August 28, 2005

कुंपण

घराभोवती कुंपण हवं
म्हणजे आपलं जग ठरवता येतं
बाहेर बरबटलेलं असलं तरी
आपल्यापुरतं सारवता येतं
- चंद्रशेखर गोखले (मी माझा)


घराभोवती कुंपण हवं
म्हणजे आपलं जग ठरवता येतं
आपल्यापुरतं नीट सारवून
बाहेर खुशाल बरबटवता येतं
- पामर

कुंपणाच्या आत थुंकायचं नाही; बाहेर रस्त्यात चालतं.
घरात एक केसही जमिनीवर दिसता कामा नाही; खिडकी बाहेर डोके काढून केस विंचरावे, गुंतवळ सुखेनैव बाहेर फेकावेत.
घर कसं आरशासारखं लख्ख झाडावं; कचरा चौकात फेकावा.
घरात काळी बाहुली टांगावी; रस्त्यात शनिवार-अमावास्या लिंबं-मिरचीचा सडा घालावा.
सत्यनारायणाला घरी आपण काही सिरॅमिक टाईल्स ला चार भोके पाडून केळीचे खांब रोवत नाही ! पण गणेशोत्सव आला की महापालिकेने लाखो रुपये खर्चून बनवलेल्या रस्त्याला खड्डे खणून खांब रोवावेत. ते नंतर मातीने बुजवावेत, अगदीच गरज असेल तर.

कुंपणाबाहेरचं जग 'आपलं एकट्याचं' नसतं ! सगळ्यांचं असतं ! त्यामुळे ते नासावं. ते कोण्या एकाचं नसल्याने 'तुझ्या बापाचं का? ' असं पटकन विचारून समोरच्याचं तोंड बंद करावं !

चौकात कोंडाळं जमवून गप्पा छाटाव्यात. येणारे जाणारे जातील की हो बाजूने !
वाहतूक पोलिसांना अक्कल नाही म्हणून त्यांनी काही रस्ते एकेरी केलेत. आपण सरळ घुसावं.
सिग्नलपाशी थांबून वेळ वाया जातो. सरळ तोडावा !
पादचा-यांना तर नियमच नसतात ! वाहने वाले गेले खड्यात; मनात येईल तेव्हा आणि तिथे रस्ता ओलांडावा. ग्रीन सिग्नल पकडायला वेगात जाणा-या गाड्यांच्या समोरून पळावे! त्यात किती थ्रिल आहे !
दिवाळीत पुष्कळ फटाके उडवावेत. फटाक्यांच्या कागदांचा कचरा रस्त्यातच टाकावा ! नाहीतर दिवाळी आहे असे वाटणारच नाही ! नाहीतरी महापालिकेच्या सफाई कर्मचा-यांना दुसरे काम काय असते !
दही हंडीला सगळे चौक बंद करावेत. वाहने बाहेर कढायचे काही नडले आहे का !
मोठ्याने गाणी वाजवून ऐश करावी ! कान फोडावेत. न्यायालय आडवे आले तर कायदाच बदलावा ! अहो, आपलंच सरकार !
मांडवांमुळे वाहतुकीला त्रास होतो म्हणताय ? वीस दिवस घ्यायचे चालवून ! समाजाच्या धार्मिक भावना निगडीत असतात ना. त्यामुळे प्रत्येक रस्त्याला दोन मंडळे हवीतच ! अहो नेतृत्वगुण आणि नियोजन शिकतात लोक त्यातून !

रोज सरकारची आई-बहीण उद्धरावी आणि आपल्या देशात 'इथे काहीही होणार नाही, हे असेच चालायचे' असे हळहळून सुजाण नागरिकाचे कर्तव्य बजावावे.

भारताच्या प्रतिज्ञेत मी थोडी भर घालून थांबतो.
"भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यांतले काही महामूर्ख आहेत..."
जय हिंद ! जय भारत !