या तसबिरी आणि बोधवचने लावलेली आहेत. आदल्याच दिवशी तेथे उत्सव असल्याने पंधरा हजार लोक येऊन गेल्याचे समजले. येथे प्रसाद म्हणून मुगाची खिचडी आणि लोणचे देतात. तसेच भक्तांसाठी चहा/ कॉफी आणि कोकम सरबताची व्यवस्था आहे. दर्शन आटोपून आणि स्वरूपानंदरचित काही धार्मिक साहित्य विकत घेऊन आम्ही निघालो. जयदीपचे दोन नातलग श्री देशमुख आणि श्री काळे यांस भेट द्यायची होती. श्री देशमुख पावसला आश्रमाशेजारीच राहतात. ते एक लॉज चालवतात. तसंच त्यांचा कोकण प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे. त्यांचेकडे दोन पोपट पाहिले. खरंतर पिंज-यात जखडून ज्यांचं आकाशात भरारी घेण्याचं सुख लुटलं गेलं आहे असे पोपट पाहिले की माझ्या पोटात तुटतं. मी पूर्वी जेथे रहायचो तेथे आमच्या एका शेजा-यांनी एक पोपट पाळला होता. बरेच दिवस झाले तरी तो पिंज-यात धडपड करायचा. शेजारीच एक देऊळ आणि थोडी झाडं होती. संध्याकाळ झाली की एक पोपटांचा थवा तेथे यायचा. ते पाहिले की हा पिंज-यातला पोपट जिवाच्या आकांताने ओरडायचा. ते ऐकून आम्ही खूप सुन्न व्हायचो. येथले पोपट मात्र स्वत:ची थोडी करमणूक करून घेताना दिसले. दोघांपैकी एक खूप वटवट्या होता, तर दुसरा शांत होता. वटवट्या पोपट सतत बडबड करत होता तर दुसरा शांत पोपट मधूनच एखादा लाडीक आवाज करत होता. आणि शांत पोपटाने बोललेले वटवट्याला अजिबात सहन होत नव्हते ! मग तो त्याच्याकडे पाहून कर्कश्श ओरडायचा ! दुसराही काही कमी वस्ताद नव्हता ! आपण जणू या गावचेच नाही असा भाव आणून तो पाहिजे तेव्हा बोलत होता ! दुस-यावर वर्चस्व गाजविण्याची वृत्ती पोपटांमध्ये पण आहे तर ! श्री देशमुखांकडे थोडा कोकण मेवा चाखून पुढे निघालो. जयदीपला अजून एका नातेवाईकांची भेट घ्यायची होती, तेवढा वेळ मी एकटे पावसमध्ये भटकायचे ठरवले. उन्हे कलली होती. हवाही सुंदर पडली होती. सीडी प्लेअर पाऊचमध्ये टाकून हेडफोन कानाला लावून नदीच्या काठाकाठाने जाणा-या रस्ताने रेंगाळत जाऊ लागलो. 'गोविंद दामोदर माधवेति' चे भक्तीने ओथंबलेले, जसराजजींच्या गोड गळ्यातून निघालेले आर्त सूर कानात भरून घेत फिरताना अर्धा तास कसा संपला ते कळलेही नाही. मध्वाचार्यांनी रचलेल्या या संस्कृत भजनाची गोडी काही अवीट आहे ! ती शब्दांत व्यक्त करायला मी समर्थ नाही !

पावसहून गणपतीपुळ्याला जाण्यासाठी निघालो. पुळ्याला पोहोचेपर्यंत सूर्यास्त झाला. पुळ्याचा स्वयंभू गणपती डोंगरातून प्रगट झाल्यामुळे त्याला प्रदक्षिणा घालताना डोंगरालापण प्रदक्षिणा होते ! साधारण एक किलोमीटरचा प्रदक्षिणामार्ग आहे. पूर्ण प्रदक्षिणामार्ग उत्तम प्रकारे बांधून काढण्यात आला आहे. मंदिराच्या आवारात हत्ती आणि उंदराच्या मोठ्या मूर्ती आहेत. तेथेच लिहिलेली 'कृपया हत्तीवर आणि उंदरावर बसू नये' ही सूचना वाचून चांगलीच करमणूक झाली !मंदिराच्या बाहेर उभ्या असलेल्या काही मोटारींमध्ये 'धूम' आणि तत्सम चित्रपटांतली गाणी मोठ्याने वाजत होती. धर्मस्थळांचे रूपांतर पिकनिक स्पॉट मध्ये झाल्यावर होणारी ही प्रगती आहे.

रात्रीचा मुक्काम पुळ्याजवळ 'केसपुरी' येथे श्री जोगळेकर यांचेकडे होता. हे गाव पुळ्यापासून ८ किलोमीटरवर आहे. रस्ता समुद्राला लगतच आहे ! काही ठिकाणी तो समुद्राच्या खूपच जवळ आहे. रात्र झाल्याने लाटांचा आवाज तर येत होता पण दिसत काहीच नव्हते! त्यातून नुकतेच सुनामीच्या वेळेस कोकणातही काही ठिकाणी पाण्याची पातळी वाढल्याचे ऐकले होते ! अखेर केसपुरीत येऊन पावलो !केसपुरीतला मुक्काम तसा आरामाचा होता. दुस-या दिवशी उठून परत पुण्यासच जायचे असल्याने तशी घाई नव्हती. अंगणात जयदीपचा दादा, आत्या आणि कामाचे एक गडी यांच्याशी आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. कोकणातले उद्योग, पगारपाणी, जुन्या काळात लोक कोकणातून बाहेर का पडले, बाजारभाव, तिथली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती, असे बरेच विषय बोलून झाले. आमचे मूळ 'नेवरे' गाव पुळ्याजवळच कोठेतरी आहे म्हणे. त्याचाही विषय निघाला. अर्थात तसे मी माझे मूळ गाव 'पुणे'च मानतो ! रात्रीच्या जेवणात चविष्ट अशी फणसाची भाजी होती. दुस-या दिवशी उठून समुद्रकिना-यावर गेलो. किना-यावर आम्ही सोडून दुसरे कोणीच नव्हते. कोणसेसे पाणपक्षी रेतीवर तुरुतुरू चालत होते. दूरवर समुद्रात दिसणारे एक मोठेसे जहाज हा मानवी वस्तीचा एकमेव पुरावा दिसत होता. समुद्रात मनसोक्त दंगामस्ती केली आणि घरी परतलो. मग घरामागची मोठी बाग आणि शेत पाहिले. बांबू, चवळी, मिरची, सुपारी, नारळ, बरेच काय काय होते. तेवढेच वाफे, बांध, आंतरपीक इ. फंडे जरा क्लिअर झाले ! आवारात गोबर गॅसची टाकी पण होती. गोठ्यात म्हशी होत्या. एका म्हशीला तीनच दिवसापूर्वी वासरू झाले होते ! ते तर खूपच सुंदर आणि लाघवी दिसत होते. पण मी जवळ गेल्यावर म्हशीने शिंगे रोखून जरा concern दाखवला ! ती शांत झाल्यावर वासराबरोबर फोटोसेशन झाले ! न्याहरीला लिंबाचे लोणचे आणि गरम भात खाऊन आणि मग शहाळ्याचे अतिशय गोड पाणी पिऊन निघालो.

परतीचा प्रवास चिपळूणमार्गे होता. प्रवासात संमिश्र भावना मनात उचंबळत होत्या. कोकणाची सहल संपली म्हणून थोडी हुरहूर वाटत होती, आणि पुण्याची आठवणही येत होती ! येतानाचे अंतर सरता सरेना ! संध्याकाळच्या सुमारास कराडपाशी आल्यावर आईला नवा उत्साह प्राप्त झाल्याने कराडचा प्रीतिसंगम पाहण्यास गेलो. पुण्यातल्या कुठल्याही गल्लीबोळांचे भाईबंद शोभतील अशा अरुंद रस्त्यातून एकदाचे संगमाला पोहोचलो. हं ! कृष्णा-कोयना प्रीतिसंगम हा हल्ली मुळा-मुठा संगमाइतकाच हृदयंगम (!) आहे ! तिथे प्रत्यक्ष जाण्यापेक्षा जुन्या मराठी पुस्तकातील त्याचे वर्णनच वाचणे चांगले अशी माझी नम्र सूचना आहे. काठावर बाल-साहित्य संमेलन भरले होते. तेथून निघून हमरस्त्यावर आल्यावर हुश्श केले !
प्रवास वर्णनांमध्ये शक्यतो परतीच्या प्रवासाचे वर्णन नसावे असे मला वाटते !
स्वीट डिश ची चव जिभेवर राहू द्यावी. त्यावर पापड खाऊ नये !

8 Comments:

Blogger paamar उवाच ...

Hi 'The One Writer' !
Thnx for yr appreciation ! I will be more than happy to arrange for another konkan trip with u...
Even I had 2 plans which I cudnt execute : long walks on not-so-crowded roads, and cycling ! I didnt have time to do both :( Next time I plan to visit less number of places and spend more time on things that I cudnt do this time.
I agree with yr comment abt temples. Even I like temples that are not over-crowded. Hedvi is one such temple where u get the 'peace' that you are looking for.
btw, gimme yr mail id.

8.2.05  
Anonymous Anonymous उवाच ...

I liked your "pravas-varnan". You have "oghawati shaili". One small correction though: mazyamate mhashichya pilala "vasru" mhanat nahit. It is called "redku" or "pardu". Gaichya pilala "vasru" mhantat.

Anyway, keep it up.

- Neneji

31.8.05  
Blogger paamar उवाच ...

namaste neneji !
thnx for the correction ! Was little doubtful about using correct word for gender ('redku'/'pardu'), so decided to go ahead with word vasru :) I mean gai chya pilla sathi we use 2 diff. words - gorha/kalwad . but didnt know that abt mhashiche pillu !

31.8.05  
Blogger Girija उवाच ...

its too good!!!
prawas-varnane itki sundar asatat.. mhanje me suddha ekda prawas karun baghayla harakat nahi :))

17.1.06  
Anonymous Anonymous उवाच ...

aapratim......

aasach lihit raha....

- Anant

(to check out diff places in kokan
visit:

www.konkandarshan.com/ratnagiri/index.htm)

27.2.06  
Anonymous Anonymous उवाच ...

KHUP CHAN:

mi 1warsh jhale maharashtrat nahi,ata pahili pardesh wari madhe, marati kahi aikyala milat nahi ikde. ata tar diwali madhe punyat asto tar asa kela asta.. tasa kela asta...khup wichar yetat.ikde marathi koni nahi..tyamule asa watat hota ki aapan swatala wisarlo ahe...but pamra..tula wachun khup bara watala.. mi tujhe sarva blogs wachle..chan watala..aapan swathala bolata ahot asa watla..man-shanti jhali ..your writing is very nice, very clear abt subject...keep it up..

Thanks
Digambar

20.10.06  
Blogger abhijit उवाच ...

Mi tujha purn blog vaachun kaadhla ekda.

sundar aahe. Vinodache ang tar vaadadeet aahe.

pan ek gosht mala khatakali.
karadcha pritisangam vagaire junya 4thichya pustakatach vachava. pratyaksha jaoon baghanyachi garaj nahi vagaire.

arthat he tujhe mat aahe aani tujhya matacha purn adar thevun mi tula khalil don links , photo albums pahayla deto. tyanantar jar karadbaddalche tujhe mat badalale tar mala khup anand hoil.

Majha album: http://www.imagestation.com/album/pictures.html?id=2102139679
Ek mitr: http://share.shutterfly.com/action/welcome?sid=0IaNnDNq5ZMXaw

Dhanyavaad.

18.1.07  
Blogger TheKing उवाच ...

तुझे प्रवासवर्णन लिहून झल्यावर बरोबर दोन वर्षे आणि एक महिन्यांनी ही कमेंट लिहीत आहे. कोकणभूमी किंचितसी पाहिलेली असल्याने तुझा अप्रतिम लेख वाचून कोकणभेटीची ओढ उचंबळून आली आहे. जर पुन्हा कधी असा प्लान करणार असशील तर जरूर कळव, आम्ही नक्की येऊ. :-)

हा जरी पुणेरी भोचकपणा वाटला तरी आम्ही पक्के मुंबईकर बरं का! शिवाय आमची चाकरीसुद्धा सॉफ़्टवेअरच्या दुकानातीलच!!

27.2.07  

Post a Comment

<< Home