October 11, 2004

तो

'तो' माझा एक नातलग आहे.
नातलग , खरं तर नको असलेला.
पण कितीही मनात असलं, तरी नातलग टाकून देता येत नाहीत...

जेव्हा जेव्हा एकटं वाटतं, तेव्हा तेव्हा तो भेटायला येतो.
तो कधी सांत्वनाचे चार शब्द बोलत नाही,
डोळ्यांमधले अश्रू पुसत नाही,
फाटलेल्या काळजाला ठिगळ लावत नाही.
तो डिवचतो, खिजवतो, चिडवतो,
वाकुल्या दाखवतो,
कधी मनाच्या भळभळणा-या जखमांवर मीठ चोळतो...

कधी एकटा येतो.
कधी आठवणींची भुतं घेऊन येतो.
कधी भेडसावणा-या चिंतांच्या सावल्या घेऊन येतो.
आणि जाताना निराशेचे मळभ मनावर सोडून जातो...

दर वेळी मी त्याला बजावतो : पुन: न येण्याविषयी.
पुढल्या वेळी तो त्याचीही आठवण करून देतो !
आणि इतकं असून मी त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही...
कारण,
कारण 'तो' मीच असतो...


असतो मा सद् गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।
मृत्योर्माऽमृतं गमय ॥
- बृहदारण्यक उपनिषद