December 4, 2006

| प त्रि का |

जेवणाच्या टेबलावर सलग तिस-या दिवशी मंदारने विषय काढला.
"आई, ते ... याचे काय करायचे?"
"कशाचे काय करायचे?"
"नाही म्हणजे नेहा ... म्हणजे आपले काल बोलणे चालले होते ना"
"हो. अरे सांगितले की तुला. कसली थेरं रे तुमची? आम्ही आहोत अजून तुम्हाला स्थळं पाहायला. तिच्या आई वडिलांना पत्रिका बित्रिका पाठवू दे. आम्ही पाहतो की.."
"अग पण .. म्हणजे मी काय म्हणतो, तिचा पत्रिका वगैरे वर फारसा (खरंतर अजिबात!) विश्वास नाहीये. त्यापेक्षा ती म्हणते की थोडे दिवस एकमेकांना भेटून परिचय करून घ्यावा, स्वभावाची ओळख पटेल म्हणून..."
"डोंबल ओळख पटतिये चार भेटींमधे. तीस तीस वर्षे संसार करून सुद्धा ओळख पटत नाही!" बाबांकडे तिरक्या नजरेने पाहत आईने शेरा मारला, "आणि तिचा विश्वास नसू दे. आपला आहे ना!"
"आहे का ?"
"वा ! मलाच विचारतोयस? लग्न तुला करायचंय का आम्हाला ? सगळं डीटेलवार पाहून सवरून करावं ना ? आयुष्याचा प्रश्न असतो, आणि हे सगळं तुझ्यासाठी चाललंय. आमचं आता काय राहिलंय भोगायचं ? ..."
"नको नको" गहिवरल्या गळ्यानं मंदार म्हणला "मी तिच्याकडून पत्रिका घेतो"
"पण तिचा विश्वास नाहीये ना ? नाही, तुमच्या पिढीचे कशावरूनही समज-गैरसमज होतात म्हणून आपले विचारले हो.. "
"आता ते बघतो न मी.. काहीतरी युक्ती करून मिळवावी लागेल"

तर असे मंदारने 'प्रोजेक्ट-पत्रिका' लॉंच केले !

---

सकाळी सकाळी पामराच्या फोनची रिंग खणखणली !
"हॅलो"
"पामर, माझे एक काम आहे"
"बोल"
"अरे ते लग्नासाठी पत्रिका जुळवतात ना, त्यात मेन मेन गोष्टी काय असतात?"
"गण, गोत्र, रास, नक्षत्र, नाड, असे बरेच असतात. १८ गुण जुळायला लागतात साधारण. शिवाय -"
पलिकडून फोन कट झाला.
"काहीतरी घोळ घालणार साहेब" असं पुटपुटून पामराने फोन ठेवला.

---

"हॅलो"
"Hey मॅन्डी! What a coincidence !" नेहाचा साईन्युसॉईडल टोन मंदारच्या कानात घुमला...
"काय झाले?"
"अरे आत्ता तुलाच ओर्कटवर स्क्रॅप करत होते आणि तुझा फोन आला ! हाहाहाहाहा."
"हाहाहाहाहा. टेलिपथी आहे!"
"नक्कीच.. काय करतोयस ??"
"मला विचारायचं होतं की या सन्डेला राशिचक्रचा शो आहे. जायचे का ?"
"अय्या शुअर. कुठे आहे?"
"टिस्मा मधे. मी तुला पिक-अप करीन. नंतर डिनरला जायचे का?"
"Oh ! I would have loved .. पण अरे आय हॅव टू गो टू माझ्या आज्जीचे घर.. डिनरला नेक्स्ट वीक जाऊ"
"शुअर"

"कोण रे होते फोन वर? आणि एवढे खुदुखुदु हसू कसले येतंय?" मातोश्री अवतीर्ण झाल्या.
"अग फ्रेंडचा फोन होता"
"मेल्या शुद्ध मराठी बोलता येईनासे झाले वाटते ! काय भाषा तुमची ! वीक काय, डिनर काय, संडे काय, फ्रेंड काय, छे छे. सगळी पिढी नासली आहे तुमची"
(स्वगत) "फ्रेंड म्हटले की मित्र का मैत्रीण हे स्पष्ट करायला लागत नाही :)"
"अगं मम्मीटले, ऑफिस मधे इंग्लिश बोलायची सवय झालीये. असो. मी आता बाहेर जातोय"
"उंडारा. रात्री किती वाजता येणारेस ? एक, दोन, तीन ?"

---

स्थळ : टिळक स्मारक मंदिर
प्रोजेक्ट : फेज वन कंप्लीट.
। रास : वृषभ ।

---

शनिवारी सकाळी नारायण पेठेतल्या १७६० क्र. च्या वाड्यात घुसून मंदारने 'अ. ती. उदास' अशी पाटी असलेले दार खटखटवले. अजयने दार उघडले.
"या. साहेबांनी इकडे धूळ कशी झाडली ?"
"इकडे आलोच होतो, जरा काम होते. म्हणले जरा चक्कर टाकू"
"बस. मी आईला चहा टाकायला सांगतो".
अजयचे तीर्थरूप एका तेलकट आरामखुर्चीत बसून जाड भिंगाच्या चष्म्यातून पेपर चाळत होते.तीच भिंगे रोखून त्यांनी मंदार कडे पाहिले. मंदारसारख्या (म्हणजे नक्की कशा ? कोण जाणे!! ) तरुणांनी अमेरिकेसच गेले पाहिजे असा त्यांचा सिद्धांत होता. नुकत्याच झालेल्या दंगलीच्या बातमीचे पान पुढ्यात टाकून त्यांनी मंदारला खडा सवाल केला -

"काय आहे तुमच्या पिढीसाठी या देशात?"
"काहीच नाही". मंदारने चटकन कबूल केले.
तेवढ्यात अजय चहा घेऊन आला. मंदारने नि:श्वास टाकला.
"अरे अजय, तुमची ती स्टार पार्टी कधी आहे रे ? मला आणि माझ्या मित्रांना यायचेय..."
आवडीचा विषय निघाल्याने अजयची कळी खुलली.
"आकाशातले तारे मोजून दिडक्यासुद्धा मिळत नाहीत" अशा आशयाचा कटाक्ष टाकून तीर्थरूप आत गेले.

---

मंदार उघड्या माळरानावर झोपून तारे निरखत होता. पाठीला खडे टोचत होते. बोचरा वारा अंगाला चावत होता !
"मॅन्डी, धिस ईज डॅम कूल... कसं नीतळ चांदणं पडलंय आणि वारापण किती निरभ्र आहे !"
'मॅन्डी' ला उचकी लागली. पण 'नीतळ आणि निरभ्र'चा अर्थ सांगायची ही वेळ नाही हे त्याला लगेच जाणवलं. कॉन्व्हेंट मधल्या मुलींना इतकं माफ करायला हरकत नाही, नाहीतरी आपल्याला पण इंग्लिश तितपतच येतं- त्याने उदारमतवाद स्वीकारून गाडी योग्य दिशेला न्यायचा प्रयत्न केला - "यु नो, ते तारे ... "
आकाशात कुठेतरी अंदाजे हात दाखवून मंदार म्हणाला "... माझं त्यांच्याशी काहीतरी नातं आहे"
"कसं काय?"
"ते पुनर्वसू नक्षत्र आहे.. माझं..."
"ओह सो स्वीट.. मग माझं सुद्धा कोणी तरी आहे तिथे ..."

---

प्रोजेक्ट : फेज टू कंप्लीट.
। नक्षत्र : मृग ।

---

"अरे मी आज एबीसी मधे जाणारे बुक्स घ्यायला. तू येणारेस का ?"
"हो चालेल. मला पण थोडी पुस्तके घ्यायची आहेत"

....

"अग इकडे आलोच आहे तर दगडूशेठला जाऊन येऊ"
"चालेल"
"मला ही मूर्ती फार आवडते"
"हो मला सुद्धा"
"ओह, परवा संकष्टी आहे वाटते.. ते बघ तिथे लिहिले आहे.. अभिषेक सांगायचा आहे?"
"चालेल!"

..

"अभिषेक सांगायचा आहे परवाचा."
"नाव?"
"नेहा"
"अग पूर्ण नाव सांग" मंदारने प्रॉंप्टिंग केले.
"गोत्र?"
"अय्या मला गोत्र नाही माहिती !!"
"नसेल माहिती तर *** असे लिहितो ?"
मंदारने परिस्थिती हातात घेतली - "नको नको, अग तुझ्याऐवजी उगाच भलत्या कुणाला तरी पुण्य लागेल. तू बाबांना फोन करून विचार"

---

प्रोजेक्ट : फेज थ्री कंप्लीट.
। गोत्र : कपि ।

---

मंदारने खिशातून एक चुरगळलेला कागद काढून पामराच्या पुढे पसरला.
"हे काय आहे?"
"वाच"
"वृषभ, मृग, कपि, ... म्हणजे बैल, हरीण, माकड. तुझ्या Could-be-wife बरोबरच्या सामिष भोजनाचा बेत दिसतोय"
"शट अप ****, मी असले वाटेल ते चरत नाही. मागच्या वेळेला नेहा म्हणली म्हणून उगाच थोडेसे चिकन चाटून - आय मीन - चाखून पाहिले"
"खाशील खाशील, सगळं खाशील."
"हे पहा थट्टा बास. हा जीवनमरणाचा प्रश्न आहे"
"मागच्या तीन वेळेला पण तू असंच म्हणला होतास"
"असीन. पण सो व्हॉट? हे बघ, मागच्या तीन वेळांना मी अनुक्रमे सव्वीस, सत्तावीस आणि अठ्ठावीस वर्षांचा होतो. आता एकोणतीस वर्षांचा आहे. त्यामुळे हा प्रश्न जीवनाचा कमी आणि मरणाचा जास्त आहे. हे नेहाच्या पत्रिकेचे डीटेल्स आहेत. हे पुरेत का ते सांग."
"अरे राजा, हे - हे असे एवढेच अर्धवट डीटेल्स तुला कोणी दिले? आणि एक कोष्टक असते - घरे-घरे असतात आणि त्यात आकडे आणि ग्रह असतात - ते कुठंय?"
"उफ ! ते पण लागेल ? अरे एवढेच मिळवता मिळवता माझ्या रक्ताचे पाणी आणि पाण्याचा घाम झाला आहे..."
मंदारने आपली सगळी प्रयत्नगाथा पामराला ऐकवली.
"आता आणखी ते कोष्टक कसे मागू?"
"कसे?? सांग - सुडोकू खेळायला हवे आहे म्हणून"
"पामर, प्लीज.. बी सिरिअस"
डोक्याला हात लाऊन पामर म्हणाला - "अरे देवा ! यासाठी मागे फोन केला होतास तू?? अरे पूर्ण ऐकून घेतले असतेस तर ही वेळ आली नसती. तिची नुसती जन्म वेळ आणि जन्म तारीख मिळाली तरी सगळी पत्रिका मांडता येते.. नेट वर फ्री सॉफ्टवेअर सुद्धा असतात..."
मंदारने हताशपणे पामराकडे पाहिले.
"म्हणजे इतके सगळे कष्ट मातीत गेले"
"हे बघ, असूदे. हे एवढे डीटेल्स जुळतायत तुझ्याशी असे वाटतंय मला. आणि तिचा असा (गैर) समज झाला असेल की तू खूप हौशी आणि रसिक आहेस"
"ते ठीक आहे, पण जन्मवेळ मागितली तर तिला समजेल ना !"
"हं. तेही बरोबर आहे..... ओके... मला एक सांग, तिचा वाढदिवस कधी असतो?"
"पुढच्याच गुरुवारी आहे"
"ओह! यू आर लकी. असं कर -
...
..."
"थॅंक्स पामर"

---

"Hey नेहा, अगं, मला एक सांग ... गुरुवारचा प्लॅन ... तू या जगात कुठल्या मंगल घटिकेस अवतीर्ण झालीस ? आपण अगदी त्याच वेळेला केक कापू ! What say?"
"मॅंडी !! यू आर सोss रोमॅंटिक !"

---

"आई, ही घे पत्रिका"
"अरे वा ! मिळवलीस वाटते ! मला पंचांग पाहू देत"
"अग आई, हे पंचांग मागच्या वर्षीचे आहे.. या वर्षीचे कुठे आहे??"
"अरे अकलेच्या कांद्या, गुण जुळवायचे कोष्टक दर वर्षी बदलत नाही"
"बर बर. पण म्हणलं उगाच रिस्क नको. आयुष्याचा प्रश्न आहे नाही म्हणले तरी ;)"

---

मंदार आणि नेहाच्या 'पत्रिकां'पासून सुरू झालेला प्रवास अखेर 'मंदार-नेहा' च्या लग्न'पत्रिके' पाशी पावला !
मंदार आणि नेहाचा 'प्रेम!!!'विवाह मोठ्या थाटात पार पडला आणि सर्व जण सुखाने राहू लागले !