March 3, 2009

डायरी २००७

२५ जून

मुंबईला जाण्यासाठी थोड्याच वेळात निघायचे आहे. रात्री साडेबाराची Singapore Airlines ची फ्लाईट आहे. केवळ दोनच दिवस, आणि आई-बाबा आणि अर्चनाची भेट होणार !! तीसुद्धा सॅन फ्रान्सिस्को मधे !!
दोन महिन्यांपूर्वी आई बाबा अमेरिकेला जावयास निघाले तेव्हा त्यांना निरोप द्यायला सहार विमानतळावर गेलो होतो. तेव्हा ’आता पुन्हा भेट सहा महिनांनी’ अशीच मनाची तयारी झाली होती. पण सारेच योग अचानक जुळून आले आणि माझे तीन आठवड्यांसाठी अमेरिकेस जायचे नक्की झाले.
यापूर्वी अमेरिकेला जाताना आई बाबांचा निरोप घेऊन निघताना हुरहूर वाटायची, पण पुढला काही काळ अर्चनाचा सहवास लाभणार ही भावना मनाला तितकीच सुखावत असे. दोन विरुद्ध पाश मनावर एकाच वेळी अंमल गाजवत... आजची फ्लाईट मात्र मला आई-बाबा आणि अर्चू - सगळ्यांकडेच घेऊन जाणार आहे ! आणि निरोप घ्यायचा आहे तो बंद घराचा. हो. माझ्या घराचा...

घराला कुलूप लावताना अनामिक अस्वस्थता दाटून आली आहे. ’घराला’ तीन आठवडे ’एकटं’ टाकून जायचं !! घराचं घरपण असं चेहरा लेऊन आलेलं पहिल्यांदाच प्रकर्षानं जाणवतंय... कुटुंबियांना, घर-गाडीला एक महिनाभर सोडून जाताना मनाची ही अवस्था, तर जेव्हा हे सगळंच मागं सोडून - कायमचं - जायची वेळ येते तेव्हा मनात भावनांचा कोण कल्लोळ असेल ! पुस्तकातला दासबोध अजून मनात आणि बुद्धीत उतरायला खूप खूप अवकाश आहे !

मुंबईला जायला इंडिगो ठरवली आहे. सगळं सामान गाडीत लादून मुंबईचा प्रवास सुरू झाला आहे. सीटवर छान रेलून मोकळा श्वास घेताना गेल्या काही आठवड्यांतली धावपळ डोळ्यांसमोर येत आहे...

घरात आवराआवरी आणि पॅकिंगची बरीच कामे आ वासून पडली आहेत. ती पुरी करायला, निघायच्या आदल्या दिवशी चक्क एक दिवस सुटी पण घेतली आहे ! पण परीक्षेच्या शेवटच्या पेपरचा अभ्यास करताना मधून मधून नंतरचे सुटीचे प्लॅन डोळ्यांसमोर नाचतात, अगदी तसंच थोड्या थोड्या वेळाने चार क्षण थबकून, काम दूर सारून, मन स्वप्नरंजनात हरवत आहे...
Receive करायला अर्चना-हेम येतील का आई बाबा पण असतील ? मग आधी आईच्या गळ्यात पडायचे की अर्चनाच्या ? अर्चना मागच्या वेळेसारखी कॉफी नाहीतर स्टारबक्सचा Tazo Chai Tea Latte आणेल का आई मधे कडमडून त्यात मोडता घालेल :) आई बाबा आहेत तसेच असतील का बारीक झाले असतील का लठ्ठ ? अर्चनाचं नवं घर कसं असेल ? त्याचं आई कडून ऐकलेलं वर्णन ऐकून मनासमोर एक चित्र आलंय.. तसंच असेल का वेगळं ? मागच्या अपार्ट्मंटच्या इकडे एक काळाभोर बोका होता. इकडे पण मांजरं असतील का ? ... Ok, Enuf !! Back to work.

मी तीन आठवडे इथे नाही आणि घरीही कोणी नाही, त्यामुळे बरीच कामे करायची आहेत. वीजबिल, टेलिफोन बिल, कॉर्पोरेशन टॅक्स, क्रेडिट कार्ड बिल, सोसायटी वर्गणी, पेपर बंद करणे, झाडं काणे काकांकडे पोचती करणं, फ्रीज रिकामा करणं, गाडी ऑफिसमधे सोडणं, अमेरिकेस न्यावयाच्या वस्तू विकत आणणं, डॉक्युमेंट्स आणि ’द्रव्य’ बरोबर घेणं, बॅगा भरणं ... हुश्श ...आई बाबांनी तर चक्क त्यांना आठवतील त्या सगळ्या कामांची दोन पानी यादी करून मेल केली आहे ! (त्यातला हा आयटम वाचा - "सिंगापूर एअरपोर्ट वर दुपारच्या जेवणासाठी उगाच तिथे काहीतरी अरबट चरबट अवाच्या सवा किमतीला विकत घेण्यापेक्षा सरळ चितळ्यांच्या पुरणपोळ्या पॅक करून घे." ओके. पण मी तिथे सब-वे खाणार आहे. प्रसंग पडल्यास माहीत असावे म्हणून फक्त पुरणपोळ्यांची किंमत पाहून ठेवली आहे. नंतर चौकशीत बिंग फुटायला नको !) चेक-लिस्ट वरच्या प्रत्येक टिक मार्क बरोबर रिलिफ वाटत आहे :)

मागच्या सगळ्या ट्रिप्स ना माझी बॅग भरणे हे काम आई बाबांकडे असायचं. अर्थात त्यात फारसं गैर काही नाही, त्यातलं आई बाबांनी सोसासोसानं अर्चनासाठी पाठवलेलं सामानंच अधिक असायचं !! स्वत:ची बॅग आता स्वत:च भरताना ब्रह्मांड आठवत आहे ! पण त्यायोगे आपण अगदीच यूसलेस नाही असा माफक आत्मविश्वास प्राप्त झाला आहे !

आंतरराष्ट्रीय विमानप्रवास आणि बॅग म्हणलं की मला माझा धडकी भरवणारा पहिला वहिला अनुभव आठवतो ! २००५ साली मी पहिल्यांदा एका कॉन्फरन्ससाठी मिनिआपोलिस येथे गेलो होतो. वेटिंगलिस्ट वरचे माझे तिकीट कन्फर्म न झाल्याने मुंबई-पॅरिस-मिनिआपोलिस इतका मूळचा सोपा असलेला प्रवास मुंबई-पॅरिस-न्यूयॉर्क-सिनसिनाटी-मिनिआपोलिस असा वाकडातिकडा झाला आणि मी आणि माझं लगेज दहा वेळा इकडेतिकडे चढ उतार (खरं तर सामान असेल तर ’फेकाफेक’ !) करून एकदाचं इष्ट स्थळी पोहोचलो. मिनिआपोलिसला रात्री पोहोचल्यावर लगेच निद्रेच्या अधीन झालो. दुस-या दिवशी सुटी होती आणि सायंकाळी काही परिचितांना भेटायचे होते. बाहेर पडायच्या आधी कपडे करायला म्हणून कपडे असलेली बॅग उघडली आणि मी डोक्याला हात लावून खाली बसकण मारली ! संपूर्ण बॅगभर एक पांढरी पावडर पसरली होती !! किंबहुना सगळंच सामान त्या पावडर मधे नाहून निघालं होतं. थोड्या वेळानं माझी ट्युब पेटली !! चटकन काही खायला म्हणून जे कोरड्या भेळेचं सामान घेतलं होतं, त्यातली चुरमु-यांची पिशवी फुटून त्यातल्या चुरमु-यांचं सांडून आणि चिरडून पीठ झालं होतं !! रात्रीचे दोन तास ती बॅग आणि त्यातल्या वस्तू साफ करण्यात गेले ! सुदैवानं कस्टम्सनं माझी बॅग उघडली नव्हती ! अन्यथा ’अमली पदार्थांचा घाऊक व्यापारी’ अशी माझी ओळख चटकन पटली असती :) तेव्हापासून कानाला खडा लावला - कुठलाही खाद्यपदार्थ तीन आवरणांमधे पॅक करायचा !Ok, back to packing !

अर्चनानं दोनच महिन्यांपूर्वी नवीन घर घेतलं आहे. आई बाबांकडून घराचं कौतुक ऐकलं आहे. आता प्रत्यक्षच पाहायचंय म्हणा. वास्तुशांतीनिमित्त तिला भेट काय द्यायची यावर बराच विचार केला पण काही सुचत नव्हतं. गृहोपयोगी वस्तूंखेरीज असं काहीतरी द्यायचं आहे जे मनाला जाऊन भिडेल... अचानक एक कल्पना आली. आम्ही लहान असताना - म्हणले मी चौथी पाचवीत आणि अर्चना सातवी आठवीत असेल - आम्ही एक अतिशय सुंदर पुस्तक वाचलं होतं - देनिसच्या गोष्टी. गोड गोष्टी आणि त्याहून गोड चित्रं. एका रशियन मध्यमवर्गीय घरातल्या या एकुलत्या एक मुलाचं भावविश्व अतिशय सहज सुंदर शब्दांत रंगविणारं, तुम्हाला तुमच्या निरागस आणि सोप्या,सुखी बालपणात अलगद नेणारं - आजोबांनी नातवाचा चिमुकला हात हातात घेऊन त्याला बागेत फिरायला न्यावं ना, तसं... अगदी प्रकाश नारायण संतांच्या ’शारदा संगीत’ सारखं. य पुस्तकानं तेव्हा आम्हा दोघांच्याही मनाला विलक्षण भुरळ घातली होती. त्यातलं एका पाळीव कुत्र्याचं ’चापका’ हे नाव तर अर्चनाला इतकं अपील झालं होतं की तिनं (आणि मीही अनुमोदन देऊन) ते चक्क बाबांना टोपणनाव म्हणून ठेवलं होतं ;) हे नाव बाबांनाही खरंतर आधी आवडलं होतं, पण त्यानंतर बाबांची एक छोटी शस्त्रक्रिया होऊन बाबा काही काळ घरी रजेवर होते, आणि ते पुस्तक बाबांच्या हाती पडलं :)
अलिकडेच ’अक्षरभारती’ या लहान मुलांसाठीच्या सेवाभावी प्रकल्पाचं काम करताना हे पुस्तक अचानक हातात आलं आणि एक भेटवस्तू पक्की झाली... पुस्तकी किडा असलेली अर्चू, हे आकर्षक बांधणीतलं ’मराठी’ पुस्तक हातात आलं की त्यावर कशी अधाशासारखी झडप घालेल आणि घराच्या एखाद्या कोप-यात, सारं जग विसरून, तर्जनीनं खालचा ओठ मुडपून, झरझर डोळे फिरवीत पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत त्याचा कसा फडशा पाडेल, हे परिचित चित्र डोळ्यापुढे येऊन हसू आलं !!

दुस-या भेटवस्तूचा प्रश्नही लवकरच सुटला. थोडा योगायोगाने. आई बाबा घरात नसल्याची ही दुर्मिळ संधी साधून, घरात उगाच जागा अडविणा-या, वर्षानुवर्षे ’कधितरी लागतात’ म्हणून (आणि ’आत्ता बाजारात विकत घ्यायला गेलं ही वस्तू तर हीss किंमत मोजावी लागेल’ या न्यायाने) सुखाने मुक्कामाला असणा-या काही अडगळ सदरातील वस्तू मी अतिशय तडफेने शोधून, गोळा करून नाहीशा करत होतो :) त्या शोधाशोधीत माझ्या हातात आला - अर्चनाचा ’चिमुकला संसार’... नखाएवढ्या आकाराची पातेली, ताटे, तवा, पोळपाट लाटणं, इवल्याश्या कपबशा ... अर्चना भातुकली खेळायची तेव्हा मीही आजूबाजूला लुडबुड करायचो. मुख्यत्वे माझा रोल अर्चनाने बनवलेले Virtual पदार्थ खाणे हा असायचा ! सुदैवाने ’मुलांनी कसली भातुकली खेळायची’ असं सांगणारे कोणी नव्हते !

’चिमुकल्या संसारात’ बोन-चायना चा सेट नसायचा, मॉड्युलर किचन नसायचं, मायक्रोवेव्ह नसायचा, २-३-४ B H K चे हिशेब नसायचे, दाराबाहेर कुठली गाडी आहे याचा विचार नसायचा. त्यात असायची मौज आणि निखळ आनंद. ख-या खु-या संसारात या घटकांना दूर ठेवता येत नाही. पण या व्यवहारी जगात राहताना चिमुकल्या संसारावर केवळ नजर टाकली तरी ते चार क्षण तरी तो वास्तवापासून दूर नेईल, हरवलेलं बालपण आणि त्याच्या रम्य स्मृती जवळ आणेल, शैशव जपायला मदत करेल असं वाटलं.

दोनही भेटवस्तूंची बॅगेत रवानगी झाली आणि चेक-लिस्ट वर अजून एक टिक-मार्क झाला !

विचारांची तंद्री तुटून अचानक आठवलं. निघायच्या आधी ताई आत्याला खुशालीचा फोन करायचा राहिला होता. मग गाडीत बसल्या बसल्या तिच्याशी फोनवर गप्पा झाल्या.

गाडी आता फूड मॉलपाशी पोचली आहे. काही खायची भूक आणि इच्छा, दोन्ही नाहीये. पावसाळा असल्याने आसमंत हिरवागार झाला आहे. आत्ता पाऊस मात्र पडत नाहीये. इथल्या नेसकॅफे च्या दुकानाशी प्रत्येक पुणे-मुंबई प्रवासाच्या आठवणी जुळलेल्या आहेत... नेस-टी ची लज्जत चाखून आता पुढे मार्गस्थ होतोय.