याला शिक्षण ऐसे नाव ! (२)
(भाग २)
प्राथमिक शिक्षण:
५) पाढे :
प्राथमिक शाळेतील अजून एक तिरस्करणीय प्रकार म्हणजे पाढे ! आमचे काही शिक्षक आम्हाला प्रौढी मिरवून सांगत असत की आमचे १ ते ५० पर्यंत पाढे पाठ होते, उभे आणि आडवे पाढे पाठ होते ! वरतून आम्हाला पावकी, निमकी, अडीचकी, आणि अशाच कुठल्या कुठल्या *की येत नाहीत याची हेटाळणी करत ! तुमच्या या पावक्या आणि निमक्या तुम्हालाच लखलाभ होवोत. आम्हाला आमचा जन्म गुणाकार करण्यात घालवायचा नाहीये. आजकालच्या जगात कॅल्क्युलेटर उपलब्ध असतानाही 'आमचे पाढे वापरून कॅल्क्युलेटरच्या पेक्षा लवकर उत्तर येते' अशी शेखी मिरवणा-या लोकांची मला कीव करावीशी वाटते. मला कुठेतरी वाचल्याचे स्मरते की ब्रिटिशांनी भारतात रेल-वे सुरू केली तेव्हा काही लोकांनी म्हणे तिच्याशी घोड्यावर बसून शर्यत लावली होती ! ते यांचेच पूर्वज असावेत बहुतेक :) दहा-वीस पर्यंत पाढे करा पाठ. पण चुपचाप करा. त्याची कौतुकं नकोत.
माध्यमिक शिक्षण:
१. विषय:मराठी.
मराठी या विषयाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन रामानंदशी या विषयावर बोलल्यावर काहीसा बदलला. मराठीची सक्ती आणि काही अमराठी लोकांचा मराठीला विरोध हा विषय मी पुन्हा कधीतरी हाताळीन. भाषा ही प्रांतानुसार, जातीनुसार, कर्मानुसार बदलते. इतर भाषांचा तिच्यावर कमी-अधिक प्रमाणात प्रभाव पडू शकतो. या सा-या गोष्टींचा विचार करून भाषा विषय अतिशय काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. परंतु तसे होताना दिसत नाही. भाषा ही नुसती शिकता येत नाही, त्यासाठी किमान काही वाङ्मय प्रकार अभ्यासावे लागतात. भाषा शिकताना काही 'संहिता' (टेक्स्ट) असावी लागते ज्याच्या अनुषंगाने आपण भाषेचे ज्ञान मिळवू शकतो. यासाठी पाठ्यपुस्तकात विविध पाठ आणि कविता यांचा अंतर्भाव केलेला आहे. परंतु शालेय शिक्षणात याच बाबीचा विचार योग्य प्रकारे केलेला दिसत नाही. परीक्षा पद्धती अशी आहे की भाषेचे रूप आणि सौंदर्य अभ्यासण्याऐवजी विद्यार्थ्यांना पाठ आणि कविता यांचे पाठांतर करण्यास अथवा त्यातील संदर्भ लक्षात ठेवण्यास भाग पाडले जाते.
उदाहरणे द्यावयाची झाली तर - ससंदर्भ स्पष्टीकरण, गाळलेल्या जागा भरा, कविता लिहा, थोडक्यात उत्तरे लिहा, आणि सविस्तर उत्तरे लिहा हे मुख्य प्रश्न असतात. आणि या प्रश्नांची उत्तरे परीक्षेत लिहिताना पाठ्यपुस्तक वापरण्यास परवानगी नसते. ( ही 'ओपन बुक' टेस्ट नसते. ) यामुळे मुलांचा कल 'मार्गदर्शक वापरून उत्तरे पाठ करून लिहिण्याकडे असतो. एकंदर भर 'पाठांतर' याच गोष्टीवर आहे. मी बारावीत असताना एक चांगला बदल मी पाहिला. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत जवळपास सर्व पाठावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी मूळ उतारेही प्रश्नपत्रिकेत दिलेले होते. त्यामुळे पाठांतर करण्याचा मूर्खपणा जवळपास बंद झाला. परंतु हा बदल अजून शालेय स्तरावर मराठी आणि इतर भाषांसाठी लागू झाला आहे अथवा नाही याची मला कल्पना नाही.
दुसरा मूर्खपणा म्हणजे परीक्षेत वेळाची मर्यादा. मराठी विषयाचा पेपर सोडवताना वेळ हमखास कमी पडायचा. पेपर जेमतेमच पूर्ण होईल इतका कमी वेळ देण्याचे प्रयोजन काय ? अर्धा तास वेळ जास्त द्या ! ज्यांना हा वेळ वापरायची गरज नाही, ते पेपर देऊन उठून जातील ! अर्ध्या तासात इथे कोणाला दिल्ली गाठायची आहे !! परंतु मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे 'आपण का शिकतो' हेच माहीत नसल्यामुळे अनावश्यक गोष्टींना अती महत्त्व प्राप्त झाले आहे.
२) विषय:इतिहास.
इतिहास हा विषय निघाला म्हणजे सर्वप्रथम माझ्या हाताच्या मुठी त्वेषाने आवळल्या जातात. नाही. तुम्हाला वाटले असावे तसे मुघल अथवा ब्रिटिश यांच्या जुलमी राजवटीची आठवण आल्यामुळे नाही !! तर परीक्षेत घटनांचे 'सन' विचारणारे आमचे जे परमपूज्य शिक्षक होते त्यांची आठवण आल्यामुळे ! पानिपतची पहिली लढाई कधी झाली, तिसरा बाजीराव कधी मेला, आणि अकबराचा जन्म कधी झाला ! जुळवा जोड्या ! यापेक्षा या शिक्षकांना जोड्याने का मारू नये हे मला समजत नाही ! मुघलांच्या अमदानीत छळ करण्याचे जे विविध प्रकार होते - टांगून ठेवणे, आसूडाने फोडणे, हत्तीच्या पायी देणे, नाकात मिठाचे पाणी ओतणे, मिरचीची धुरी देणे, या सर्वांचा प्रयोग करून पहायला ही मंडळी चांगली आहेत.
इतिहासाचे योग्या आकलन झालेली माणसेच इतिहास घडवतात. याचे उदाहरण हवे असेल, तर हिटलरने माईन काम्फ मध्ये आपल्या इतिहास शिक्षकांबद्दल काढलेले गौरवोद्गार वाचा, त्याचा इतिहास शिकण्याचा अनुभव वाचा. आम्ही आमचे शालेय जीवन 'दुस-या महायुद्धात जर्मनीचा पराभव का झाला' हे दोन-ते-तीन वाक्यात लिहिण्यात आणि 'भारतास स्वातंत्र्य कसे मिळाले' हे पाच-ते-सहा वाक्यात लिहिण्यात वाया घालवले ! इतिहास अगदीच 'हरितात्या' स्टाईलने शिकवावा असे नाही, परंतु त्याला जिवंत तरी करावे.
मी शिकलेला इतिहास हा ठिगळ लावलेल्या आणि तरीही अपु-या पडणा-या गोधडीसारखा होता. आम्ही भारतीय स्वातंत्र्यलढा ३-४ वेळा तुकड्या-तुकड्यांमधे शिकलो. आर्य संस्कृतीच्या थोड्या अर्ध्या कच्च्या, अर्ध्या खोट्या गोष्टी शिकलो. मधूनच संदर्भहीन असा मध्ययुगीन भारत शिकलो. आणि एवढे करून आम्हाला वर्तमानपत्रात येणा-या काश्मीर, पॅलेस्टाईन, चेचेना, व्हिएटनाम, तिबेट या प्रश्नांची पाळेमुळे कोणी शिकवलीच नाहीत !
परंतु प्रथम लेखात लिहिल्याप्रमाणे चुकांचा पूर्ण विचार येथे मांडणे शक्य नाही.
इतिहास या विषयाचे धाकटे भावंड म्हणजे 'नागरीकशास्त्र'. यात आम्ही काय शिकलो ? तर पालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, राज्य सरकार, केंद्र सरकार या सगळ्या ठिकाणी कोण जातं आणि त्यांनी काय काय कामे कारायची आहेत ( जी ते कधीच करत नाहीत ! ). राष्ट्रपतीचा पगार आणि पंतप्रधान पदासाठीची वयोमर्यादा असली महामूर्ख माहिती पाठ करताना विद्यार्थ्यांना 'चांगले नागरीक कसे बना' हे कधीच सांगितले नाही.
३) विषय:गणित आणि विज्ञान.
गणित आणि विज्ञान शिकण्याचा दृष्टिकोन पाचवी पासून दहावीपर्यंत अधिकाधिक 'शास्त्र शाखेला' उपयुक्त असा होत गेलेला दिसतो, जे अतिशय घातक आहे. शिक्षणाची रचना ही अतिशय लवचिक आणि 'मॉड्यूलर' असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याला ज्या विषयांत रूची आहे, ते विषय निवडण्याची मुभा दिली गेली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने अमुक एक १० विषय घेतलेच पाहिजेत असा अट्टाहास कशाला ? याउलट ही निवड विद्यार्थ्याला करू द्यावी,आणि त्याने केलेली निवड त्याच्या गुणपत्रिकेवर नोंदवावी. विनाकारण सर्व विषय सक्तीचे करण्याच्या या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमधे शिक्षणाची अप्रीती निर्माण होते. मी स्वत: जीवशास्त्र हा विषय अतिशय जिवावर येऊन शिकलो. काही लोक असा दावा करतील की प्रत्येक ज्ञानशाखेची मूलभूत माहिती असणे आवश्यक आहे. पण सध्या आस्तित्वात असलेल्या अभ्यासक्रमात मला मूलभूत ज्ञानावर भर दिलेला अजिबात दिसत नाही. मला अजून आठवते : दहावीच्या परीक्षेत महामूर्ख एस.एस.सी. बोर्डाच्या पेपर सेटर्सनी 'कानाची' आकृती काढायला सांगितली होती ! ही परीक्षा जीवशास्त्राची आहे की चित्रकलेची ? शहाणा शिक्षक हाच प्रश्न वेगळ्या प्रकारे विचारू शकतो - पेपरात कानाची आकृती देऊन, विद्यार्थ्यांना त्यातील विविध भागांना नावे देण्यास सांगता येईल. याद्वारे विद्यार्थ्याच्या ज्ञानाची परीक्षा जरूर होईल.
आमच्या शाळेत सातवीपर्यंत पेपरात 'प्रयोग लिहा' असा एक प्रश्न विचारत ! प्रयोग 'लिहायचे' नसतात, 'करायचे' असतात, हे या नंदीबैलांना कधी समजले नाही !तीच त-हा गणिताची. म्हणे अंतर्वर्तुळ काढा ! आज संगणकावर जी सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत, त्यांत हे सारे करता येते. हाताने ते एक-एक मिलिमिटर कशाला जुळवत बसायचे ? ज्या विद्यार्थ्यांना पुढे कला शाखेला जायचे आहे, त्यांना ट्रिगॉनॉमेट्री चा काय उपयोग ? पण विचार करण्याचे कष्ट कोण घेणार ? आणि आम्ही फुशारकी कशाची मारतो, तर किती लाख मुले दहावीच्या परीक्षेस बसली !
(क्रमश:)