September 19, 2005

मासा आणि मासोळी

एक नदी होती. डोंगराच्या कुशीत उगम पावणारी. नियतीने आखलेला मार्ग क्रमत सागरास जाऊन मिळणारी...

नदीत होता एक मासा. एकटं पोहोण्याचा त्याला भारी कंटाळा ! आजूबाजूचं जग न्याहाळणं हा त्याचा छंद. 'आयुष्य कशासाठी' याचं त्याला कोडं पडायचं.

एक दिवस तो सहज नदी सागराला मिळते तेथे गेला. समुद्राबद्दल तसं त्यानं ऐकलं होते, पण समोर पसरलेला अथांग सागर तो प्रथमच पाहत होता. त्याला ते दृश्य आवडले. मग त्याला मधून मधून तेथे यायचा छंद जडला. ते अथांग दृश्य त्याच्या डोळ्यात मावायचं नाही. या सागराला सीमा कुठली हे त्याला समजायचं नाही. नदीतून सागरात जाऊन भटकावं का नाही हेही कळायचं नाही ! समोर पश्चिम क्षितिजावर सूर्य मावळला की तो परत फिरायचा.

अशाच एका संध्याकाळी त्याला एक छोटीशी मासोळी दिसली. समुद्राच्या पाण्यात सैर करण्यातली मजा ती मनसोक्त लुटत होती... स्वत:च्या नकळत त्याने सहज साद घातली 'हाऽय!'. प्रतिसाद आला - 'हॅऽलोऽ' ! एखाद्या मासोळीशी बोलायचा अनुभव तसा नवाच होता ! मजेदारही ! चार बुजरे शब्द पाण्यात तरंगले. पश्चिम क्षितिजावर सूर्यनारायण अस्ताला गेले. मासा आणि मासोळीने एकमेकांचा निरोप घेतला, पुन: कधीतरी भेटायचं ठरवून...

---

माशाच्या समुद्रापासच्या फे-या वाढल्या ! समुद्राच्या पोटातून येणा-या मासोळीची तो रोज वाट पाहू लागला. गप्पा रंगतदार होऊ लागल्या. पश्चिम क्षितिजावर तेजोनिधी आणि जलनिधी यांचे मीलन साक्षी ठेवून घेतले जाणारे निरोप गहिरे होऊ लागले...

"तुझं आयुष्याचं ध्येय काय आहे ?" तिनं एक दिवस विचारलं.
"बापरे ! मला असे काही ध्येय वगैरे नाहीये ! तू ठरवलं आहेस ?" त्याने कुतुहलाने विचारलं.
"कायम आशावादी राहणं, आला क्षण आनंदाने जगणं..."
"वा!" त्याने दाद दिली.

---

"तुला संगीत आवडतं?" त्याने विचारलं.
"हो तर! समुद्राची गाज ऐकायला आवडते मला... समुद्राचा विस्तीर्ण पसरलेला हा किनारा... कुठे मऊ रेती समुद्राच्या गर्जत उसळणा-या लाटांना लटका विरोध करत स्पर्श करू देते त्याचा आवाज, तर कोठे खडे पहाड लाटांशी झुंजतात त्याचा रौद्र आवाज. वादळी वा-याचा घोंघावणारा आवाज आणि समुद्राच्या पोटातलं मूक शांततेचं संगीत !"

"मलाही संगीत आवडतं. पण मी ऐकतो ते संगीत वेगळं आहे काहीसं... नदीचं पाणी घाटाच्या पाय-यांवर रेंगाळत, खेळत पुढे जातं त्याचा आवाज, नदीच्या काठावर मंदिरं आहेत - त्यांच्या घंटांचा धीरगंभीर ध्वनी, काठावरल्या वृक्षांच्या पानांची सळसळ आणि त्यांवर भरलेल्या पाखरांच्या शाळेचा मधुर किलकिलाट...अर्थात संगीत कुठलंही असो - ते सात सुरांचंच बनलंय! ".

---

गाठी भेटींमधून एकमेकांचे अलग विश्व, आवडी निवडी एकमेकांपर्यंत पोहोचू लागले.
गप्पांमधून निर्भेळ मैत्रीचे धागे जुळले.
परिचयातून मैत्री झाली, मैत्रीतून प्रीती उमलली.
एक दिवस माशाने धीर धरून विचारले - "माझ्या पंखांच्या लयीत लय मिळवून पोहोशील ? आयुष्यभर साथ देशील ?"
"खरंच?" तिनं विचारलं.
मग काहीशी गंभीर होत ती उद्गारली "विचार करून सांगते" ...
निरोपादाखल पंख हलले.
आभाळात रंगपंचमी खेळत भगवान सहस्ररश्मी अस्ताला गेले...

परतताना माशाचे लक्ष सहजच काठावर गेले. नदीकाठी चिंतन करणारा पामर - त्याचा जुना मित्र - त्याच्या दृष्टीस पडला. माशाच्या मनावरलं दडपण उतरलं होतं आणि उत्साहाचं वारं पंखांत खेळत होतं. त्यानं पामराला गाठलं आणि आपली कहाणी उत्साहानं ऐकवली. पामर त्याच्या खुशीत माफक सहभागी झाला. जाता जाता 'पण जरा जपून रे बाबा' असा पोक्त सल्ला द्यायला तो विसरला नाही !

---

"तुला जोडीदार कशाला हवा आहे?" त्यानं विचारलं.
"त्यात काय विचारायचंय ! साथ मिळाली मी जीवनाला पूर्तता येते. तुला नाही वाटत असं?"
"कोणास ठाऊक!"
"नाहीतर मग कशाला हवी आहे जोडीदार तुला?"
"एक मंदिर आहे - धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या खांबांवर तोललेलं. गृहस्थाश्रम म्हणतात त्याला. तेथे जायला जोडीदार लागतो."
"जरा समजेल असे बोल काहीतरी!"

---

नातं बदललं की व्यक्ती आणि अभिव्यक्ती बदलतात ! माशाला हा शोध जरा नवीनच होता ! मैत्रीच्या अल्लड गप्पांमधे आता हळूहळू थोडा थोडा व्यवहार डोकावू लागला !
तिनं विचारलं - "तू राहतो नदीत, तर मी समुद्रात ! ते कसं जमायचं ?"
"त्यात काय ! मी समुद्रात येतो नाहीतर तू नदीत ये !"
"इतकं सोपं नाहीये ते."
"का बरं ? इकडून तिकडून पाणी एकच!"
"नाही. इथलं पाणी खारं असतं. इथे माणसं खूप मासेमारी करतात."
"मासेमारी होते म्हणून कोणी समुद्रात राहत नाही काय ! जाळ्यात कोणीही कधीही अडकू शकतो."
"तरी कशाला ? तू नदीत सुखात आहेस."
"मग तू नदीत ये!"
"छे ! मला नाही नदी आवडत."
"का ??"
"नदी म्हणजे आखलेला मार्ग, जिथं कुठलं स्वातंत्र्य नाहीये ! प्रवाहपतित आयुष्य आहे ते. लादलेल्या बंधनांच्या चौकटीतून जाणारं..."
"असं का म्हणतेस ? इथे पोहोण्याचं स्वातंत्र्य जरूर आहे. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. बंधनं जरूर असावीत - जाच होणार नाहीत इतकी. आणि ज्याचा स्वत:वर विश्वास आहे, ज्याच्यापाशी धमक आहे, पंखात बळ आहे, त्यानं प्रवाहाविरुद्ध पोहावं..."
प्रथमच काहीसा चढलेला दोघांचा आवाज लाटांच्या आवाजात मिसळून गेला.
आज परतताना मासा उद्विग्न झाला होता. पामराजवळ त्यानं मन मोकळं केलं. पामरानं त्याला समजावलं -" तुझंही चूक नाही आणि तिचंही. इथे चूक आणि बरोबर काहीच नाहीये. सारी माया आहे !"

---

"मला नेहमी चिंता वाटते - आपल्या आवडी निवडी, विश्व काहीसं भिन्न आहे."
"अगं थोड्या आवडी निवडी असू दे की वेगळ्या. एकमेकांच्या आवडीनिवडी जुळल्या नाहीत तरी आड तर येत नाहीत ना ?"
"आवडी जुळल्या नाहीत तर सूर कसे जुळतील?"
"असं थोडीच आहे ! संगीतातले राग पहा. एकमेकांपासून दूर असलेले स्वर एकत्र येऊनच वादी-संवादीच्या जोड्या जुळतात..."
"असतील. पण 'रागा'चे नियम 'अनुरागा'ला लागू पडतील असे नाही. एकमेकांशी एकरूप झालं नाही तर जोडी कशी टिकेल ?"
"पण त्यासाठी 'सारखं' असायची गरज नाही. 'Faith, Fellowship and Freedom' हे एकत्र बांधणारे तीन फोर्स असताना कशाला चिंता करायची ? असले एकमेकांचे विश्व थोडे वेगळे, तरी त्यातून नव्या जगाची ओळख करून घ्यायची संधी मिळते ना ?"
"नव्या जगाची ओळख करून घेणे वेगळे आणि ते जगायला लागणे वेगळे."
"पण आयुष्य म्हणले की एवढी तडजोड ही आलीच."
"छे ! तडजोड हा शब्द मला मान्य नाही. जे आवडतं, जुळतं तेच निवडावं."
"तर मग शब्दच संपले."

---

काळाच्या 'स्टाफ' वर संवाद-विसंवादाची नोटेशन्स उमटत गेली.
अखेरीस तो दिवस उगवला. मनातली गोष्ट ओठावर येणं ही आता केवळ औपचारिकताच राहिली होती. मासा आणि मासोळीनं एकमेकांचा तुटक निरोप घेतला. रुपेरी दर्यात मासोळी दिसेनाशी झाली. जड झालेल्या पंखांनी पाणी दूर लोटत मासा मार्ग क्रमू लागला.

अथ पासून इति पर्यंत ही कहाणी उलगडताना साक्षी असलेला पामर चिंतन आटोपतं घेऊन उभा राहिला. कपड्यांना लागलेल्या माती-तृणपात्यांबरोबर त्याने स्मृतींचे कोषही झटकले. मैत्री, आपुलकी, आत्मीयता, प्रेम, स्नेह, जिव्हाळा, आदर, साथ, अपेक्षा या सा-या शब्दांचा गुंता विचार करता करता अधिकच फसत गेला. त्यापेक्षा पामरास 'ब्रह्म सत्य जगन्मिथ्या' हे तत्वज्ञान अधिक पसंत पडले !! त्यावर विचार करत, 'दृश्या'कडे पाठ फिरवून तो सावकाश चालू लागला.

पश्चिम क्षितिजावर सूर्य मावळला.
पुन: उगवण्यासाठी.