March 2, 2005

IT आख्यान

... अर्थात, माझा विडंबनाचा पहिला वहिला प्रयत्न !

गुरूंची विविध प्रकारे सेवा करून त्यांस संतुष्ट केल्यावर परमशिष्याने आपले गुरू परमपूज्य पामरानंद बृहस्पती यांस पुसले, "महाराज, अमेरिकेला जावयास कोणता उपाय/ व्रत/ उपासना योग्य ?" शिष्याची ज्ञानलालसा पाहून परम संतोष पावून महाराजांनी त्यास 'IT आख्यान' निवेदले. समस्तांस अमेरिकेचा पथ दिसावा यासाठी परम कृपाळू पामरानंदांनी केलेला हा उपदेश...

IT अध्यात्म धारेत दोन प्रमुख पंथ. अद्वैत आणि द्वैत. अद्वैतवादी असे मानतात की भरतात काम करणे आणि अमेरिकेत काम करणे यांत फरक नाही. द्वैतवादी असे मानतात की अमेरिकेत काम करणे हे भारतात काम करण्याहून भिन्न असून अमेरिकेत काम करणे अधिक उत्तम आणि शाश्वत आनंद प्राप्त करून देते. पामरानंद एकांगी विचारापासून अलिप्त असल्याने अद्वैतवाद्यांस अद्वैताचा तर द्वैतवाद्यांस द्वैताचा उपदेश करून संतुष्ट करतात.

अमेरिकेस जाऊ इच्छिणारे जीव चार वर्गांत मोडतात - बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. या चार वर्गांचे विवेचन याप्रमाणे :
बद्ध : अमेरिकेस गेले पाहिजे अशी जाणीव अजून ज्यांस झालेली नाही ते जीव.
मुमुक्षु : अमेरिकेस गेले पाहिजे अशी जाणीव होऊन ज्यांस अंतरिक तळमळ होत आहे ते जीव. अमेरिकेस जाण्यासाठी व्याकूळ होणे हे या अवस्थेचे प्रमुख लक्षण आहे.
साधक : अमेरिकेस जाण्यासाठी ज्यांनी साधना सुरू केली आहे ते जीव. यांत अनेक पाय-या असतात. नोकरी शोधणे यापासून ते व्हिसा प्राप्त होणे येथपर्यंत.
सिद्ध : साधना संपवून अमेरिकेस पोहोचले ते जीव.

अमेरिकेस जावयास उपासनेचे अनेक मार्ग आहेत. मार्ग जरी भिन्न असले तरी सर्व मार्गांचे अंतिम उद्दिष्ट अमेरिका हेच आहे. ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार योग्य मार्गाचा अवलंब करावा. प्रचलित मार्ग आहेत - कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, झूठयोग मार्ग इ.

कर्म मार्गात गीतेचा उपदेश ध्यानात ठेवून काम करावे. सॉफ्टवेअर डेव्हलप करावे पण अमेरिकेला जाण्याची आशा ठेवू नये. हा झाला निष्काम कर्मयोग. अमेरिकेला जावयाची इच्छा ठेवून झटून काम करणे हा सकाम कर्मयोग. चार पाच वर्षे काम करूनही अमेरिकेला जावयास न मिळाल्यास साधकाचा कर्ममार्गावरील विश्वास डळमळू लागतो, पण हीच सत्व परीक्षेची वेळ समजून संयम ठेवून साधना पुढे रेटावी.

ज्ञान मार्गात साधकाने MS अथवा PhD साठी जी.आर.ई. , टोफेल, गुरूंची सेवा करून Reco, Application अशी साधना करून अमेरिकेस प्राप्त व्हावे.

भक्ती मार्गात विविध भावांनी भक्ती करता येते. सख्य भाव, दास्य भाव,मधुर भाव इ. सख्य भावात अमेरिकेला गेलेल्या मित्राच्या Reference ने स्वत: अमेरिकेस जाण्याचा प्रयत्न करावा. दास्य भावात मॅनेजरची दास्य भावाने सेवा करून त्यास प्रसन्न करून घ्यावे. त्याचा पडेल तो शव्द झेलावा. तोच मग अमेरिकेचा मार्ग दाखवेल. मधुर भावात अमेरिकेत असलेल्या मुलाशी वा मुलीची लग्न करण्याचा प्रस्ताव मांडावा व त्यायोगे अमेरिकेस प्राप्त व्हावे. झूठयोग मार्गात अनेक कठोर उपायांचा अवलंब करावा लागतो. Resume वर नसलेले स्किल्स लिहिणे, खोटा एक्स्पेरिअन्स दाखवणे इ. त्रेतायुगापर्यंत (IT बूम) योग मार्गात यश मिळत असे. परंतु कलियुगात (IT क्रॅश नंतर) योग मार्ग अवलंबणे महत्कठीण ! त्यांत साधक गटांगळी खाण्यची शक्यता अधिक.

असो. झाले एवढे विवेचन पुरेसे झाले. यत्नाविण यश नाही हे ध्यानात ठेवून प्रयत्न करणे.
शुभास्ते सन्तु पन्थान: ।

( Writing this post from Minneapolis, US )

9 Comments:

Anonymous Anonymous उवाच ...

इतके सांगुन मुनीवर्य गुप्त झाले, पण अनेक साधकांच्या डोक्यात एक प्रश्ण वारंवार येत होता की 'स्वत: मुनीवर्य कोणत्या मार्गांचा वापार करुन अमेरिकेस प्राप्त झाले?'

17.3.05  
Anonymous Anonymous उवाच ...

hahaha ! good question :)
karma yog, u can say ! btw, at least till date i am 'adwait wadi' ;)

19.3.05  
Anonymous Anonymous उवाच ...

Everyone tells that only once he/she reaches US, 'Andar bat kisako malum hai' :)) just kidding don't take it seriously

19.3.05  
Anonymous Anonymous उवाच ...

mathya. tu minneapolis madhe kay kartoys ? its_me_kv@yahoo.com

5.4.05  
Blogger Aditya Kothadiya उवाच ...

punha ekada..classic one..
jabardast ahe tuze saracasm..

29.7.05  
Anonymous Anonymous उवाच ...

महाराज, प्रमाण!
आपण द्वैतवादावर सांगोपांग उपदेश केलात, आम्ही भरून पावलो. पण आपण अद्वैतवादाविषयी मौन बाळगले, हे इष्ट आहे काय? ही आपल्या एकांगी विचार न करण्याच्या भूमिकेशी प्रतारणा नव्हे काय? बोला महाराज बोला!
आपला अद्वैतवादी शिष्य,
ashish.scribe@gmail.com

17.1.06  
Blogger Girija उवाच ...

too good.. hats off to you!!!!

24.1.06  
Blogger Vaibhav उवाच ...

Namaskar,

Maza ha pahila anubhav.... Pamar gurujiche tatvadyana aaiknyacha.

Sundar tatvadyana. Me swata - UK madhey aahae parantu..... Swatachya deshat rahane ha ek veglacha anand asato.... which I am missing a lot.

27.4.07  
Anonymous Anonymous उवाच ...

hmmmmmmmmmm, dvaitvad ani advaitvad yavar amerikela na jatahi tyavar vad ghalnaryana kay bara mhanyacha? ani ho, amerikes jaun dvaitache convert zalele advait barech astil............

17.2.10  

Post a Comment

<< Home