डायरी २००७
२९ एप्रिल
दहाच्या सुमारास जाग आली. ब्रश-पेस्ट घेऊन बेसिनपाशी आलो तेव्हा अचानक आठवण झाली - कालच्याच सुमुहूर्तावर पाण्याचा पंप जळला होता आणि पाणी गायब झाले होते ! त्यामुळे नळाला पाणी असण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही वेड्या आशेने नळ सोडला तर चक्क पाणी होते ! बहुधा रिझर्व टाकीतले असावे. कसे का असेना, पाणी होते. मग धावत पळत बादल्या, पातेली - जमेल तसे पाणी भरले. एकीकडे वॉशिंग मशीनही लावले. सिंक मधे कालपासूनची भांडी साठली होती. त्यांना हात लावायच्या आतच पाणी गेले. आता पंप दुरुस्त करून घ्यायला लागेल. मी एका 'असहकारी' गृहरचना संस्थेत राहत असल्याने कोणतेही काम करायचे म्हणजे एक अडथळ्यांची शर्यतच असते. ही सगळी कामे आई बाबा आतापर्यंत बिनबोभाट करत होते. त्यांची किंमत आणि त्यांना होणारा त्रास आता एकेक करून समजतील...
घरात शिल्लक असलेले आणि लवकर संपवणे भाग असलेले खाद्यपदार्थ पोटात ढकलले. फारशी भूक वाटत नव्हती. मधेच आई बाबांचा फोन येऊन गेला. Singapore मधून बोलत होते. तेथपर्यंत प्रवास छान झाला असं म्हणले. आई बाबांना एवढ्या लांबच्या प्रवासाची दगदग सोसेल ना याची काळजी वाटत आहे.
दुपारी दोनच्या सुमारास आई बाबांचा पुन्हा फोन आला. सिंगापूरचा मोठा हॉल्ट संपून ते आता SFO साठीची फ्लाईट बोर्ड करणार होते. हॉल्टमधे सिंगापूरची फ्री टूरपण त्यांनी घेतली. सिंगापूर छान वाटले असं म्हणले. एकंदरीत प्रवास चांगला चालू आहे. तसं पाहिलं तर आई बाबा माझ्यापेक्षा अधिक स्मार्ट आणि व्यवहारिक आहेत :) त्यामुळे मी त्यांची काळजी करणे थोडे विनोदी आहे :)
दिवसभरात आई बाबांची आठवण मधून मधून येत होती. यापूर्वी मी अमेरिकेला गेलो होतो तेव्हा मात्र असे झाले नव्हते. निरोप घेणे कायमच जड जाते पण प्रवास सुरू झाल्यावर मात्र त्याचा विसर पडतो. कदाचित US ला गेल्यावर अर्चनाची भेट होणार याच्या आतुरतेच्या तो परिणाम असावा. यावेळी मात्र मी इथे 'एकटा' आहे ही जाणीव छळत आहे. एरवी देशात कुठेही गेलं तरी 'मनात येईल तेव्हा आपण घरी जाऊ शकतो' अशी एक भावना असते. देशाची सीमा ओलांडली की मात्र तसे वाटत नाही.
US ला अथवा पुण्याबाहेर कोठेही गेलो की तेथे पुणं, आमचं घर, इथले रस्ते, गर्दी, दुकानं, देवळं, इथले मित्र या सर्वच गोष्टींची ताटातूट होते, तसेच आई बाबांची सुद्धा. पण आता मात्र मी इथेच, त्याच घरात आहे, आई बाबांच्या आठवणी आणि खुणा इथल्या प्रत्येक वस्तूपाशी आहेत. त्यामुळे त्यांचा दुरावा प्रकर्षाने जाणवत आहे.
दररोजच्या स्पर्धेच्या जगात Peer Pressure जाणवेल अशा अनेक गोष्टी घडत असतात. नोकरी, शिक्षण, प्रमोशन, लग्न, मुलं, गाड्याघोडे ! विशेष करून ओळखीचे कोणी शिक्षण वा नोकरीसाठी परदेशी गेले की मनात दडलेला स्वदेश का परदेश हा प्रश्न उसळी मारून पुन्हा वर येतो आणि मनात खळबळ उठवतो. हे एक खरंतर किचकट समीकरण आहे ! यात बरीच variables येतात ! संधी, आर्थिक प्राप्ती, राहणीमान, स्वातंत्र्य, सामाजिक परिस्थिती, संस्कृती :) हे equation कसे सोडवायचे हे कुठल्याच शाळेत शिकवत नाहीत. किंबहुना ते सोडवायला एक ठराविक असे सूत्रही नाही; तुम्ही जे सोडवाल आणि उत्तर काढाल ते तपासायला परीक्षकही नाही ! ज्याचे त्यानेच सोडवायचे आणि तपासायचे ! पण या equation मधे अजून एक variable आहे असं आज जाणवतंय - ते म्हणजे 'प्रियजनांचा सहवास'. आपल्या प्रेमाच्या माणसांचा सहवास ही गोष्ट किती अमूल्य आहे हे त्यांच्यापासून काही काळ दूर झाल्याशिवाय नाही समजत ! जे नाही त्याची उणीव माणसाला लगेच जाणवते, पण जे सुख आहे - सहज, आपोआप, न मागता मिळालंय - त्याची किंमत ब-याचदा दुर्लक्षिली जाते... असो ! आता हे तत्वज्ञान पुरे !
स्वावलंबी नसलेल्या माणसाचं कसं पदोपदी अडतं ! साधी बाब - दुपारी दूध तापवायचं होतं म्हणून गॅसचा रेग्युलेटर चालू केला. गॅस-रेग्युलेटर चा नॉब चालू-बंद करणे ही गोष्ट नेहमीच माझ्या मनावर दडपण आणते. आज जाणवलं - गरज पडली तर "आई बघ न नॉब नीट बंद झालाय ना" हे वाक्य आता पुढले सहा महिने कामाचे नाही !
एरवी 'मिळत नसलेला' वेळ आज संध्याकाळी जाता जात नव्हता. मन रमवायला मग उगाचच जुने अल्बम पाहत बसलो. मुग्धाचा फोन होता. तिची सोमवारी जपानची फ्लाईट आहे. मी आता एकटाच असल्यामुळे 'जेवायला येतोस का' असं विचारत होती. माझी सर्वांना काळजी आहे :) विशेषत: जेवणासाठी बरीच आमंत्रणे आहेत. पण या दुर्मिळ संधीचा फायदा घेऊन मी स्वयंपाक शिकायचे ठरवले आहे :)
उद्या कॉलेजमधे लेक्चर आहे. डोळे मिटेपर्यंत तयारी करावी म्हणतो.