आंब्याचा मावा
रचनानं आंब्याच्या माव्याचं पॅकेट पिशवीतून काढून फ्रीजच्या कडेच्या कप्प्यात ठेवलं. या रविवारी चक्क घरी आंबा बर्फी करण्याचा बेत घाटत होता. रेसिपी आणि बाकी सामान सज्ज होतं. उगाच चितळ्यांना कशाला अवाच्या सवा पैसे टिचवायचे ! एकदा रेसिपी कन्फर्म करायला आणि मनोधैर्य वाढवायला आईला फोन केला की झाले ! तेवढ्यात सेलचं रिमाईंडर वाजलं म्हणून पाहिलं तर आज US manager बरोबर 1:1 कॉल होता ! हो, आज सोमवार नाही का ! अरे बापरे. आजकाल गोष्टी लक्षातच राहत नाहीत काही काही वेळा! काय डिस्कस करायचंय त्याच्या अजून नोट्स काढायच्या होत्या. धावत पळत रचनानं बॅगमधून लॅपटॉप काढला आणि स्पीकर फोनजवळ आसन जमवलं. तेवढ्यात हेमा आणि हिमांशू यांच्यात काहीतरी खुसफुस आणि नेत्रपल्लवी झालेली तिच्या नजरेतून निसटली :)
---
हिमांशूनं शाळेतून आल्या आल्या दप्तर कोप-यात भिरकावलं आणि फ्रीजचं दार उघडलं. दिवसभर शाळेत त्याच्या डोळ्यासमोर फ्रीज येत होता ! आंब्याचा लाल चुटुक मावा प्लॅस्टिकच्या पिशवीत आरामात विसावला होता. ते पाहून त्याच्या डोळ्यात चमक उत्पन्न झाली ! त्याची चाहूल लागून हेमा स्वयंपाकघरात अवतीर्ण झाली.
"हिम्या घुबडा तुला काही अक्कल दिली आहे की नाही देवाने ?" हेमाने आक्रमक सुरुवात केली.
"तुला काय करायचंय ? माहीत आहे तुला फार जास्ती दिलीये ते". हिमांशूने उर्मट प्रत्युत्तर केले.
"मूर्खा, काल आईच्या समोर काय बावळटपणा चालला होता ? अधाशी कुठला. तुझ्यामुळे आपण दोघेही गोत्यात येणार आहोत एकदा. थोडा पेशन्स नाही का ठेवता येत तुला ?"
हेमाचं फायरिंग बिनतोड होतं. आंब्याचा मावा आणि आपलं धाकटेपण लक्षात घेता हिमांशूने पड खाल्ली. अशा पद्धतीने शांतता प्रस्थापित झाल्यावर हेमाने ऑपरेशन ’मास्टरमाईंड’ करायला सुरुवात केली.
"हे बघ - प्लॅस्टिकच्या पिशवीला दोन स्टेपल्स आहेत. त्या जरा कडेलाच मारल्या आहेत. आपण त्यांच्या मधून हळूच बोट आत खुपसून एक लचका तोडू. आणि लक्षात ठेव - आईला चुकून माकून संशय आलाच तर आम्ही दोघांनी मिळून पिशवी उघडली असं सांगायचं. मागच्या वेळसारखी हरामखोरी केलीस तर तुझी काही धडगत नाही." हेमानं सज्जड दम भरला. हो, बरोबरच आहे. Even Pirates have a code of conduct !
दोन स्टेपल्सच्या मधून पिशवीचे फोल्ड हळूवार उलगडत हेमाच्या बोटांनी एकाग्रतेने आंब्याचा माव्यापर्यंत मजल मारली. । एकाग्रता यशोबीजम । दोन बोटांत एक लपका पकडून ठेऊन हळूहळू बाहेर काढण्यात ती कमालीची यशस्वी झाली. एवढ्या परिश्रमांनी बाहेर काढलेला आंब्याच्या माव्याचा गोळा जिभेवर अर्ध्या मिनिटात कसा विरघळला ते समजलेही नाही ! आता फक्त पिशवीतल्या माव्यात एक छोटासा खड्डा पडल्यासारखा दिसत होता. हिमांशूनं बाहेरून पिशवी दाबून आतला मावा जरा चपटा आणि सरसा केला आणि पुन्हा पहिल्यासारखा आकार आणला !
---
रचनाला आज कामाचा काही मूडच येत नव्हता. नवीन फीचर कसा डिझाईन करायचा याचा विचार करून करून तिच्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या. उगाच थोडे कोड लिहून पाहिले, पण गाडी अडकायला लागली. होतं एखाद्या दिवशी असं. तसंही वीक एन्ड पर्यंत वेळ आहे अजून. होईल, होईल. आज स्टेटस मीटिंगला तिनं ’बेसिक हाय लेव्हल डिझाईन चालू आहे’ असं काहीतरी थातुर मातुर स्टेटस दिलं होतं. उद्या काय नवीन सांगायचं तो प्रश्नच होता. तेवढ्यात आदिती क्यूबमधे डोकावली.
"काय ग काय चाललंय ?"
"काही नाही ग, ते डिझाईन कंप्लीट करायचं होतं ना नव्या मोड्युलचं, ते जरा पाहत होते"
"पॅन्ट्रीत चहा घ्यायला येतेस ?"
"अग आत्ताच कामाला हात घातला होता..." रचनानं गुळमुळीत कारण पुढे केलं.
"करशील ग. जरा updates होते" एक डोळा बारीक करून आदितीनं हलक्या आवाजात सांगितलं.
मग रचनानं उगाच आढेवेढे घेतले नाहीत.
...
...
"मग डुरक्या काय म्हणला ?" रचनाला उत्सुकता आवरता येत नव्हती.
"स्स्स्स्स अग हळू बोल ना ! नाहीतर पुढल्या ’ले ऑफ’ ला आपला नंबर लागेल"
"अग डुरक्या म्हणजे कोण ते कोणाला कळतंय ?"
"कळतं सगळं. एक वेळ काम कसं करायचं ते नसेल कळत, पण बाकी सगळं समजतं"
...
...
रचना समाधानानं क्यूबमधे परतली. ही आदिती पण भन्नाट आहे. कुठून कुठून बातम्या मिळवते कोण जाणे ! पण अपडेट महत्वाचा होताच. मग तिनं जाऊन समोरच्या विंग मधल्या उमाला थोडी कल्पना दिली. आज आता कामात लक्ष लागणं अवघडचं होतं...
---
आंब्याच्या माव्याचा एक तुकडा खाऊन काय होतंय समाधान ! हेमाने अस्वस्थपणे एक दोनदा उगाचच इकडून तिकडे चकरा मारल्या. मग पुस्तक वाचण्याचं सोंग करणा-या हिमांशूकडे तिनं नजर टाकली.
"ए हिमू"
"काय ग?"
"काही नाही, असंच म्हणलं काय करतोयंस ?"
"काही नाही"
उरलेली वाक्ये ’नजरेने’ पूर्ण झाली. wavelength जुळणं म्हणतात ते हेच.
माव्याचा एक तुकडा बाहेर काढून झाला. पण मग दोघांनाही जाणवलं - उगाच काटकसर करण्यापेक्षा दोघांनी एकेक तुकडा खाल्ला तर असा काय मोठासा फरक पडतोय !
मावा थोडा खाली गेल्यासारखा दिसत होता. हेमाने मग तो अधिकाधिक चपटा करून वर ढकलला. क्षेत्रफळ तेवढेच राहिले पाहिजे. जाडी कमी झालेली फारशी समजणार नाही आईला. भूमितीचे ज्ञान कामाला आले !
---
रचनाने चहा करायला फ्रीजमधून दूध बाहेर काढले. संध्याकाळी बाल्कनीमधे बसून चहा पिणे हा तिचा आवडता कार्यक्रम होता. आज दुधाचे पातेले उचलताना तिची आंब्याच्या माव्याकडे नजर गेली. मग तिला थोडी खुशी आणि थोडंसं अनामिक दडपण जाणवलं.
---
"हाय लेव्हल डिझाईन ऑलमोस्ट झालंय. थोडे इश्यूज आहेत. ते आज सॉल्व्ह होतील मोस्टली." रचनानं नितीनला अतिशय जनरल स्टेटस अपडेट दिला.
"Ok. Things are on track, right?"
"Yes, yes, very much on track"
"टास्क किती % कंप्लीट आहे असं लिहू?"
" Umm 15 % "
नितीनला जरा अन्कम्फर्टेबल वाटलं पण त्यानं दुर्लक्ष केलं.
---
"आंब्याच्या माव्याची पातळी जरा जास्तच खाली गेल्यासारखी वाटतिये का रे ?"
"थोडी वाटतिये, पण जाऊ दे. आता काय करणार ?"
---
आज इन्वेस्टमेंट प्रूफ्स द्यायची होती ऑफिसमधे. टॅक्स कॅल्क्युलेशन साठी. कटकटच असते ही एक. रांगेत चांगले दोन तास मोडले. काम कसलं डोंबलाचे होणारे मग ? आज तर सांगून वेळ मारून नेली की "कोड झालंय, पण काही इंटिग्रेशन इश्युज येत आहेत. बेसिक इन्व्हेस्टिगेशन चालू आहे वगैरे वगैरे." पाहू कसे काय होतय.
---
आंब्याच्या माव्याची पातळी उन्हाळ्यातल्या भूजल पातळी प्रमाणे खालावली होती. हेमा आणि हिमांशूने एकमेकांकडे साभिप्राय पाहिले. आता पिशवीचा आकार कसाही बदलून, चपटून, थापटून उपयोग नव्हता. मावा निम्म्यावर संपला होता. आता बोलणी तर खायचीच होती. शेवटी दोघांनी मनाचा हिय्या केला. हेमाने सरळ स्टेपल्स काढून टाकल्या आणि उरला सुरला सगळा गोळा दोघांनी खाऊन टाकला. रिकामी पिशवी मात्र पुन्हा फ्रीजमधे ठेवायला ते विसरले नाहीत !
---
गेले ३-४ दिवस खूप सारवासारवी करून झाली. आज शुक्रवार होता, सोमवारी डेडलाईन होती आणि काम झालेले नव्हते. स्टेटस कसेही दिले तरी उपयोग नव्हता.
"नितीन, माझं काम थोडं लॅग होत आहे. काही unexpected issues मुळे माझा प्रोग्रेस जरा स्लो झाला."
"रचना, आपल्याला सोमवारची डेडलाईन आहे. Quality Assurance ला hand off ठरला आहे. तुला माहीतच आहे की आपले प्रोजेक्ट रिस्कच्या जवळपास आहे. We can not afford to miss this deadline."
" Umm मंगळवार पर्यंत डिले झालेला नाही चालणार का?"
" Doesn't look possible to me. We have to stick to our schedule. So please plan accordingly"
'Plan accordingly' . म्हणजे वीक एंड ला काम कर. Hmmm आधी पापे केली, ती निस्तरा आता. आता आंबा बर्फी विसरा. करा कोडिंग. छे छे छे. आग लागो त्या जॉब ला.
घरी येई पर्यंत रचनाच्या डोक्याचा भाजलेला पापड झाला होता.
चहा टाकावा म्हणून दूध घ्यायला फ्रीज उघडला तेव्हा रचनाची नजर आंब्याच्या माव्याकडे गेली. काहीतरी गडबड वाटली. अरेच्या ! माव्याची पिशवी कुठे गेली ! पिशवी तर तिथेच होती ! मग मावा कुठे गेला !!
रचनाचे उरले सुरले डोके एकदमच आऊट झाले.
"हेमा sss"
"हिमांशू sss"
"एका मिनिटात इथे हजर व्हा".
कारस्थानातील पकडलेले आरोपी मान खाली घालून हजर झाले. आईच्या आवाजाच्या पट्टीवरून त्यांना त्यांचे भवितव्य लगेच कळले.
"लाजा नाही वाटत तुम्हाला ? पाव किलो आंब्याचा मावा खाल्लात चार दिवसात ? अक्क्ल गहाण टाकलीत का काय ? का कुठे खायला मिळत नाही ? आं ? बर्फीसाठी आणला होता ना ? आता बसा बोंबलत. तुम्हाला ती दुकानातली बर्फीच प्रिय ना. काही करणार नाही आता बर्फी न टर्फी पुन्हा. आणि काय ग हेमा, तो हिमांशू एक लहान आहे. तुला पण समजत नाही ? त्याला असं शिकवतेस ? जा चालते व्हा इथनं. तोंड नका बघत बसू माझं. यूसलेस".
हेमा आणि हिमांशू नं काढता पाय घेतला. पण हे तसे अपेक्षितच होते. आता बाबा आल्यावर अजून काय होईल ते पाहू असा विचार करून त्यांनी सहानुभूती मिळवायला उगाचच पुस्तके उघडली. लक्ष मात्र एकमेकांकडे आणि बाबांच्या बेल कडे होते !
हताश होऊन रचनाने आरामखुर्चीत अंग टाकले आणि चहाचा कप तोंडाला लावला. कपभर चहा पोटात गेला तसे तिला जरा तरतरी आली. रागाचा उद्रेक होऊन गेला तसे तिला जरा बरे वाटले. "लेकरांवर एवढे भडकलो आपण, वीक-एन्ड ला काय डोंबल बर्फी करणार होतो !" तिच्या मनात प्रामाणिक विचार डोकावला. हेमाला हाक मारून ती म्हणाली -
"हेमा, मला आज जरा बरं वाटत नाहीये. जा - दोघे जण प्राचीमधून पंजाबीचं पार्सल आणा. आणि असं पुन्हा करू नका. घरातल्या घरात कसले रे चोरून खाता. आवडतो एवढा मावा तर सांगायचे न ! अजून एक पाकीट आणले नसते का !"
कहानी मे ट्विस्ट !! हेमा आणि हिमांशू या अनपेक्षित सुटकेमुळे भलतेच खूश झाले ! आंब्याच्या माव्याची चोरी तर पचलीच, वर पंजाबीची ट्रीट ! Thats cool !!