June 19, 2005

पामर उवाच |

सिंहावलोकन
लिहायला सुरुवात करून एक वर्ष झालं. या एक वर्षात पामर 'बालिश बहु' बडबडला आणि त्याच्या दोस्तांनी ते सहन केलं :) आज पहिल्या वाढदिवसाच्या निमित्त थोडं मागे वळून पाहायचं ठरवलं आहे. 'सिंहा'वलोकन म्हणायचे एकमेव कारण म्हणजे माझी सूर्य रास 'सिंह' आहे :) आणि तसेही मी मोठा लेखक नसलो तरीही 'म्हणोन काय कोणी चालोच नये' च्या धर्तीवर मी माझ्या 'सिंहावलोकनाचे' समर्थन करू शकतो !

'पामर' का ?
तसे मला माझ्या माता पित्यांनी इतर ब-याच गोष्टींबरोबर चांगले नावही दिले - 'निखिल मराठे'. मग मी 'पामर' का ?
माणूस त्याच्या छोट्याशा जगात जगत असतो. आपली सुख दु:खे कुरवाळीत. आपल्याच कोशात. स्वार्थी आणि दृष्टिहीन. कधीतरी कुठल्याशा अपघाताने तो जगाकडे पहायला शिकतो आणि ते दृश्य सामावून घ्यायला त्याचे इवलेसे डोळे विस्फारतात. त्याच्या बुद्धीच्या आणि विचारांच्या कक्षेबाहेरील विश्व समजावून घेण्याची त्याची धडपड सुरू होते. जे जे दिसतं, त्यातलं काहीच पचतं, रुचतं. जे समजत नाही, पटत नाही, सहन होत नाही त्याचा विचार मनात आवर्त उठवतो. सत्य-असत्य, शाश्वत-अशाश्वत, बरं-वाईट, आपलं-परक्याचं, न्याय-अन्याय, धर्म-अधर्म, नीती-अनीती यातले भेद पुसट वाटायला लागतात. पण दररोजच्या आयुष्याच्या संघर्षात या भेदांच्या रेखा पुसता येत नाहीत. 'The Answer to Life, the Universe, and Everything ' शोधायचा प्रयत्न करून हार पत्करल्यावर माणूस तत्वज्ञानाकडे वळतो. स्वत:ला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं दुस-या कोणी शोधली आहेत का याचा धांडोळा घेतो. मग मनात सुरू होतो एक जीवघेणा संघर्ष. एका बाजूला 'Nothing matters', 'ही सारी माया आहे' ही वाक्ये कानात घुमायला लागतात, तर ही वाक्ये वापरूनही रोजचे प्रश्न तर सुटत नाहीत. तत्वं समजतात पण उमजत नाहीत. कळतं, पण वळत नाही. खूप अधांतरी वाटतंय ना ? प्रश्न सोपे असतात. प्रत्येकालाच रोज दिसतात.
लोक रहदारीचे नियम पाळत का नाहीत ?

माझे शहर स्वच्छ का नाही ?
लोक भ्रष्टाचार का करतात ?
लोक एक दुस-याला का दुखावतात ?
जगात अन्याय का आहे ?
जगात गरिबी का आहे ?
हे आणि असे अनेक...
'ही सगळी माया आहे' आणि 'हे असेच चालायचे' अशी हार मानवत नाही आणि दोन हात करायला हातात शक्ती आहे का नाही हेही उमगत नाही.

पायी धोंडा, गळ्यात ओंडा,
एक देईना तरू, दुजा देईना मरू
अशी अवस्था होते.
मग समजतं, की आपण 'पामर' आहोत.

'पामर उवाच' का ?
मनातला क्षोभ कमी व्हावा म्हणून त्याला वाट करून द्यायला. समविचारी मनं शोधायला. आपण पृथ्वीवरून अंतरिक्षात रेडिओ लहरी प्रक्षेपित करतो.. इतर कोठे जीव स्रुष्टी असेल, तर त्यांना सुगावा लागावा की आम्ही येथे आहोत, म्हणून. तसंच मी लिहितो ते शोध घ्यायला - अजून कोणी 'पामर' आहेत का ? कोणी वाटाड्या मिळेल का ?
मला पडलेले प्रश्न सोडवायला मी एकटाच यथाशक्ती प्रयत्न का करत नाही ? भडकलेल्या आगीत मी ओंजळभर पाणी टाकून ती आग विझणार नाही, माझे ओंजळभर पाणी तेवढे वाफ होऊन विरून जाईल. पण दहा हातांनी पाण्याचा मारा केला, तर ती आग विझू शकेल. मी गोवर्धन उचलू शकत नाही, पण कोणी उचलणारा असेल, तर मी खालून काठीचा टेकू द्यायला उभा आहे.

साथ
या एक वर्षाच्या वाटचालीत खूप जणांनी साथ दिली.
रामानंद - ज्याचा ब्लॉग पाहून मलाही लिहावेसे वाटले आणि ज्याने ब्लॉग लिहिण्यातल्या छोट्या छोट्या अडचणी सोडवायला मदत केली..
अर्चना - काहीतरी ताजे, मराठी वाचायला मिळेल म्हणून रोज वेड्या आशेने माझ्या ब्लॉग ला भेट देणारी माही बहीण...
हेतल - अतिशय नियमित माझा ब्लॉग वाचणारा, कायम कौतुक आणि प्रोत्साहनाचा हात पाठीवर ठेवणारा माझा मित्र...
आणि माझे बोबडे बोल ऐकून नेहमीच मला हुरूप देणारे अनेक सखे - शशांक, संदीप, अनुप, सानिका, मंदार, अस्मिता; माझे आई बाबा, आणि इतर काही 'Anonymous' !

समर्थांची 'दिसामाजी काहीतरी' ही शिकवण शिरोधार्य असली तरी रोज लिहिता येत नाही ! त्यासाठी बराच वेळ आणि त्याहून महत्वाचे म्हणजे जागृत प्रतिभा असावी लागते ! माझी अल्प-स्वल्प क्षमता वापरून केलेला हा प्रयत्न गोड व्हावा अशी इच्छा मनात ठेवून मेणबत्त्या फुंकरतो...