October 6, 2004

बाल मित्र-मैत्रिणी !

"माननीय अध्यक्ष, आदरणीय गुरुजन आणि माझ्या बाल मित्र-मैत्रिणींनो" !
भावे प्राथमिक शाळेत, हा आमच्या बाल-सभेतल्या प्रत्येक भाषणाचा ठरलेला मायना असायचा !
परवाच 'वाडेश्वर' मधे आमचा अड्डा जमला आणि खूप धमाल केली.
आज बाल-मित्र-मैत्रिणींबद्दल काही...

मी पहिल्या इयत्तेत असताना भावे प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. पुढल्या ४ वर्षांत खूप जिवाभावाचे मित्र मिळाले. सुदैवाने 'boy friend' आणि 'girl friend' या संकल्पनांचा तेव्हा उदय झाला नव्हता !
लहान वयातली मैत्री काही औरच ! त्या दिवसांत भविष्याची स्वप्नं नव्हती, वर्तमानाची पर्वा नव्हती ( ती करायला आई-बाबा होते ! ) , आणि भूतकाळाची सुख-दु:खे उगाळावीत एवढा भूतकाळही गाठीशी नव्हता !
स्पर्धा आणि त्यासोबत येणारी राग-द्वेष-गटबाजीची पिलावळ नव्हती. अशा वयात झालेली ओळख ही घट्ट मैत्रीत कशी रूपांतरित झाली ते कळलेही नाही.
शाळेत असतानाचे अनेक उपक्रम असे होते, ज्यांत मुले मुली एकत्र येउन उत्साहाने काम करत. मग ते स्नेह संमेलन असो, सहल असो, रेडिओ-कार्यक्रम असोत, बाल सभा, गोष्टींचा तास वा खेळाचा तास असो. ते वय असं होतं, की "बाई मला शू लागली ! जाऊ ?" असा प्रश्न कोणी वर्गात उठून बिनदिक्कत विचारावा ! त्यामुळे त्या वयात झालेल्या मैत्रीत 'संकोच' असा कधी आलाच नाही. त्या मैत्रीत फक्त प्रेमाची साखरच होती असं नाही ! मारामारीचे तिखट होतं, 'बाकाच्या या रेषेच्या इकडला भाग माझा' ची चिंच होती, 'बाई ऽऽऽ याने गृहपाठ केला नाही' या चहाड्या-चुगल्यांचे मिरे होते, आणि आपल्या सुहृदाला कुठं लागलं-सवरलं की डोळ्यात येणारं पाणी खारट होतं...
चौथीत गेलो आणि मैत्रीत प्रथमच थोडा दुरावा जाणवू लागला. आंब्यांच्या आढीत जे काम नासक्या आंब्यांचं, ते काम करणारेही काही होते ! मग कधीतरी 'नुस्ता मुलींशी गप्पा मारतो' असे टोमणे ऐकू यायला लागले, तर कधी 'मुलींत मुलगा' / 'मुलांत मुलगी' लोम्बडा/डी ची चेष्टा कानावर यायला लागली. मग व्हायचे तेच झाले ! स्वत:च्या कोषात गुरफटून घेणं... पुढे पाचवीपासून मुला-मुलींची शाळा वेगळी झाली. वर्षा-दोन वर्षांपूर्वीपर्यन्त एकमेकांशी गुजगोष्टी करणारे आम्ही 'समोरून आल्यावर ओळख दाखवायची की नाही ?' या गहन प्रश्नात पडलो !
वर्षं सरली... शिक्षणाचा श्रीगणेशा एकत्र केलेले आम्ही, पदवीच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो. आणि मग कोणाच्या तरी डोक्यात कल्पना आली : आपण भेटावं... कुठं ? चौथीच्या वर्गात ! चौथीच्या शिक्षकांसह !! उत्साही मंडळी कामाला लागली आणि ८९ सालच्या आमच्या हजेरीपटावरची धूळ झटकली गेली ! शक्य तेवढे जण जमले, आणि मग भेटत राहिले. एक हरवलेलं नातं पुन्हा शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला...
काळ थांबत नाही , जीवनाच्या वाटा एकमेकांना छेदतात असंही नाही. आज आमच्या ग्रुप मधे वेगवेगळ्या वाटा चोखाळलेले अनेक जण आहेत. कोणी इंजिनिअर, कोणी बॅंकर, कोणी भाषापंडित, कोणी डॉक्टर, तर कोणी सैन्यात ! काही भारतात, काही अमेरिकेत, तर काही जर्मनीत !

यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महादधौ ।
समेत्य च व्यपेयातां तद्वत् भूतसमागम: ।।
पण तंत्रज्ञानाने थोडा फरक पडलाय ! संसार-सागराने हजार मैल दूर वाहून नेलेले दोन ओंडके, आज 'orkut' किंवा 'yahoogroup' वर एकत्र असू शकतात !! आमचीही मैत्री अशीच online/offline टिकून आहे ! ती तशीच अबाधित रहावी, अशी परमेश्वराचरणी प्रार्थना !

October 4, 2004

धन्य ते गायनी कळा ।

माझी कालची सायंकाळ सप्त सुरांनी चिंब भिजवली. फार दिवसांनी असा योग आला. 'सुरेल सभे'ने संजीव अभ्यंकरांची मैफल आयोजित केली होती. ती जहिरात खरे तर माझ्या नजरेतून निसटली होती, पण माझा मित्र संदीप जोगळेकर याने मला आवर्जून कार्यक्रमाची माहिती दिली. सायंकाळी पांच वाजता अस्मादिक गरवारे कॉलेजच्या सभागृहात पोहोचले. याच सभागृहात एखाद-दोन वर्षापूर्वी जयदीप बरोबर मी शिवकुमार शर्मांचे संतूर वादन ऐकले होते ; त्यांनी छेडलेल्या 'पहाडी धून' च्या सुरांनी थेट "करेजवा कटार" लावली होती ! ठीक साडेपाच वाजता मैफलीला सुरुवात झाली.
शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी 'तानसेन' तर नाहीच, पण 'कानसेन' ही नाही. अर्थात साखरेची गोडी समजायला, साखरेचे पृथक्करण कशाला करता यायला हवे ? पण त्यामुळे माझे चार शब्द हे 'जाणकार' रसिकाचे नसून 'अज्ञ' रसिकाचे आहेत ! संजीव अभ्यंकर हे रसराज - पंडित जसराजांचे पट्टशिष्य. त्यांचे गायन प्रत्यक्ष मैफिलीमधे प्रथमच ऎकत होतो. त्यांनी गायनाची सुरुवात 'मधुवंती' रागाने केली. त्यानंतर 'गौरी' आणि 'केदार' गायला. मध्यंतरानंतर गायलेले 'गोरख कल्याण' आणि 'भिन्न षड्ज' हे दोन्ही राग मी प्रथमच ऐकले. मैफलीची सांगता त्यांनी 'देस' रागाने केली. मला काय, साखर, गूळ वा मध, सारंच गोड! संजीव हे रसिकांचे अतिशय लाडके गायक. कला सादर करताना प्रेक्षकांशी संवाद साधण्याची हातोटी त्यांना प्राप्त आहे.
तबल्यावर केदार पंडित यांनी अतिशय साजेशी आणि पोषक साथ केली. 'संवादिनी' (harmonium) वर 'सुयोग कुन्डलकर' हा कलाकार होता. अरविंद थत्ते यांचा हा शिष्य. संजीव अभ्यंकरांच्या कित्येक ताना संवादिनीवर जशाच्या तशा उचलून त्याने संजीवजी आणि प्रेक्षकांची दाद मिळविली. सुयोग हा भावेस्कूल मधे माझ्या वर्गात काही काळ होता. लहान वयात वाद्यावर मिळवलेले प्रभुत्व हे त्याची गुणवत्ता आणि साधनेची कल्पना देतात.
सुरांनी भारलेल्या वातावरणातले ते तीन तास आता स्मृतीच्या कप्प्यात जपून ठेवायचे आहेत ...