September 7, 2009

’पेट्रोनस चार्म’ - १

पामराचा मॅनेजर - राग - चे पुण्यनगरीत दार्पण झाले आणि पामराच्या प्रवासाचे प्लॅनिंग सुरू झाले!

’प’ चा अनुप्रा पुरे :)

अर्चनाला भेटून मला तब्बल दोन वर्ष झाली असल्याने मी या ट्रिपची अगदी चातकासारखी वाट पाहत होतो.

Approval, B1 visa, Currency in Dollars, E-ticket अशी Flight ची वर्णमाला आकार घ्यायला लागली. २७ जून ही प्रवासाची तारीख मुक्रर झाली. शुक्रवारी रात्री/ शनिवारी पहाटेची फ्लाईट घेतली की शनिवारीच दुपारी/ सायंकाळी अमेरिकेत पोहोचता येतं आणि मग रविवारची विश्रांती घेऊन सोमवार पासून कामाला जुंपून घेता येतं. अमेरिकेस जावयाचे असले की माझ्यापेक्षा आई बाबांनाच जास्त तयारी करावी लागते ! अर्चनासाठी पाठवायच्या वस्तू आणि त्या वजनाच्या मर्यादेत बसताहेत का नाहीत याच्या चाचण्या ! एकदा वस्तूंचे वजन, मग पूर्ण बॅग चे वजन, मग ते नीट भरत नाही म्हणून माझे बॅग सकट वजन वजा माझे वजन ! आणि सर्व चाचण्यांचे निकाल वेगवेगळे ! नुकतेच आपल्या अणुचाचणीचे घोळ ऐकतोय, म्हणजे मी एकटाच काही चाचणीत घोळ घालत नाही तर :)

पूर्वी सामानाच्या वजनाची मर्यादा ६४ किलो असे, आता ती ४६ किलो करण्यात आली आहे :( ही आकड्यांची चुकून झालेली अदलाबदल असावी असा मला दाट संशय आहे. थोडक्यात काय, तर माझ्या प्रवासाचे उद्दिष्ट या खेपेला माल-वाहतूक कमी आणि प्रवासी वाहतूक अधिक असे होते !

मी उपलब्ध पर्यायांपैकी ’कोरिअन एअर’ हा पर्याय निवडला. या फ्लाईटला एकच थांबा आणि तोही अतिशय कमी वेळाचा असल्याने ही फ्लाईट वेळाच्या बाबतीत बरीच सुटसुटीत आहे. एकच अडचण म्हणजे मुंबईहून ही फ्लाईट रात्री ३.३० ला सुटत असल्याने तोवर तिष्ठत रहावं लागतं आणि झोपेचं खोबरं होतं ! असो. आखूड शिंगी, बहुदुधी असा पर्याय कुठून मिळणार !!

निघायच्या क्षणापर्यंत कामात व्यग्र असल्याने अर्चनासाठी विशेष कुठली भेटवस्तू घ्यायला जमली नाही, पण मग आमचे कुटुंबियांचे काही जुने फोटो - जेव्हा आम्ही दोघे बरेच लहान होतो - निवडून त्यांच्या अर्चनासाठी प्रती बनवून घेतल्या. तसंच शाळेत असतानाचे अर्चनाचे सलग अनेक वर्ष सर्व तुकड्यांत पहिल्या क्रमांकाचे बक्षीस स्वीकारतानाचे फोटो होते, ते ही घेतले.

अमेरिकेत काय काय गोष्टी करायच्या आणि खरेदी काय करायची याची एक यादीच मी आणि अर्चनाने मिळून Google Documents वर करायला घेतली ! त्यात अगदी 'Castro street वर भटकणे’ यापासून 'Torani's English Toffee syrup' विकत घेणे येथपर्यंत असंख्य गोष्टी होत्या ! या खेपेस आई बाबा घरीच असल्याने मागे राहिलेल्या कामांची काही विशेष काळजी नव्हती. माझी लाडकी ’इंडिका’ मात्र माझा मित्र प्रशांतच्या ताब्यात देऊन निर्धास्त झालो.

२००५ सालापासून मुंबईच्या पावसाने माझ्या मनात धडकी भरवली असल्याने मला स्वत:ला प्रवासाला जायचे असो वा कोणाला सोडायला/आणायला जायचे असो, मी विमानतळावर झाडू मारायच्या हिशेबानेच पोहोचतो :) या खेपेसही संध्याकाळीच मुंबईस जायला निघालो. गाडीत अजून दोन सहप्रवासी होते - एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होता, तोही अमेरिकेस जावयास निघाला होता तर दुसरे गृहस्थ ’फादर’ असून ते जर्मनीस जायला निघाले होते. मुंबईला जायचे असले की सहसा चांदणी चौकातून नाहीतर सदानंद हॉटेलपाशी हायवे ला लागतो. फारतर वाकड मधून. या खेपेला बाकीचे पिक-अप्स केल्यावर ड्रायव्हर ने चिंचवड मधून जुन्या हायवे मार्गे जाऊन मग एक्स्प्रेस वे ला गाडी घेतली. चिंचवड पर्यंतचा रस्ता आता सुरेख झाला आहे. तेथून पुढे जाताना मात्र समोरून येणा-या वाहनांशी एक दोनदा टक्कर होता होता राहिली ! ’ओव्हरटेक करणे म्हणजे काय’ हे आपल्या इथे ब-याच लोकांना ’समजवण्याची’ आवश्यकता आहे. सगळा रस्ता आपल्याच बापाचा आहे असे कोण शिकवते कोणास ठाऊक ! इतकी गुर्मी आणि मस्ती, आणि स्वत:च्या आणि दुस-याच्या जिवाशी खेळ करायचा अधिकार हा बहुधा इथल्या मातीत ’जन्मसिद्ध’ असावा. बाणेर रस्त्यावर देखील युनिव्हर्सिटीच्या पुढे दुभाजक नसल्याने लोक विरुद्ध दिशेने येणा-या वाहनांच्या जागेत घुसतात. मला नेहमी एक कोडे पडते. दर वर्षी पगार वाढतात, वस्तूंच्या किमती वाढतात, पण वाहतुकीचे नियम तोडल्याचे दंड मात्र आहेत तिथेच आहेत ! या तुलनेत अमेरिकेत चौकात ’स्टॉप’ चिन्हापाशी इमाने इतबारे थांबणारे लोक पाहिले की आश्चर्य वाटते. आणि ’साम दाम दंड’ ही आपल्याच पूर्वजांची शिकवण आपण का विसरतो याचा खेद ! कदाचित जीवनातली अशाश्वतता किती आहे हे सारखे जाणवत रहावे आणि आपण ’शाश्वत’ गोष्टींच्या भजनी लागून आपली अध्यात्मिक उंची वाढावी असा शासन यंत्रणेचा उदात्त दृष्टिकोन असावा.

असो. फूड मॉल वर ’नेस टी’ चा नेम (!) पूर्ण करून पुढे मार्गस्थ झालो. लोणावळ्यापाशी आल्यावर ’गिरिशिखरांवरुनी सोगे सुटले ढगांचे’ चे विलोभनीय दृश्य पहावयास मिळाले. काही अंतरापलिकडील दृश्य दिसत नव्हते. हिरवेगार डोंगर धुक्याच्या दुलईत समाधिस्त होऊन बसले होते. हवेत गारठा जाणवत होता. पावसाच्या हलक्या सरी होत्या. अशा हवेत जर जवळपास वाफाळणारा चहा, मसाला दाणे, कणीस वा गरमागरम भजी यांतलं काहीच नसेल तर मला तो अनुभव कधीच पूर्ण वाटत नाही ! अमेरिकेत असताना मला पदोपदी तिथल्या खाद्यजीवनातलं हे उणेपण जाणवायचं ! काही वर्षांपूर्वी मी कॅलिफोर्नियातील 17 Mile Drive या विलक्षण रम्य परिसराला भेट दिली होती. तेव्हा मला ही उणीव प्रकर्षाने जाणवली होती की रस्त्याच्या कडेला एकसुद्धा ’टपरी’ नव्हती !!


लिहिता लिहिता मला असं जाणवलं की माझ्या बोलण्यात पर्यटनाचा विषय आला की अमेरिकेतीलच उल्लेख बरेचदा येतात. खरंय. गंमत म्हणजे, मी भारतात राहतो, अमेरिकेस केवळ थोड्या धावत्या भेटी दिल्या आहेत. पण या अत्यल्प कालावधीत मी अमेरिकेत जेवढा भटकलोय तेवढा इतक्या वर्षांत भारतातही भटकलो नाहीये. त्याला बरीच कारणे आहेत. त्यातलं मुख्य म्हणजे अमेरिकेत (मी पाहिलेल्या, अनुभवलेल्या) पर्यटनाला जेवढी पोषक परिस्थिती आहे त्याच्या अंशत:ही येथे नाहीये. वस्तुत: इथे निसर्ग सौंदर्याची उधळण आहे, खाण्यापिण्याची रेलचेल आहे. ही आपली मातृभूमी आहे. पण अपु-या वाहतूक, निवास इ. सोयीसुविधा, माहितीची त्रोटक उपलब्धता आणि मनावर खोलवर घाव घालणारा स्वच्छतेचा अभाव या गोष्टी ओलांडून जावेसे वाटत नाही. अमेरिकेत पहा (मी अमेरिकेची इतकी टकळी लावण्याचे कारण, भारत सोडता हा एवढा एकच देश मी थोडाफार पाहिला आहे) - रस्त्यांचे प्रचंड जाळं विणलंय, जागोजागी एक्झिट्स पाशी गॅस स्टेशन, फूड कोर्ट्स, रेस्ट रूम्स असतात, जाल तिथे सुसज्ज होटेल्स मिळतात, अगदी किफायतशीर दरात (डॉलर ला ५० ने गुणू नका !!) - फ्रीज, मायक्रोवेव्ह, कूलर हीटर सह; प्रवासासाठी भाड्याने गाड्या मिळतात ! अजून काय हवं ! आपल्याकडे ’सुवर्ण चतुष्कोनाचे’ रस्ते सोडले तर आनंदी आनंद आहे ! रस्त्यावर दुभाजक सोडा, दुभाजक पट्टा सुधा सापडत नाही, बेशिस्त बाहतुकीला जरब नाही, (मानवनिर्मित !!) स्वच्छतागृहे आस्तित्वात नाहीत :(
असो. शेवटी प्रत्येकाचा प्राधान्यक्रम निराळा असतो. ज्या लोकांची ’प्रवासाला गेलं की सगळं चालवून घ्यायचं’ अशी मनोवृत्ती नसते, त्यांना बंधनं पाळणं भाग आहे !
काही जण म्हणतील, इतकं अडतंय तर जा ना अमेरिकेत ! कोणी सांगितलंय इथं राहून चडफडायला !
अमेरिकेत जाणं हे उत्तर नाहीये. मला केवळ या सुविधा आणि ही संपन्नता नकोय. मला ती ’इथेच’ हवीये ! माझ्या देशात. मी भरलेल्या इन्कम टॅक्स मधून.

विमानतळावर पोहोचलो तर वेगळेच दृश्य दिसले ! टर्मिनल्स कडे जाणारा रस्ता बदलून गेला होता आणि इमारतीवर घुमट दिसले ! विमानतळाच्या आधुनिकीकरणाचा भाग असावा. तिकीट दाखवून आत प्रवेश केल्यावर इमारतीचा अंतर्भागसुद्धा कायापालट झाल्यासारखा दिसला. दोन वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा संगमरवरासदृश दिसणा-या भिंती, खांब, जमीन जुनेपणाच्या निशाण्या अंगाखांद्यावर बाळगून उभ्या होत्या. आज मात्र विट्रिफाईड टाईल्स, स्टीलसदृश चकाकणारे खांब, पुरेशी प्रकाशयोजना - सारे काही कात टाकल्यासारखे दिसत होते. तेवढ्यात लक्षात आले - आधुनिकीकरण करताना इथल्या ’खुर्च्या’ गायब झाल्या होत्या !! आणि मी लवकर येऊन टपकल्यामुळे चेक इन सुरू व्हायला बराच अवकाश होता. माझ्यासारख्या उगाच लवकर येणा-या मूर्खांसाठी विमानतळावर आसनव्यवस्था करायचे काहीच कारण नसणार ! मग मी आजूबाजूच्या इतर मूर्खांप्रमाणे अजून एक जास्तीची ट्रॉली घेतली आणि त्यावर आरूढ झालो. तसाही आपला देह म्हणजे तरी काय, ’नर्काचे पोतडे’ ! ठेवले ट्रॉलीवर तर बिघडले कुठे !! विमानतळ प्राधिकरणाने इथे ’ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ किंवा ’देहेदु:ख ते सूख मानीत जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे’ इ. संतवचने लावून मुमुक्षू जनांस धन्य करावे.

दुसरा बदल जाणवला - मागच्या एका पोस्ट मध्ये लिहिलं आहे - प्रवाशांना सोडायला येणा-या आप्तेष्टांशी गपा मारायला एक रेलिंग सारखी व्यवस्था होती. ती गायब झाली आहे ! म्हणजे निरोप समारंभ काय असतील ते विमानतळाच्या इमारतीच्या बाहेर करायचे ! उत्तम.

थोड्या वेळाने पोटात काक वंशीयांचे कूजन सुरू झाले ! मग घरून घेतलेला डबा संपवला आणि कॉफी ढोसली. मग थोडा वेळ लॅपटॉपवर ’कंग फू पांडा’ हा माझा अतिशय आवडता ऍनिमेशन-पट पाहिला. आणि मग नंतर आजूबाजूचे ’साखरेचे पुतळे’ न्याहाळणे हा माझा आवडता वेळ घालविण्याचा छंद आहे, त्याकडे वळलो. मग एकदाचे चेक-इन काउंटर उघडले. सामानाचे वजन मर्यादेच्या आत निघाल्याने माझा जीव भांड्यात पडला ! मग इमिग्रेशन, सुरक्षा तपासणी इ. सोपस्कार आटोपून गेटाकडे कूच केले. जाग्रण झाले की अवेळी भूक लागते ! इकडे तिकडे फिरून काही किडूक मिडूक तोंडात टाकावे का अशा विचारात असताना K F C चा स्टॉल दिसला. तिथले बहुतांशी पदार्थ नॉन-व्हेज असले तरी तिथे Veggie Fingers हा खमंग आणि चविष्ट व्हेज पदार्थ मिळाला. थोड्याच वेळात बोर्डिंग सुरू झाले. आश्चर्याचा अजून एक धक्का ! एका बस मधून बरच फिरून मग विमानापाशी आलो, आणि चक्क जिना चढून विमानात जायचे होते ! जेट वे कुठे गायब झाला कोणास ठाऊक ! बहुधा नूतनीकरणाच्या कामात तात्पुरता उपलब्ध नसावा. तसंही ’जिना’ या शब्दाला भारतात आजकाल फारच महत्व आलंय ;)

काही लोक कोप-यावरून दुधाची पिशवी आणायला जावं तितक्या सहजतेने आंतरराष्ट्रीय प्रवासास निघतात ! I am far from it ! त्यामुळे प्रवास म्हणला की मला शारिरीक आणि मानसिक थकवा नेहमीच येतो. मग सीट बेल्ट लावल्यावर पापण्या कधी अलगद मिटतात तेही कळत नाही.