पेंग्विन्स, ब्लू व्हेल आणि किलर व्हेल्स
उत्तरेला खूप दूर एक बर्फाळ समुद्र होता. समुद्रात अनेक जलचर होते. महाकाय ब्लू व्हेल, कराल किलर व्हेल (ओर्कां), घातक शार्क्स, समुद्री कासवं, पेंग्विन्स, सील्स ...
पेंगविन्सचा एक राजा होता. त्याचं एक मंत्रिमंडळ होतं. एक लहान राजपुत्र होता. आणि राजाचं मन रिझवायला एक विदूषक होता.
पेंग्विन राजपुत्र मित्रांबरोबर खेळायचा. बर्फ़ाचे गोळे, ग्लेशियर वर घसरगुंडी, पोहायला शिकणं असा त्यांचा दिनक्रम असे. एकदा काय झालं, पेंग्विन राजपुत्र धाडस करुन जरा खोल समुद्रात पोहायला गेला. तिथे त्याला दिसला महाकाय ब्लू व्हेल. पाण्याच्या पृष्ठभागावर येत त्यानं मस्तकातून पाण्याचा मोठा फवारा उडवला. ते पाहून राजपुत्र चकित झाला आणि थोडा खट्टू पण.
घरी आल्यावर त्यानं वडिलांना सांगितलं, "बाबा, मी आज एक खूप मोठठा प्राणी पोहताना पाहिला. त्याच्या डोक्यातून कारंजं उडतं ! आपण तेवढे मोठे असतो तर किती मजा आली असती ना ! "
राजा मनातून रागावला. पंख पसरून आणि अंगावरची पिसं फुलवून म्हणाला, "एवढा मोठा होता तो ? "
राजपुत्र म्हणाला, "नाही बाबा. यापेक्षा खूप खूप मोठा !".
राजाने राजपुत्राला समजावलं, "दुःखी होऊ नको बाळा! मी तुला ब्लू व्हेल पेक्षा मोठा होऊन दाखवीन ".
पेंग्विन राजाने लहानपणीच फुगून फुटणाऱ्या बेडकीची गोष्ट ऐकली होती. त्यामुळे त्याने तो उद्योग काही केला नाही.
मग त्याने मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांना विचारलं, "आपण ब्लू व्हेल पेक्षा मोठे कसे होऊ शकतो "?
मंत्री गहन विचारात पडले. कोणाकडेच उत्तर नव्हतं!
एकदम विदूषक पुढे झाला आणि म्हणाला, "त्यात काय! सोप्पंय! इथे जो ओर्कां म्हणजे किलर व्हेलचा मोठा थवा आहे ना, आपण सगळे त्यांना चिकटून एकत्र पोहू. त्यांची पाठ आपल्या सारखी काळी कुळकुळीत आणि पोट अगदी आपल्या सारखं पांढरं आहे ! कुणाला कळणार पण नाही!".
राजेसाहेब खूष झाले आणि गळ्यातली केल ची माळ काढून त्यांनी विदुषकाच्या गळ्यात घातली.
"शाबास! आजपासून तू माझा मुख्य सल्लागार! आजच किलर व्हेल च्या राजाशी संपर्क करा !", त्यांनी आज्ञा दिली.
एक ज्येष्ठ मंत्री धाडस करून म्हणाले, "महाराज, ही कल्पना चांगली नाही. किलर व्हेल आपले शत्रू आहेत. आपण त्यांचं खाद्य आहोत."
"खामोश !" राजेसाहेब गरजले. "आपला शत्रू किलर व्हेल नाही. ब्लू व्हेल सर्वांत मोठा आहे म्हणून तो आपला शत्रू आहे ".
दुसरे मंत्री म्हणाले, "पण महाराज, ब्लू व्हेल आपल्याला कधीच खात नाहीत. ते फक्त क्रिल्स खातात."
"खामोश !" राजेसाहेब पुन्हा गरजले. "मी राजपुत्राला वचन दिलं आहे. मी माझं वचन मोडणार नाही."
काही मंत्री सहमत होईनात.
राजेसाहेब पुन्हा गरजले, "तुम्ही संपूर्ण पेंग्विन प्रजातीशी हरामखोरी करताय. हा समुद्राचा द्रोह आहे. पटत नसेल तर चालते किंवा पोहते व्हा."
पुढे काय झालं?
किलर व्हेलनी पेंग्विन्सला खाल्लं, का पेंग्विन्स आणि किलर व्हेल्सनी मिळून ब्लू व्हेलचा पिच्छा पुरवला, का पेंग्विन्सनी नवीन राजा निवडला?
प्रत्यक्षात असं झालं, की कथा लेखकाला 'रायटर्स ब्लॉक' आला. कथा पुढे कशी न्यावी हेच समजेना. मग त्यानी ठरवलं, आपण क्राउड सोर्सिंग करूया.
त्यानं वाचकांना सांगितलं, तुम्हाला कथेचा शेवट कसा पटतोय ते मला सांगा.
कसं सांगाल?
मत पेटीतून सांगा!
बहुमताला आवडेल असाच मी कथेचा शेवट करीन!
तर आपलं मत देणार ना?