January 26, 2008

नॉस्टॅल्जिया

You never know ! सदाशिव पेठेत राहणा-या, चप्पल घालून आणि शर्ट इन न करता फिरणा-या, हाताने डोसा खाणा-या, अमृततुल्य चहा आणि बेडेकर मिसळ चापणा-या निखिल मराठे नामक पुणेरी भटास "Vivaldi's Concerto for Two Guitars, G major" ऐकून नॉस्टॅल्जिक वाटू शकते !!

एखादं गाणं आपण एखाद्या प्रसंगी/ठिकाणी ऐकतो - कदाचित प्रथमच ऐकत असतो वा तो प्रसंग विशेष असल्याने ते गाणं मनात ठसतं - आणि मग तो प्रसंग, स्थळ, अथवा हवा आणि ते गाणं यांची मनात कायमची जोडी जुळते. मग काही गाणी फारशी छान नसूनही आवडून जातात तर काही सुरेल गाणी अप्रिय बनतात ! ’बेटा’ चित्रपटातली गाणी ऐकून हिमाचल प्रदेशातले वळणावळणांचे देखणे घाट डोळ्यासमोर येतात, ’दूरिया नजदीकिया’ ऐकताना गाणी ऐकत ऐकत (न) केलेला इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा अभ्यास आठवतो, ’थोडीसी जमीन’ ऐकून माझा आणि अर्चनाचा लॉस ऍंजेलिस ला जाताना कार मधून केलेला प्रवास आठवतो, ’तुम आए तो’ मला गोव्याला घेऊन जातं तर ’रात अकेली है’ ऐकताना ’हिल्टन-मिनिआपोलिस’ च्या २३व्या मजल्यावरच्या माझ्या खोलीतून दिसणा-या हलक्या हिमवर्षावाने शाकारलेल्या शुभ्र इमारती डोळ्यासमोर येतात...

तसं पाहिलं तर मी भारतीय संगीत प्रकारांमध्ये अधिक रमतो. त्यामुळे हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत, नाट्यगीतं, भावगीतं, मराठी/हिंदी चित्रपट संगीत सोडून मी ’पाश्चात्य शास्त्रीय संगीता’ च्या वाटेला जायची तशी शक्यता नव्ह्ती! पण त्याचे असे झाले -
२००० सालची गोष्ट आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत (!) असताना दर वर्षी मी बोट क्लब च्या ’रिगाटा’ मध्ये सहभागी होत असे. एक वर्ष ’कयाक बॅले’ या इव्हेंट मधे भाग घेतल्यावर पुढल्या वर्षी हाच इव्हेंट आयोजित करायचे ठरवले.

आमची सुरुवात तशी फारशी प्रेक्षणीय नव्हती :) आमच्या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचे इतर बोटिंग संघटनांबरोबर काही मतभेद झाल्यामुळे आम्हाला सरावासाठी कयाक मिळायला उशीर झाला. उरलेल्या दिवसांत मुलांना कयाकिंगचे जुजबी प्रशिक्षण देऊन फॉर्मेशन्सच्या सरावाला सुरुवात करायची होती. पण इव्हेंटमधे सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची एक उत्तम, एकदिलाने काम करणारी टीम जमली आणि कामाला वेग आला.

कयाक ही अतिशय हलकी आणि वेगवान बोट - जितकी डौलदार तितकीच अस्थिर आणि चंचल. थोडासा तोल गेला की पाण्यात पलटी ठरलेली. या इव्हेंटमधे आम्ही अनेक फॉर्मेशन्स करत असू. अतिशय वेगात - एकमेकांस जवळपास टक्कर देतील इतक्या जवळून केलेले क्रॉसेस, वर्तुळं, समांतर कवायती .. कयाक पाण्यातून विहरताना मागे जो ’वेक’ बनतो त्याने फॉर्मेशन्सला एक सुंदर इफेक्ट मिळतो. पण थोड्याफार फरकाने दर वर्षी होणा-या या सा-या फॉर्मेशन्सव्यतिरिक्त कहीतरी नवीन करून दाखविण्याची इच्छा मनात होती. ब-याच विचारांती असं ठरलं की इव्हेंट संपताना शेवटच्या फॉर्मेशन मधे पाण्यावर टिकून राहील अशी तरंगणारी एखादी आकृती पाण्यावर बनवावी. मग पाण्यावर तरंगणा-या, चांगला दिसेल आणि कयाकमधे सुटसुटीतपणे ठेवता येईल (आणि फार महाग नसेल!!) अशा पदार्थांचा शोध सुरू झाला. रांगोळी, रंग, फुलांच्या पाकळ्या असा प्रवास ’गुलाला’पाशी येऊन थांबला.

ऑर्गनायझर म्हणून काम करताना फॉर्मेशन्स डिझाईन करण्याखेरीज इतर अनेक जबाबदा-या पार पाडाव्या लागतात. त्यातलीच एक - संगीत. इव्हेंटला बॅकग्राऊंड म्यूझिक कोणते वापरायचे यावर बराच खल झाल्यावर अशा मतावर आलो की कोणताही भारतीय संगीत प्रकार येथे जुळत नाहीये. मग डोळ्यापुढे नाव आले माझा मित्र जयदीपचे. त्याने लगेच वेस्टर्न क्लासिकल च्या चार कॅसेट आणून दिल्या. संध्याकाळी घरी आल्यावर ते प्रकरण नक्की काय आहे ते पाहू म्हणून ऐकून पाहिले तर आपण योग्य मार्गावर आहोत असे जाणवले. पण एक मोठीच अडचण उभी राहिली! वाद्यसंगीत असल्याने शब्द नाहीत ! आणि डी मेजर आणि सी मायनर हे माझ्या आकलनापलीकडचे, त्यामुळे फास्ट फॉरवर्ड आणि रिवाईंड करता करता कुठला पीस कुठे सुरू होतोय आणि कुठे संपतोय हे कॅसेटचे कव्हर पाहून अजिबात समजेना :) मग निर्बुद्ध चेहरा धारण करून सरळ जयदीपला बरोबर घेऊनच काम करायचे असे ठरले. दिवसभर कॉलेज आणि प्रॅक्टिस असल्याने या उद्योगाला रात्र हा एकच वेळ उरला. इव्हेंटची तारीख जवळ येत होती. मग शर्थीचे प्रयत्न सुरू झाले - दिवसा प्रॅक्टिस पाहायची, कोणत्या फॉर्मेशनला किती सेकंद वेळ लागतो, एकंदर फोर्मेशनचा वेग आणि मूड कसा आहे हे पाहायचे आणि रात्री कॅसेटवर कॅसेट ऐकून त्यास जुळणारा पीस टिपून घ्यायचा..एव्हाना बाक, बीथोवन, विवाल्डी, मोझार्ट, शूबर्ट ही नावे सुपरिचित झाली होती.

इव्हेंटचे बाकी ताणतणाव वाढत होते. तारीख जवळ जवळ येत होती. रिगाटाच्या दोन दिवस आधी रंगीत तालीम होती. तोपर्यंत हे संगीताचे तुकडे जोडून झाले होते पण प्रत्यक्ष फॉर्मेशन्स मात्र कमालीची संथ आणि खराब झाली. रिगाटा सेक्रेटरी आणि काही सिनिअर्सनी चांगलीच खरड तर काढलीच पण त्याचबरोबर आत्मविश्वासही थोडा डगमगला ! शेवटचे दोन दिवस सराव, चुका शोधून दुरुस्त करणे आणि इतर अनेक व्यापांमध्ये कसे गेले ते समजलेही नाही.

अखेरीस रिगाटाचा दिवस उगवला. सकाळी एक नाममात्र सराव घेऊन विश्रांतीसाठी सुटी घेतली. सायंकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. कयाकमध्ये बसलेल्या माझ्या सर्व सहाध्यायी मित्रांना सुयश चिंतून मी कॉम्पीअर बॉक्समध्ये येऊन माझ्या इव्हेंटची वाट पाहत उभा राहिलो. मुळा नदीच्या काठावर कॉलेजच्या आवारात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होती. थंड वा-याच्या झुळका येत होत्या. कार्यक्रमांच्या उद्घोषणा चालू होत्या. छातीत धडधडणे आणि कानशिले गरम होणे म्हणजे काय याचा एक कधी न विसरणारा अनुभव होता तो !

सूर्य कलायला आला आणि ’कयाक बॅले’ ची उद्घोषणा झाली. माझे हात एव्हाना थंडगार पडले होते ! पाण्यात उतरून इव्हेंट मधे स्वत: भाग घेणे आणि धडधडत्या छातीने बाहेर उभे राहून एका प्रेक्षकाच्या भूमिकेतून आपलाच इव्हेंट पाहणे यातला फरक चांगलाच समजला ! पहिल्याच क्रॉसला प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त टाळ्या मिळाल्या आणि दडपणाची जागा उत्साहाने घेतली. ठरल्यानुसार सारी फॉर्मेशन्स वेगात आणि सुंदर पार पडली आणि चार कयाक सोडून इतर कयाक काठावर परतल्या. क्षितिजावर टेकलेला सूर्य, Concerto for Two Guitars ची धून आणि आधीच्या सा-या फॉर्मेशन्सच्या वेगाशी फटकून अतिशय संथ, लयबद्ध, पाण्यावर गुलाल सांडत जाणा-या चार कयाक... आमचा सरप्राईज इव्हेंट!!! शेजारी उभा असलेला डी.जॆ. न राहवून विचारतो - "अभी ये तो कुछ नही कर रहे है ?" आणि काही क्षणांतच डोळ्यांसमोर आकार घेतं पाण्यावर डौलाने लहरणारे, गुलालाने रेखांकित केलेले ’हार्ट’. ’ये दिल मांगे मोअर’ - कॉंपीअरिंग करणा-या रामानंदचा अतिशय उत्साही आवाज आणि प्रेक्षकांतून होणारा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट...
विद्यार्थीदशेत असताना केलेला हा एक छोटासा, हौशी, नवशिका प्रयत्न निर्मितीचे समाधान आणि आत्मविश्वास देऊन गेला.

कधीकधी असं होतं की काही समीकरणं चुकतात... आपला स्वत:वरचा विश्वास डळमळतो...निराशेचं धुकं मनाला वेढून टाकतं... ’I am a nobody’ अशी भावना मनाला ग्रासून टाकते... तेव्हा पावलं टेप कडे वळतात. ’रिगाटा २०००’ असं लेबल असलेली, जपून ठेवलेली बॅकग्राऊंड म्यूझिकची कॅसेट हातात घेतो... वेस्टर्न क्लासिकलची सुरावट कानात रूंजी घालते. मन काही वर्षं मागे जातं. डोळ्यांसमोर उभं राहतं मुळेचं पात्र आणि त्यावरचं गुलाबी ’हार्ट’. "ये दिल मांगे मोअर" आणि टाळ्या...

हळूहळू पाण्यावर उठणा-या तरंगांमधे ’हार्ट’ विरून जातं.
अन् निराशाही.

-------------------------------------------

२००७ मधे मी एकही लेख ब्लॉगवर लिहिला नाही... काही सुचतही नव्हतं आणि लिहायची लहरही येत नव्हती. प्रत्येक फोनवर अर्चना सांगायची - "अरे लिही रे काहीतरी...". परवा तिनं फोनवर सांत्वन केलं - "आता ’मराठी ब्लॉग विश्वा’ वर तुझा ब्लॉग ’मृत ब्लॉग’ च्या यादीत गेला आहे. असो. जन्माला आलेली गोष्ट कधितरी जाणारच. दु:ख बाजूला ठेऊन आयुष्य सुरू कर !"
माझा प्रिय ब्लॉग मरायला टेकलेला पाहून मी खडबडून जागा झालो :) योगायोगाने तेव्हाच घरातले फर्निचरचे काम संपले आणि "तुझ्या त्या ’कॅसेटी’ तिकडे हलव" असे वरिष्ठ सूत्रांकडून फर्मान आले! ’कयाक बॅले’ ची कॅसेट मला अगदी ’बुडत्याला काडी’ मिळावी तशी मिळाली !