November 28, 2006

कॉफी

मिहिर बरिस्ता बाहेर एक टेबल पकडून शून्यात नजर लावून बसला होता. समोर फर्ग्युसन कॉलेज रोड वर फुललेले तरुणाईचे ताटवे तटस्थपणे निरखत तो नीताची वाट पाहत होता. त्याला त्याची आणि नीताची पहिली 'कॉफी' आठवली - इथेच, साधारण सहा महिन्यांपूर्वी असेल...


त्यांची ओळख एका कट्ट्यावर झाली होती. नंतर हळू हळू फोन, ई-मेल, चॅट, कॉफी, एकमेकांचे वाढदिवस, अशी रुळलेल्या मार्गाने प्रगती होत होत एक दिवस मिहिरने नीताचा हात मागितला होता. प्रेम-व्यवहार-रुसवे-फुगवे-समज-गैरसमज असा बरेच दिवस खल करून कंटाळल्यावर दोघांनी आपापल्या आई-बाबांना ही गोष्ट सांगितली होती. नीताच्या आई वडिलांना मिहिरला भेटायचे होते, म्हणून कालच मिहिर त्यांना भेटायला गेला होता. उगाच 'ऑकवर्ड फीलिंग' येते म्हणून नीताने तिथे हजर रहायचे नाही असे ठरवले होते.


मिहिरने घड्याळ पाहायला आणि नीताने यायला एकच गाठ पडली.
"हॅल्लो !" नीताने प्रसन्न हसून बैठक जमवली.
"हाय !" मिहिरला स्वत:चा आवाज काहीसा कोरडा जाणवला.
"So whats up?"
"Nothing much!"
नीताला संभाषण पुढे न्यायला धागा मिळेना, तेव्हा तिने सरळच विचारले -
"कशी काय झाली भेट?"
उत्तरादाखल ओठ मुडपून मिहिरने मान हालवली - "ठीक झाली".
त्याला जाणवलं - यापेक्षा chat वर 'Hmmm' टाईप करणं खूप सोपं आहे !
"मिहिर What's wrong ? तुझा मूड नाहीये का बोलायचा आज ?"
"Well, doesn't really matter. आपण बोलायसाठीच आज भेटलो आहोत. मी तुला भेट कशी झाली हे सांगायचे आहे, राईट?
काही नाही, काल असेच साडेचार-पाच ला तुझ्या घरी गेलो. काकू घरी होत्या, काका पाच दहा मिनिटात येणार होते. तसे आधी एक-दोनदाच भेटलो मी त्यांना. मग जरा इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या. जनरल - माझा बायोडेटा - शिक्षण, नोकरी, पगार, छंद, पुढे काय करायचे आहे इत्यादी इत्यादी...
Seems काकूंना अभ्यासाचं बरच कौतुक आहे... विचारत होत्या मी बोर्डात आलो होतो का, विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलो होतो का, कुठली शिष्यवृत्ती मिळाली होती का... तशी माझी उत्तरं 'नेति नेति'च होती ! नाही म्हणायला मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली होती हे ऐकून त्यांचा जीव भांड्यात पडला. तेवढ्यात काका आले. हाय-हॅलो झाल्यावर काकूंनी त्यांना पहिल्यांदा सांगितले की मला चौथीची स्कॉलरशिप मिळाली होती म्हणून. मला चौथीत पण झाला नसेल एवढा आनंद तेव्हा झाला, यू नो ?"
"अच्छा. आईला हुशारीचं फार कौतुक आहे."
"असेल. किंवा तुमच्याकडे हुशारी नंबरात मोजत असतील. Anyway. मग जनरल घरच्या गोष्टी झाल्या"
मिहिरने थोडा विचार केला - एकेक संचाद आठवून तो कसा शब्दांत मांडायचा याचा.

"तुम्ही राहायला कुठेशी रे ?"
"सदाशिव पेठेत"
"बरं. सदाशिव पेठेत कुठे ? माझ्या एक-दोन मैत्रिणी राहतात तिथे"
"सदाशिव पेठ हौदापाशी"
"माझी एक मैत्रिण तिकडेच कुठेतरी रहाते. तिकडे जायचं म्हणजे नकोच वाटतं. एक तर हीss गर्दी ! नुसती चिकटून चिकटून घरं! आणि आवाज केवढा तो ! कशी राहतात लोक कुणास ठाऊक! "
"( मनात ) काकू, माझ्याकडे एक कोटी रुपये असते तर मी पण मोदीबागेत नाहीतर डेक्कन वर फ्लॅट घेतला असता. पण मग मी तुमच्या दाराशी असली बोलणी करायला आलो नसतो!"
"कसे आहे काकू, मी तिथे लहानपणापासून राहतोय. त्यामुळे याचं काही विशेष वाटत नाही. आणि तिथून सगळी ठिकाणं जवळ पडतात, म्हणाल ती सुविधा पायाशी मिळते. तिथे राहिलं की फायदे कळतात. अर्थात नवं घर घ्यायचा पण विचार आहे, लग्न वगैरे ठरलं की मग पत्नीचा पण विचार घेईन"

...


"बरं. बाकी घरी देव-धर्म कसा काय आहे?"
"आहे की. म्हणजे आम्ही आस्तिक आहोत सगळे. आई बाबा साईबाबांना मानतात."
"तसं नव्हे... म्हणजे कुळधर्म, कुळाचार, पूजा, व्रतं, अनुष्ठानं असं..."
"तसं जवळपास काही नाहीये. प्रत्येकाच्या मर्जीवर !"
"नाही कारण 'सदाशिव/नारायण पेठेतले लोक' म्हणले की जरा बिचकायला होतं"
"(मनात) एकदा सदाशिव पेठेत फिरायला या. महापालिकेने तिथे कोण कोण प्रसिद्ध लोक राहायचे त्याचे नीलफलक लावले आहेत. ते पाहून 'सदाशिव पेठेतले लोक' कदाचित नीट समजतील."
"नाही, तुमचा गैरसमज असावा तसा"


...


"बाकी नीता सांगत होती की तुला ट्रेकिंग वगैरे फारसे आवडत नाही म्हणून"
"हं... म्हणजे अगदीच कधीतरी जातो. बैठ्या गोष्टी जरा जास्त आवडतात"
"म्हणजे आवडत नाही एवढंच आहे न, का म्हणजे बाकी - काही प्रकृतीचा त्रास वगैरे?"
"नाही, तसा काही नाही"

"नाही आणि आमची नीता म्हणजे पहिल्यापासून सगळ्यात पुढे ! अभ्यास असो, नाटक, वक्तृत्व, संगीत, जिथे जाईल तिथे चमकते"

"बरोबर. मला माहीत आहे"


...
...


"बरंच बोलणं झालं की त्यांचं तुझ्याशी.."
"हो. 'बरंच' बोलणं झालं."

""
""

"मिहिर, तुला ... "
"'तुला' काय ?"
"तुला गप्पा फारशा आवडल्या नाहीत असं मला वाटतंय"
"बरच लवकर समजलं तुला"
"तुला म्हणायचं काय आहे?"
"नाही, मला कधीच काहीच म्हणायचं नसतं. हे सगळे प्रश्न तुझी आई तुलाच विचारू शकली असती. तुलाही उत्तरं माहीत आहेत सगळी, राईट?"
"हे पहा मिहिर, त्यांना असं वाटणं साहजिक आहे की मुलगा कोण आहे पहावं, त्याच्याशी प्रत्यक्ष बोलावं" "हो. पण बोलण्याच्या यापेक्षा अजून चांगल्या पद्धती असतात"
"हे पहा मिहिर, आई बाबांबद्दल एक अवाक्षरही मी चालवून घेणार नाही. एखाद्या घरात मुलगी द्यायची म्हणजे ते पाहणारच की घर कसंय, घरचे कसेत, मुलगी तिथे कशी राहील. आणि ते माझे आई बाबा आहेत. ओके?"
"ओह, यस, राईट. ते तुझे आई बाबा आहेत. त्यांना कन्सर्न्स असणारच. आणि त्यांना समजून घेणं तुझं कर्तव्य आहे. आणि तू त्यांना डिफेंड केलं पाहिजेस. अगदी बरोबर.
फक्त काल मी तुझ्या घरी बसून अशा विचित्र आणि अपमानास्पद प्रश्नांची उत्तरं देत होतो याचं तुला काहीच वाटलेलं दिसत नाहीये. पुट युवरसेल्फ इन माय शूज, म्हणजे तुला कळेल. पण एनी वे, मला समजून घ्यायला मी तुझा कोण लागतो !"
"मी असं कधी म्हणलं आहे की तू माझा कोणी लागत नाहीस म्हणून?"
"ते म्हणावं लागत नाही. कृतीतून समजतं."
"मिहिर, उगाच इश्यूज करू नकोस.
आणि आई म्हणाली की त्यांना तुझ्या आई-बाबांना भेटायचं आहे, पण तू बरीच टाळाटाळ केलीस म्हणून."
"हो. कारण माझ्याकडे पर्याय नव्हता...
मी घरी सगळी कल्पना दिली - तेव्हा मी हेही सांगितलं की तुला एकत्र - म्हणजे त्यांच्याबरोबर रहायचं नाहीये"
"बरोबर. मग?"
"त्यांनी मला सांगितलं की जर त्यांचं तोंड सुद्धा न पाहता तू ठरवलं आहेस की त्यांच्या बरोबर रहायचं नाही, तर त्यांना तुझ्या आई वडिलांशी भेटण्यात स्वारस्य नाहीये. Rather ते-भेटणार-नाहीत. आणि मी लग्नानंतर त्यांच्या घरी पाऊल ठेऊ नये"
"वेल, मला माहीत नव्हतं लोकांना इतका अहंकार असतो"
"शब्द सांभाळून वापर. हा अहंकार नाहीये. साधा सरळ व्यवहार आहे - You don't want to relate to them; they don't want ANY business with you. Period. आणि जर कधी एकत्र रहायचं नसेल तर ते कसे आहेत, याच्याशी तुला काय करायचंय?"
"मिहिर मला असं वाटतं की आपण पुन्हा विचार करण्याची गरज आहे, कोणताही निर्णय घ्यायच्या आधी"
"हो. बरोबर. किंबहुना माझा विचार झालाय. आज तुझ्या कॉफीचे पैसे तू, आणि माझे मी देईन."
"Means?"
"गुडबाय अँड गुडलक".