April 16, 2005

वृंदा आणि विष्णु

काही दिवसांपूर्वी लंच टेबलवर सहका-यांशी गप्पा मारता मारता श्रीकृष्णाचा विषय निघाला. माझ्या एका सहका-याने मत व्यक्त केले की विष्णु /श्रीकृष्णाने बरीच 'मजा' केली. श्रीकृष्णाने १६०० स्त्रियांची बंदिवासातून सुटका केल्यावर त्यांच्याशी लग्न केले या गोष्टीकडे त्याचा रोख होता. श्रीकृष्णाने समाजातील पत गमावलेल्या त्या दुर्दैवी स्त्रियांना स्वत:चे नाव आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे धाडस दाखवले हा पैलू त्याने विचारात घेतला नसावा. मी या विचारास विरोध केल्यावर आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ त्याने तुळशी-विवाहाची गोष्ट सांगितली.

शिव पुराणात मला वाचावयास मिळालेली ही कथा याप्रमाणे :
जालंधर नामक दैत्याने कठोर तप करून वर मिळवले. यानंतर तो उन्मत्त आणि अनियंत्रित बनला. त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रता असून तिची पुण्याई त्याच्या पाठीशी होती. यामुळे त्याचा वध करणे कोणास शक्य होत नव्हते. एक दिवस त्याची मजल पार्वती देवीकडे वाईट दृष्टीने पाहण्यापर्यंत पोहोचली. शंकराने त्याच्याशी घनघोर युद्ध आरंभले. जालंधराचा वध करण्यासाठी त्याची पतिव्रता पत्नी वृंदा हिच्या पातिव्रत्याचा भंग करणे आवश्यक होते. ही कामगिरी विष्णूवर सोपविण्यात आली. विष्णूने जालंधराचे रूप धारण करून आपले कार्य पार पाडले. हे जेव्हा वृंदेला समजले, तेव्हा तिने देहत्याग केला. परंतु देहत्याग करते समयी तिने विष्णूला दगड - शाळिग्राम होण्याचा शाप दिला. विष्णूनेही तिला 'तुळशीचे रोप' होण्याचा प्रतिशाप दिला. परंतु वृंदेच्या पातिव्रत्यामुळे संतुष्ट होऊन विष्णूने तिला वरही दिला, की तुळशीची पूजा केली जाईल आणि या घटनेची स्मृती म्हणून शाळिग्रामाशी (प्रत्यक्ष विष्णूशी) तुळशीचे लग्न लावले जाईल.

माझ्या मित्राचा, विष्णूने केलेल्या या अनैतिक कामगिरीवर कटाक्ष होता. ही गोष्ट वाचून माझ्या मनात काही विचार आले, जे माझ्या मित्राच्या मताशी अजिबात मिळतेजुळते नव्हते.

मला सांगा...
समजा
तुम्ही विष्णू आहात
आणि एखाद्या पतिव्रतेच्या पातिव्रत्याचा भंग करण्याची कामगिरी
तुम्हावर सोपविण्यात आली आहे.

तुम्हावर सोपविलेल्या या कामगिरीला
तुम्ही 'संधी' समजाल, का 'शिक्षा' ?