August 23, 2005

आनंदवनभूवनी

जन्मदु:खे जरादु:खे । नित्यदु:खे पुन: पुन: ।
मूक सोसणे, राहणे । आनंदवनभूवनी ॥

मोटार चालती मार्गे । बैलगाडी बरोबरी ।
दुचाकी लोटिल्या वेगे । आनंदवनभूवनी ॥

नियमांचे उठले ठाणे । पायदळी तुडावले ।
गुर्मीने माजले सारे । आनंदवनभूवनी ॥

पूर्वी जे हटवले होते । तेचि आता बळावले ।
अतिक्रमण बहू जाले । आनंदवनभूवनी ॥

खड्डा खड्डा बहू खड्डा । रस्ता कोठे दिसेचिना ।
गुप्त ते गुप्त जाणावे । आनंदवनभूवनी ॥

मुरूम खडी दाटिली । डांबर लोटिले वरी ।
रात्रीत उखडले सारे । आनंदवनभूवनी ॥

टेकड्या व्यापल्या सा-या । झोपडपट्टी, इमारती ।
गीळले नदी पात्रही । आनंदवनभूवनी ॥

उत्साव जाहले मोठे । ध्वनी कल्लोळ ऊठला ।
सरकार टोकीना कोणा । आनंदवनभूवनी ॥

शिस्त नाही लाज नाही । विवेक सारा सांडिला ।
कळेना कायरे होते । आनंदवनभूवनी ॥

वाढले भेदवाही ते । नष्ट चांडाळ पातकी ।
अनर्थ जाहला मोठा । आनंदवनभूवनी ॥

कष्ट ते सोसले मोठे । अपाय बहुतां परी ।
उपाय कोण सूचवी । आनंदवनभूवनी ॥