October 9, 2008

आवडलेले थोडे काही

पहाटे पहाटे पूर्व क्षितिजावर ढगांच्या दुलईतून लाल चुटुक फळानं बाहेर डोकवावं, सोनेरी झबलं लेऊन चांगलं हातभर वर यावं. खिडकीच्या पडद्यातून तिरप्या किरणांनी हळूच आत यावं आणि चेह-याशी लडिवाळपणे खेळावं. म्हणावं - "खूप झोप झाली !" मग आपणही त्यांना प्रतिसाद देत डोळे किलकिले करावे.

या खो-खो च्या खेळानं काहीसं असंच मला जागं करायचा प्रयत्न केलाय! सारिका, ’खो’ दिल्याबद्दल धन्यवाद !

---

खरं सांगायचं तर मला पद्यापेक्षा गद्य अधिक भावतं. त्यामुळे माझं कवितांचं वाचन विशेष नाही. (म्हणजे गद्याचं आहे असं नाही!)

मला भावलेल्या कवितांमधील एक :

झाडावरून प्राजक्त ओघळतो
त्याचा आवाज होत नाही
याचा अर्थ असा नाही की
त्याला इजा होत नाही

कवी : चंद्रशेखर गोखले. (’मी माझा’ मधून)

चारच ओळी, पण मनाला भिडणा-या. डोळ्यांसमोर जिवंत चित्र उभ्या करणा-या.

---

आज विजयादशमी. माझ्या आळशीपणाने माझ्याभोवती आखलेल्या सीमा ’खो’ च्या निमित्ताने, ’उसन्या शब्दांनी’ का असेना पण ओलांडल्या हे ही नसे थोडके !