डायरी २००७
२५ जून
सात वाजण्याच्या सुमारास विमानतळावर पोहोचलो. पावसाचे दिवस आणि मुंबईच्या सुप्रसिद्ध पावसाची ख्याती यामुळे कुठेतरी वाटेत अडकून विमान चुकण्यापेक्षा विमानतळावर माशा मारत बसायला लागले तरी चालेल अशा हिशेबाने भलताच लवकर निघालो होतो ! टर्मिनल वर जेमतेम पोहोचलो आणि मुसळधार पावसाला बाहेर सुरुवात झाली. मी सुटकेचा नि:श्वास टाकला !
टर्मिनलवर आलो की हटकून मला माझ्या पहिल्या प्रवासाची आठवण होते! (यात काडीचीही अतिशयोक्ती नाही.) पूर्वी - २००५ साली - माझ्या तेव्हाच्या ’कुंपणी सरकार’ च्या कृपेने (Veritas Software) चक्क बिझनेस क्लास ने अमेरिकेस जायला मिळाले होते. ’प्रवासात हवेत कशाला उगाच चांगले कपडें’ (शेवटचा अनुस्वार महत्त्वाचा आहे!) या मानसिकतेनुसार घातलेला सामान्य टी शर्ट, त्याला साजेशी विटलेली जीन्स (सॉरी - जीन पॅंट!), पाठीवर इंच इंच लढवू या ईर्षेने भरलेली सॅक, खांद्याला लॅपटॉपची बॅग, पुढ्यातल्या ट्रॉलीवर चौसष्ट किलो सामानाने ठासून भरलेल्या दोन बॅग आणि हातात तिकीट, अशा ’अवतारात’ आमची स्वारी ’First Class Passengers’ अशी पाटी असलेल्या दारातून आत जाऊ लागली! दारात बसलेल्या सुरक्षारक्षकाने माझे तिकीटसुद्धा पाहण्याची तसदी न घेता, अत्यंत अपमानास्पद नजरेने माझ्याकडे पाहत उर्मट आवाजात "ये बिजनेस क्लास का एन्ट्रन्स है, आगेसे जाओ" असे फर्माऊन हुसकले ! मग मी त्याला माझे तिकीट दाखविल्यावर त्याला धक्का बसला आणि त्याने ’बिझनेस क्लास पॅसेंजर’ अशी एक आरोळीच ठोकली! अकस्मात चार कर्मचारी माझ्या अंगावर धावून आले आणि ’बिझनेस क्लास...बिझनेस क्लास’ असा गलका करत त्यांनी माझं सामान आपसांत वाटून घेऊन स्कॅनिंग करायला नेले ! पैसेवाल्यांची दुनिया असते हेच खरे ! (अर्थात प्रवासाला सुरुवात केल्यावर माझ्या ध्यानात आले की बिझनेस क्लासने जाणारे बहुसंख्य प्रवासी परदेशी असतात, विशीतले तरूण जवळपास कोणीच नसतात आणि बहुतेक लोक सुटाबुटात असतात !)
असो. आता मी इकॉनॉमी क्लास चा पाशिंजर होतो, त्यामुळे साहजिकच मी इकॉनॉमी क्लास च्या गेटाद्वारे (हा अगदी ’ऍक्टान्वये’ चा सामासिक भाऊच बरं!) आत घुसलो. आताशा माझा वर्गविरहित समाजव्यवस्थेवरचा विश्वास वाढला आहे!
फ्लाईटचे बोर्डिंग सुरू झाल्यावर मी बिझनेस क्लासच्या रांगांमधून वाट काढत माझ्या इकॉनॉमीच्या सीटकडे प्रस्थान ठेवले. मनात ’च्यायला तुम्ही काय लेको मोठी माणसं, जाल नाही तर काय बिझनेस क्लास ने!’ असा सूक्ष्म जळफळाट, ’हॅ ! माहीतेय काय बिझनेस क्लास ते. मी पण गेलोय’ अशी अगदीच पोकळ बेफिकिरी आणि ’गेले ते दिन गेले’ अशी माफक हळहळ असे भावनांचे विनोदी रसायन सांभाळत मी सीटवर बैठक जमवली ! (आणि वर ’ही सगळी माया आहे’ असे म्हणायला आम्ही मोकळे!!)
माझ्या एका ’परममैत्रिणीची’ (!) एक थिअरी (!) आहे बरं का - ’माणसात दुर्गुण असावेतच. त्यामुळे माणसे कशी रिअल वाटतात’ !! ’रारंगढांग’ मधला ’विश्वास मेहेंदळे’ म्हणूनच तिला आवडला नव्हता !! तो ’रिअल’ वाटला नाही म्हणून ! पण मला आता कसं अगदी ’रिअssल’ वाटतंय :)
मागच्या खेपेला मुंबई ते सिंगापूर हा प्रवास मी ’माझ्या सीटचा टीव्ही आणि शेजारच्या सीटचा हेडफोन’ असा करून आणखीन वर ’काय दळभद्री इक्विपमेंट आहे सालं - काहीच ऐकू येत नाहीये !’ असा संताप व्यक्त केला होता :) या खेपेला पुरेशी काळजी घेऊन पिक्चर चालू केला आणि विमानानं पोटात पाय ओढून घेत आकाशात झेप घेतली...