October 23, 2009

-हस्व आणि दीर्घ

देवनागरी लिपीत -हस्व आणि दीर्घ उच्चारांसाठी इ/ईकार, उ/ऊकार तसंच अ आणि आ अशा स्वरांच्या जोड्या आहेत. देवनागरी लिपी वापरणा-या भाषांसाठी ही व्यवस्था पुरेशी आहे. परंतु इतर भाषांमधील - उदा. इंग्रजी - काही स्वर देवनागरीमधे लिहिता येत नाहीत. उदा. ’बॅंक’ मधील ’ऍ’ हा स्वर मूळ देवनागरीमधील नाही, पण मराठी लिहिताना अक्षराच्या डोक्यावर अर्धचंद्र लिहून त्याची ’व्यवस्था’ करण्यात आली आहे ! हिंदीत हाच शब्द ’बैंक’ होऊन येतो !

आज रामानंद आणि आशुतोषशी गप्पा मारताना रामानंद ने एक बाब माझ्या दृष्टोत्पत्तीस आणून दिली. ती म्हणजे मी Pest आणि Paste या शब्दांचा उच्चार एकाच पद्धतीने करतो, जे चुकीचे आहे.

’टूथ पेस्ट’ आणि ’पेस्ट कंट्रोल’ मधील ’पेस्ट’ वेगळी आहे ;) म्हणजे शब्द पण वेगळे आहेत - एक Paste आहे तर दुसरा Pest आहे. या दोन शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ तर निराळे आहेतच, पण त्यांच्या उच्चारातही फरक आहे. ’टूथ पेस्ट’ मधील Paste चा उच्चार दीर्घ आहे, तर ’पेस्ट कंट्रोल’ मधील Pest चा उच्चार -हस्व आहे. हे शब्द शिकवताना / वापरताना उच्चारांमधील या फरकाचा उल्लेख - किमान बहुसंख्य मराठी माध्यमाच्या शाळांत तरी - अजिबात होत नाही. तसंच हा फरक दाखविण्याची देवनागरी लिपीत पद्धत नाही. ’ए’ हा एकच स्वर असल्याने (इ आणि ई सारखी -हस्व-दीर्घाची जोडी नसल्याने) उच्चारांतला हा भेद, शब्द लिहिताना लोप पावतो.

यावर उपाय म्हणून एखाद्या नवीन स्वराचा लिपीत अंतर्भाव करता येईल,

अथवा ’टूथ पेऽस्ट’असा अवग्रह चिन्हाचा वापर करता येईल.


पेस्ट चे हे दोन उच्चार ऐकायचे असतील तर हे पहा -

http://dictionary.reference.com/browse/paste
[peyst]

आणि
http://dictionary.reference.com/browse/pest
[pest]

October 19, 2009

भावचिन्हे

Emoticons या शब्दासाठी ’भावचिन्हे’ हा शब्द कसा काय वाटतो ?

वाक्यात ’विराम’ दर्शविणारे ते ’विरामचिन्ह’, तसं ’भाव’ दर्शविणारे ते ’भावचिन्ह’.

काळाबरोबर राहण्यासाठी मराठी व्याकरणाच्या पुस्तकात ’विरामचिन्हां’च्या जोडीला ’भावचिन्हां’वर एखादा पाठ असायला हरकत नाही :)

जाहल्या काही चुका !

स्थळ : स्वयंपाकघर
वेळ : सकाळ
गॅसवर ’तिने’ दूध तापवायला ठेवले आहे. ती इतर काहीतरी करण्यात मग्न आहे. दूध उतू जाते. जाताजाता ’त्याचे’ लक्ष जाते, तो धावून गॅस बंद करतो.

पर्याय १ :

"अग काय चाल्लय ? दूध उतू गेलं इथे. कुठे लक्ष आहे तुझं?"
"दिसत नाहीये का भाजी निवडतिये ते ? तू ठेवायचं होतंस की लक्ष. नुसतं बोंबलण्याखेरीज येतंय काय तुला?"
"एका वेळी एक काम कर ना. भाजी नंतर निवडली तर काही जीव जाणार नाहीये. मला उगाच बोंबलायला काही वेड नाही लागलंय. गेल्या आठवड्यात कुकरच्या शिट्ट्यांचा प्रोग्रॅम ठेवला होतास !"
"दुस-याच्या चुका ब-या लक्षात राहतात. स्वत:च्या आठव ना एकदा. गेल्या डिसेंबरात घरात आगीचा बंब यायचा बाकी होता. सोसायटी गोळा केली होतीस ते विसरलास का? चांगल्या भांड्याचा कोळसा केला होतास. अण्णांनी लग्नाच्या वाढदिवसाला भेट दिलेलं पातेलं..."
"घरातलंच पातेलं होतं ते. अण्णांनी कुठे दिलेलं ते?"
"ते पातेलं चांगलं होतं. घरातली टर्कल आहेत पातेली. तुळशीबागेतनं नाहीतर जुन्या बाजारातनं सुद्धा आणली असतील थोडी"
"थोबाड आहे का काय आहे? जुन्या बाजारातनं ? तुमच्याकडंलं माहितेय, निम्मं सामान ते उल्हासनगरचं असणार."
"..."
"..."
"मग इतकं होतं तर लग्नच करायचं नव्हतं"
"मी नव्हतो आलो दाराशी. तुमचेच ’अण्णा’ आले होते सांगत ’मुलगी गुणाची आहे म्हणून’. "
"हो म्हणायला मी नव्हतं सांगितलं. तेव्हा अक्कल कुठे गेली होती?"
"हो, जगातल्या सगळ्या अकलेचा मक्ता तुलाच दिलाय."
...
...

--- ---

पर्याय २:

"अगं दूध उतू गेलं. लक्ष नाही का द्यायचंस..."
"ओह. चचच माझं लक्ष नव्हतं. भाजी निवडत होते एकीकडे. बरं तुझं चटकन लक्ष गेलं. थांब, पुसून घेते."
"असूदे. मी घेतो. तू भाजी निवड."

--- ---

हातून छोटी वा मोठी चूक झाली असेल तर चटकन ’सॉरी’ म्हणण्याने जादूची कांडी फिरते.

प्रत्येक वेळी अगदीच माफीनाम्याची वा क्षमायाचनेची गरज नसते ! चूक मान्य केलेलं पुरतं. पण मुळातच असलेली चूक नाकबूल वा अमान्य केली की रागाचा पारा चढतो.

स्वत:ची चूक कबूल करणे हा पराभव नाही. मुळात जय-पराजय व्हायला हे युद्धच नाहीये !!

एखाद्या व्यक्तीने आपली चूक दाखविली तर कसा प्रतिसाद द्याल ? एक तर स्वत:ची चूक मान्य असेल, समोरची व्यक्ती जे बोलत आहे ते पटत असेल तर चूक मान्य करा। बरं, नाही पटलं तर स्वत:ची चूक नाही हे दुस-याला पटवून द्या।

पण बरोबरी करायला समोरच्या व्यक्तीची भूतकाळातली चूक कदापि काढू नका.

त्याने काय साध्य होते? कोणाचे भले होते? त्याने केवळ विषय भरकटतो, वाढतो। अहंकाराच्या ठिणग्या उडतात. मूळ मुद्दा बाजूला राहतो. आणि दुस-या व्यक्तीने तशीच वा वेगळी चूक मागे केली होती हे नजरेस आणून उपयोग काय आहे ?

बहुतांशी करून कोणालाही आपली चूक दाखविली गेली की कमीपणा वाटतो, अहंकार दुखावला जातो. मग त्याची भरपाई करायला दुस-या व्यक्तीचा अपमान करायची खुमखुमी येते आणि मग भूतकाळ उकरले जातात.

एकच चूक वारंवार घडायला लागली तर चूक दाखविणा-या व्यक्तीचा संयम सुटणे साहजिक आहे ! त्यालाही समजून घ्या !

गोष्टी ज्या च्या त्या वेळेला बोलून टाका, याद्या करून नंतर मारामा-या नकोत.

चुका प्रत्येकाच्या हातून होतात. समोरची व्यक्ती आपल्या चुकांना कसा प्रतिसाद देते, हेही विचारात घ्या. समोरची व्यक्ती तुमच्या चुका समजूतदारपणे नजरेआड करत असेल वा त्या चुका न उगाळता त्यांतून मार्ग काढायचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीलाही तशीच वागणूक द्या, अन्यथा या असमान वागणुकीचे स्फोट मागाहून होतील.

ज्याच्या हातून चुका होतात त्याला दुस-याची चूक काढायचा अधिकार नाही - साफ चूक. परीक्षक पेपर तपासताना चुका काढतात याचा अर्थ त्यांच्या हातून त्या विषयात चुका होतच नाहीत असा नाही. एखादी अयोग्य गोष्ट दिसली की त्यावर प्रतिक्रिया देणे - जे इथे चुका काढण्याचे रूप घेते - ही गोष्ट नैसर्गिक आहे. साधा विचार करा - क्रिकेटची मॅच टी व्ही वर पाहताना क्षेत्ररक्षकाने झेल सोडला की आपण त्याला नावे ठेवत नाही ? त्यातले किती झेल आपल्याला घेता येतील ? चुकीबद्दल दोष देणे ही जवळपास प्रतिक्षिप्त क्रिया आहे. चटका बसल्यावर हात झटकन मागे येतो, तशीच. त्यावर ’चूक मान्य करणे’ हाच उपाय आहे. त्याने दोषारोप करणा-या माणसाच्या शिडातली हवा निघून जाते. विषय संपतो.

दुस-याची चूक दाखविताना सुद्धा, ’काय करायला हवं होतं’ हा भूतकाळ उगाळण्याच्या ऐवजी ’पुढे काय करायचे’ एवढेच बोला. चूक दुरुस्त करायचा प्रयत्न करा.

आणि हो, ही पथ्यं एकतर्फी कायम एकाच व्यक्तीनं पाळण्यापेक्षा सर्वांनीच पाळली तर उपयोग आहे !

बरोबर वाटतंय का चूक ? :)