प्रिय अर्चनास...
16 August
प्रिय अर्चना,
एरवी मराठी म्हटले की एक तर ब्लॉग साठी लिहिले जाते, नाहीतर क्वचित ट्वीटर साठी. पण आत्ता ही फाईल मात्र तुला पाठवायचे पत्र म्हणून लिहीत आहे ! आणि त्यामुळे हे पत्र लिहिताना खूप छान वाटत आहे.
आपण म्हटलो होतो ना की गेल्या इतक्या सगळ्या दिवसांत आपल्या गप्पा खूप आणि खूप-विस्कळीत अशा होत होत्या :) इतकं काही बोलायचं होतं की कधी आणि कसं बोलावं तेच समजायचं नाही आणि मग संभाषणाचे धागे एकात एक गुंतत जायचे ! आणि दीड महिना बडबड करून पण विषय कधीच संपले नाहीत ! आणि आज सुद्धा मी अशाच गुंत्यात अडकलोय... गेला दीड महिना खरंच स्वप्नवत गेला. त्यातल्या इतक्या सुंदर स्मृती मनात गर्दी करत आहेत की पत्रात काय लिहायचं, आणि कुठल्या क्रमानं लिहायचं तेच समजत नाहीये ! पण कसंही लिहिलं तरी तुला ते नक्की आवडेल याची खात्री आहे !
SFO हून प्रवासाला सुरुवात केल्यापासून मी फ्लाईट मधे जवळपास पूर्ण वेळ झोप काढली. डोळा लागेपर्यंत, security check च्या पलिकडून हात हलवून निरोप देणारी तूच डोळ्यासमोर येत होतीस ! झोप अर्थातच काही विशेष सुखाची नव्हती - मान आणि डोके दुखायला लागले. मला फ्लाईट मधे एकतर नीट झोप लागत नाही, आणि त्यात जेवणासाठी अथवा शेजा-यांना सीट वरून उठायचं असल्यास आपल्यालाही उठावं लागतं त्यामुळे जी थोडीफार झोप लागते त्याचाही विचका होतो. त्यामुळे जेवण तर एकदाच घेतले आणि मग तू दिलेला शिरा खाल्ला. बहुतेक माझ्या परतीच्या फ्लाईटची तारीख बदलताना त्यात जेवणाचा पर्याय नोंदवायचा राहिला असावा ! त्यामुळे या खेपेला मला ’एशियन व्हेज’ पर्याय काही मिळणार नाही असे लक्षात आले ! पण मग जे कोणते जेवण मिळेल ते पाहू, ठीक वाटल्यास खाऊ असा विचार केला. उपलब्ध पर्यायांपैकी मी Bibimbap हा पर्याय निवडला ! याचा उच्चार कसा करायचा हे माहीत नसल्याने मी इंग्रजीतच लिहीत आहे. अन्यथा मूळ उच्चार माहीत नसताना स्वत:चे डोके लावून चुकीचे उच्चार ’बनविण्याच्या’ पद्धतीमुळे इंग्रजी (किंवा कुठल्याही अ-मराठी) शब्दांचे आचरट उच्चार आपल्याकडे प्रचलित झाले आहेत. उच्चार माहीत नसेल तर विचारून घ्यावा ! उदा jalapeno (’हालपेन्यो’ हा काहीसा जवळ जाणारा उच्चार आहे) ची ’जलपिनो’, ’अलपिनो’ अशी बरीच रूपे इकडे ऐकायला मिळतात :) असो. तर Bibimbap - पांढरा भात, काही भाज्या आणि 'Gochujang' (!) असे हे जेवण असते. 'Gochujang' हे मिरचीच्या पेस्ट सारखे प्रकरण असते आणि ते मला फारच चविष्ट वाटले. SFO च्या कोरियन मार्केट मध्ये मिळते बहुधा. चाखून बघ ! बाय द वे, शिरा फक्कड जमला होता ! अगदी आई सारखा !!
प्रवासात प्यायला गरम पाणी मात्र आठवणीने मागून घेत होतो. कोरियन एअर ची सेवा मला छान वाटली. अतिशय अगत्याची. फक्त आपल्या आणि कोरिअन लोकांच्या इंग्रजीचे गोत्र अजिबात जुळत नाही ! मागच्या प्रवासाची आठवण आली, मला चहा हवा होता, आणि माझा मराठी जिभेवरचा (!) ’टी’ हा उच्चार कोरिअन हवाईसुंदरीला काही केल्या समजेना ! शेवटी लिहून दाखवायची वेळ आली !!
माझा एक सहप्रवासी मंगोलियाला चालला होता तर दुसरी कन्यका - ही चांगली सुस्वरूप होती ;) - कंबोडिया ला चालली होती.
सोल च्या इंचन विमानतळावर उतरल्यावर तिथल्या प्रशासनाने प्रत्येकाची थर्मामीटरने तपासणी घेण्याची व्यवस्था केली होती आणि मगच पुढे जाऊ देत होते ! हा तापमापक कानाजवळ काही सेंटीमीटर वर धरतात आणि त्यात तापमान दिसते. ही पद्धत मला फारच आवडली - म्हणजे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर चा स्पर्श पण करण्याची गरज नाही. ही चाचणी केवळ कोरियात प्रवेश करणा-या प्रवाशांची नसून ट्रांझिट मधल्या प्रवाशांची पण करत होते. मुंबईच्या तुलनेने हा अनुभव चांगला वाटला. पण त्यामुळे एकंदर परिस्थितीचे भान येऊन मनावर एक दडपण निर्माण झाले. चाळा म्हणून आय पॉड ऑन केला, तर लक्षात आले की विमानतळावरचे वाय फाय ऍक्सेस होतंय. कुठून दुर्बुद्धी झाली, तर इ सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया आणि अजून एक दोन साईट्स पाहिल्या आणि सगळ्या मुख्य बातम्या ’स्वाईन फ्लू ची परिस्थिती बिघडत चालल्या’च्याच होत्या ! थोड्या वेळाने मला मळमळल्यासारखे वाटायला लागले :) मला Air Sickness चा त्रास सहसा होत नाही. एकंदरीत मला हे लक्षण काही फार चांगले वाटले नाही. उरलेला थोडा शिरा खाऊन घेतला. गेट पाशी दोन मराठी सहप्रवासी भेटले. पैकी एक दादरचे होते, तेही x-COEPian च होते ! मग जरा चार गप्पा झाल्या.
विमान जवळपास रिकामेच होते ! त्यामुळे सगळे प्रवासी वेगवेगळ्या सीट्स वर जाऊन बसले !! ब-याच जणांनी (मी सुद्धा!!) नाकाला मास्क/ रुमाल लावले होते. मला असा भास झाला की सगळेच लोक एकमेकांकडे संशयाने पाहत आहेत :) रात्र असल्याने विमानाबाहेर अंधार होता आणि आतसुद्धा दिवे मालविल्याने पूर्ण अंधार होता. कोणी जोरात खोकले वा सटासट शिंकले की काळजाचा ठोका चुकत होता !! एकंदर काय, नैराश्य वाढवायला सर्व घटक अनुकूल होते !! मग सरळ 'Do not disturb' चा स्टिकर सीट वर चिकटवला आणि चांगली डबल शाल अंगावर घेऊन आठ तास झोपलो :)
बुधवारी रात्री मुंबई मधे उतरलो. निघायच्या आधी मला लोकांनी सांगितले होते की आता विमानतळावर खूप कडक चाचण्या होतात, ’बी प्रीपेअर्ड’ वगैरे ! अशी कुठलीही चाचणी वगैरे न घेता प्रशासनाने केवळ एक फॉर्म भरून घेतला ! मी ट्विटर वर लिहिल्याप्रमाणे आपण एके ४७ चा मुकाबला लाठीने करतो आणि स्वाईन फ्लूचा कागदी फॉर्म ने !! इमिग्रेशन ला आलो तर सगळे इमिग्रेशन ऑफिसर्स पण मास्क लावून बसले होते !! ऑफिसर ने माझा चेहरा पडताळून पाहण्यासाठी मला मास्क दूर करायला सांगितले !! बॅगेज बेल्ट वर २ बॅग्स तर लवकर मिळाल्या पण ऐन वेळी चेक इन केलेला शॉवर कर्टन रॉड काही येईना. एका गृहस्थांची छत्री आली त्यामुळे माझीही आशा पल्लवित झाली. पण सगळा बेल्ट रिकामा होईपर्यंत थांबूनसुद्धा तो रॉड काही येईना. दरम्यान २ ३ उत्साही लोक (हे नक्की कोण होते कोण जाणे !) जवळ येऊन "साहेब, सगळे सामान कस्टम्स मधून काढून देतो, नेऊ का ?" असं विचारून गेले. शेवटी मी बेल्ट पाशी एकटाच उरलो ! एकदा मनात विचार येऊन गेला की ’जाऊ दे तो रॉड’, पण तसंही मन होईना. मग विमान कंपनीच्या एक अधिकारी माझ्यापाशी येऊन चौकशी करून गेल्या आणि विचारून सांगते म्हणून त्यांनी सांगितले. मग त्यांनी ३-४ वेळा वॉकीटॉकीवरून कोणाकोणाशी संपर्क केला, पण त्याचा पत्ता काही लागला नाही. बोलताना ओळख निघाली की त्यांचे नाव ’प्राजक्ता आपटे’ असून त्यांचा भाऊ अमरेंद्र हा माझा सिमॅंटेक मधला सहकारी आहे ! मग त्यांनी आणि त्यांच्या एक सहका-यांनी माझ्याकडून काही डीटेल्स घेऊन एक फॉर्म भरून घेतला आणि सामानाचा तपास करतो म्हणून सांगितले. खरं तर हा रॉड चेक-इन करताना मला असं सांगण्यात आलं होतं की तो हरवल्यास आमची जबाबदारी नाही. तरी विमान कंपनीच्या अधिका-यांनी केलेलं सहकार्य पाहून छान वाटलं. या तपासासाठी जो फॉर्म भरला, त्या औपचारिकतेचा भाग म्हणून मला या वेळेला कस्टम्स च्या ’रेड’ चॅनेल मधून जावं लागलं :) कस्टम्स अधिका-यांनी जुजबी प्रश्न विचारले आणि जाताना ’पुण्यातील परिस्थिती गंभीर दिसते, काळजी घे’ असं सांगितलं ! ’कोरड्या’ यंत्रणेतला हा माणुसकीचा आणि आपलेपणाचा ओलावा मनाला भिडला. चार गोड शब्द बोलायला पैसे पडत नाहीत, पण बहुत लोकांना हे ठाऊक नसावं. म्हणूनच अमेरिकेत ठीकठिकाणी जे 'Have a nice day!' ऐकायला मिळे - अगदी औपचरिक असले तरी - त्याला मी आवर्जून आणि मनापासून प्रतिसाद द्यायचो.
Arrival Lobby मधून बाहेर आलो तर पहिल्यांदा नजरेला पडला एक दांडगा काळा कुळकुळीत श्वान आणि रायफलधारी पोलिस ! जरा दचकून बाजूबाजूनेच निघालो. मला क्रिस ची आठवण झाली ! तो भारतात आला होता तेव्हा मुंबई विमानतळावर उतरल्यावर भल्या मोठ्या बंदुका हातात घेतलेले सुरक्षा रक्षक पाहून त्याला चांगलेच दचकायला झाले होते !! ही गोष्ट तोपर्यंत माझ्या कधी ध्यानातच आली नव्हती. क्रिस ने याचा उल्लेख केल्यावर लक्षात आले की अमेरिकेत कॉप्स कडे शस्त्रे असतात पण ती इतकी मोठ्या बंदुकांसारखी दिसत नाहीत ! अर्थात इथे शस्त्राच्या आकारापेक्षा त्याचे कार्य फार महत्त्वाचे आहे !
ज्या कंपनीची गाडी ठरवली होती, त्यांचे प्लकार्ड असलेले कोणी दिसेना. फोन करावा तर माझ्या सेल वर रेंज नाही ! कॉइन बॉक्स वरून फोन करावा तर रुपयाचे नाणे नाही आणि कोणाकडून मागून आणावे तर ट्रॉली ढकलत इकडे तिकडे जायचे ! शेवटी एका गृहस्थाला विचारले की अमुक कंपनीची गाडी कुठे असते ? तेव्हा नशिबाने त्यास ठाऊक होते आणि तो मला पार्किंग मधे घेऊन गेला. अर्ध्या तासात गाडीची व्यवस्था झाली आणि मग पुण्याला यायला निघालो. वाटेत एक विनोदी दृश्य नजरेला पडले. रस्त्याची एक पूर्ण लेन कामासाठी बंद केली होती, आणि ते वाहनचालाकांना नीट दिसावे म्हणून पूर्ण लेनच्या बाजूला चक्क आजकाल दिवाळीत लावतात तशी लांबलचक LED दिव्यांची माळ लावली होती !! ते पाहून हसूच आले ! पण नाकावर लावलेल्या मास्क मुळे नीट हसता आले नाही :)
त्यावरून आठवले - निघायच्या आदल्या दिवशी मला मास्क आणून देण्यासाठी तू किती धावपळ केलीस ! दहा दुकाने पालथी घातली त्या मास्क साठी. आणि प्रवास चालू केल्यावर जाणवले - तो मास्क नसता तर मी मनाने चांगलाच खचलो असतो. आणि मलाच मास्क हवा असून मी शांत बसून होतो आणि तू धावाधाव करत होतीस. अर्चू, मला पहिली आठवण कसली आली असेल तर माझ्या बारावी च्या परिक्षेच्या आदल्या दिवशी मला काही गहन (!!) शंका निर्माण झाल्या होत्या, आणि माझा वेळ वाचावा म्हणून तू के एम गोखल्यांकडे जाऊन त्या निरसन करून आणल्या होत्यास !! अर्चना, तुझ्या सारखी बहीण लाभायला खूप मोठं भाग्य लागतं, जे मजजवळ आहे. काही गोष्टी प्रत्यक्ष सांगता येत नाहीत, पण किमान लिहिता येतात हे काय कमी आहे !! मी तुझ्यासाठी असे काही केल्याची मला पुसटशी आठवण पण नाहीये !! आणि किंबहुना तशी परिपक्वता सुद्धा माझ्यामधे नाहीये :(
हाय वे ला लागल्यावर पहिली आठवण कसली आली असेल तर US मधले हाय वे, Construction साठी बंद केलेल्या लेन्स आणि आपला प्रवास !! ग्रॅंड कॅनियन ला जाताना मधे हूव्हर डॅमपाशी बरेच अंतर लेन बंद होती, आठवतंय का ?
वाटेत फूड मॉलवर थांबलो, जवळपास सगळी दुकाने बंदच होती. एका दुकानातून पाण्याची बाटली घेतली, आणि मग हॅंड सॅनिटायझर ने हात स्वच्छ करून मग पाणी प्यायलो. आजूबाजूला सगळे मास्क वा रुमालधारी लोकच नजरेस पडत होते. मी आणि ड्रायव्हर दोघेच गाडीत असून दोघे एकमेकांच्या संशयाने नाके झाकून बसलो होतो :) काही काळापूर्वी रेडियो वर ऐकलेले एक नाटुकले आठवले. विषय थोडा निराळा होता. एक प्रवासी भाड्याची बैल गाडी करून एका आडवाटेने चुकलेली गाडी गाठायला निघालेला असतो आणि प्रवासी आणि गाडीवाला - दोघांना एकमेकांची भिती वाटत असते की दुसरी व्यक्ती आपल्याला वाटेत लुटेल ! म्हणून दोघेही आपापल्या शौर्याच्या बाता मारत दुस-याला घाबरवायला पाहत असतात !! तसंच आम्ही दोघे पण आपापल्या मास्क ने स्वत:ला थोडी सुरक्षितता मिळवायचा प्रयत्न करत होतो :)
सकाळी उजाडायच्या आतच घरी पोहोचलो. अजून बाहेर अंधारच होता, आई बाबांनी नाकाला रुमाल बांधला होता, ड्रायव्हर ने ही नाकाला रुमाल बांधला होता आणि मी मास्क ! बाबांनी सगळ्या बॅग्स डेटॉलच्या पाण्याने लगेच पुसून घेतल्या. आई ने फक्कड चहा बनवला आणि मग मी लगेच आंघोळ करून घेतली. एरवी या गोष्टीचा मला किती आळस आहे तुला माहीतच आहे, पण या खेपेला मनात काळजीने इतके बस्तान बसवले होते की पावले आपोआप बाथरूम कडे वळली. आपण बोलल्यानुसार पुढचे काही दिवस मी माझ्या खोलीतच राहणार आहे. 'Self Quarantine!' सहा सात दिवस. थोडा त्रास होतोय, पण इलाज नाही. राहून राहून माझ्या मनात तुलना येतीये - SFO airport वर पोहोचल्यावर मी तुला चक्क कडकडून मिठी मारली होती ! आणि घरी आल्यापासून रात्रीपर्यंत आपण बोलतच होतो ! बॅगांची उचकापाचक करत होतो... आता मात्र मी पूर्ण आयसोलेट झालो आहे. बॅग्ज मधे तू पाठविलेल्या इतक्या गोष्टी आहेत, पण त्या उघडायचा विशेष मूड होत नाहीये. पण आता पर्यंत - शनिवार आहे आज - त्याची सवय झाली आहे. अजून मी घराचा उंबरठा पण ओलांडला नाहीये !! आणि आठवडाभर तसाच प्लॅन आहे. ऑफिस मधल्या लोकांना पण चिंता वाटू नये म्हणून मी पुढचा आठवडा घरूनच काम करणार आहे.
इथे चांगलेच भीतीचे वातावरण आहे, किमान मला तरी तसं जाणवतंय. ऑफिस मधे काही लोक घरूनच काम करत आहेत, काहीजण मास्क लाऊन येत आहेत आणि कोणी चुकून एकदा जरी शिंकले, तरी त्याला लोकांच्या विचित्र नजरांचा सामना करावा लागतोय ! वृत्त वाहिन्यांवर फक्त स्वाईन फ्लू च्या बातम्या आहेत असं ऐकलं. घरी टी व्ही नाही आहे ते बरं आहे !! पण मी दर थोड्या वेळाने इ सकाळ, रेडिफ इ. साईट्स उघडून बातम्या पाहत आहे. तू वाचलंच असशील की बरीच मार्केट्स २-३ दिवस बंद आहेत. सरकारनं नाही, पण किमान लोकांनीच हा निर्णय स्वयंस्फूर्तीनं घेतला ते बरे झाले. आजच्या बातम्यांनुसार असं वाटतंय की परिस्थिती सुधारत आहे. Fingers crossed !
आपण आपल्या आयुष्यात प्रथमच अशा भितीचा आणि परिस्थितीचा अनुभव घेतोय न ! तू जरी यापासून दूर असलीस तरी तुला आमच्याहून जास्त काळजी असणार हे मला ठाऊक आहे.
पुण्यात आल्यावर काय काय करायचे याची माझ्याकडे एक मोठ्ठी यादीच होती ! पर्यटनापासून खाद्यजीवनापर्यंत. पण त्या बेतांवर तूर्तास तरी पाणी पडलं आहे !!
सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत मला गेल्या काही दिवसांच्या इतक्या आठवणी येतायत म्हणून सांगू - सकाळचा चहा, पूजा, तू मला ऑफिसला ड्रॉप करायचीस तो रस्ता, आपल्या गप्पा, कॉप कार्स, याहू चॅट, पिक अप, डबा, हॉन्ग फू मधलं ’कंग पाओ तोफू’, स्टार बक्स, डेनीज चं ग्रॅंड स्लॅम, कॉस्टको, लिव्हरमूर, स्ट्रिप, शामू, सॉसॅलिटो, म्युअर वूड्स, पॉइंट बोनिटो, बर्कली, बे ब्रिज, गोल्डन गेट, ’साधा चहा’ आणि ’खरा चहा’, हॅरी पॉटर चा ’क्रॅश कोर्स’, SFO झू, पिसारा फुलविलेला मोर, आपण ऐकलेली हिंदी आणि मराठी गाणी ... यादी अमर्याद आहे ! हॅरी पॉटरची आठवण आल्यावर एक गंमतशीर उपमा सुचलीये ! ही स्वाईन फ्लू ची साथ ’डिमेंटर्स’ सारखी आलीये ! आनंद शोषून घ्यायला, नैराश्य आणायला.. पण माझ्याकडे गेल्या दीड दोन महिन्यांतल्या आनंदी आठवणींचा इतका मोठा साठा आहे की हे सगळे ’डिमेंटर्स’, मी ’पेट्रोनस चार्म’ ने हाकलवून लावीन !! आणि पुढचे काही दिवस हाऊस-ऍरेस्ट मधे राहून मी हेच करणार आहे ! हे पत्र त्यातलंच पहिलं आहे !!
तुझाच,
निखिल