July 31, 2022

पेंग्विन्स, ब्लू व्हेल आणि किलर व्हेल्स

उत्तरेला खूप दूर एक बर्फाळ समुद्र होता. समुद्रात अनेक जलचर होते. महाकाय ब्लू व्हेल, कराल किलर व्हेल (ओर्कां), घातक शार्क्स, समुद्री कासवं, पेंग्विन्स, सील्स ... 
पेंगविन्सचा एक राजा होता. त्याचं एक मंत्रिमंडळ होतं. एक लहान राजपुत्र होता. आणि राजाचं मन रिझवायला एक विदूषक होता.
पेंग्विन राजपुत्र मित्रांबरोबर खेळायचा. बर्फ़ाचे गोळे, ग्लेशियर वर घसरगुंडी, पोहायला शिकणं असा त्यांचा दिनक्रम असे. एकदा काय झालं, पेंग्विन राजपुत्र धाडस करुन जरा खोल समुद्रात पोहायला गेला. तिथे त्याला दिसला महाकाय ब्लू व्हेल. पाण्याच्या पृष्ठभागावर येत त्यानं मस्तकातून पाण्याचा मोठा फवारा उडवला. ते पाहून राजपुत्र चकित झाला आणि थोडा खट्टू पण. घरी आल्यावर त्यानं वडिलांना सांगितलं, "बाबा, मी आज एक खूप मोठठा प्राणी पोहताना पाहिला. त्याच्या डोक्यातून कारंजं उडतं ! आपण तेवढे मोठे असतो तर किती मजा आली असती ना ! " 
राजा मनातून रागावला. पंख पसरून आणि अंगावरची पिसं फुलवून म्हणाला, "एवढा मोठा होता तो ? " 
राजपुत्र म्हणाला, "नाही बाबा. यापेक्षा खूप खूप मोठा !". 
राजाने राजपुत्राला समजावलं, "दुःखी होऊ नको बाळा! मी तुला ब्लू व्हेल पेक्षा मोठा होऊन दाखवीन ". 
पेंग्विन राजाने लहानपणीच फुगून फुटणाऱ्या बेडकीची गोष्ट ऐकली होती. त्यामुळे त्याने तो उद्योग काही केला नाही. 
मग त्याने मंत्र्यांची बैठक बोलावून त्यांना विचारलं, "आपण ब्लू व्हेल पेक्षा मोठे कसे होऊ शकतो "? 
मंत्री गहन विचारात पडले. कोणाकडेच उत्तर नव्हतं! 
एकदम विदूषक पुढे झाला आणि म्हणाला, "त्यात काय! सोप्पंय! इथे जो ओर्कां म्हणजे किलर व्हेलचा मोठा थवा आहे ना, आपण सगळे त्यांना चिकटून एकत्र पोहू. त्यांची पाठ आपल्या सारखी काळी कुळकुळीत आणि पोट अगदी आपल्या सारखं पांढरं आहे ! कुणाला कळणार पण नाही!". 
राजेसाहेब खूष झाले आणि गळ्यातली केल ची माळ काढून त्यांनी विदुषकाच्या गळ्यात घातली. 
"शाबास! आजपासून तू माझा मुख्य सल्लागार! आजच किलर व्हेल च्या राजाशी संपर्क करा !", त्यांनी आज्ञा दिली. 
एक ज्येष्ठ मंत्री धाडस करून म्हणाले, "महाराज, ही कल्पना चांगली नाही. किलर व्हेल आपले शत्रू आहेत. आपण त्यांचं खाद्य आहोत." 
"खामोश !" राजेसाहेब गरजले. "आपला शत्रू किलर व्हेल नाही. ब्लू व्हेल सर्वांत मोठा आहे म्हणून तो आपला शत्रू आहे ". 
दुसरे मंत्री म्हणाले, "पण महाराज, ब्लू व्हेल आपल्याला कधीच खात नाहीत. ते फक्त क्रिल्स खातात." 
"खामोश !" राजेसाहेब पुन्हा गरजले. "मी राजपुत्राला वचन दिलं आहे. मी माझं वचन मोडणार नाही." 
काही मंत्री सहमत होईनात. 
राजेसाहेब पुन्हा गरजले, "तुम्ही संपूर्ण पेंग्विन प्रजातीशी हरामखोरी करताय. हा समुद्राचा द्रोह आहे. पटत नसेल तर चालते किंवा पोहते व्हा." 
पुढे काय झालं? किलर व्हेलनी पेंग्विन्सला खाल्लं, का पेंग्विन्स आणि किलर व्हेल्सनी मिळून ब्लू व्हेलचा पिच्छा पुरवला, का पेंग्विन्सनी नवीन राजा निवडला? 

प्रत्यक्षात असं झालं, की कथा लेखकाला 'रायटर्स ब्लॉक' आला. कथा पुढे कशी न्यावी हेच समजेना. मग त्यानी ठरवलं, आपण क्राउड सोर्सिंग करूया. 
त्यानं वाचकांना सांगितलं, तुम्हाला कथेचा शेवट कसा पटतोय ते मला सांगा. 
कसं सांगाल? 
मत पेटीतून सांगा! 
बहुमताला आवडेल असाच मी कथेचा शेवट करीन! 
तर आपलं मत देणार ना?

August 28, 2020

पामराचा पॉलिटिकली करेक्ट गणेशोत्सव

आपल्या चातुर्यासाठी आणि शहाणपणासाठी श्री चतुरक जगप्रसिद्ध आहेत हे आपणास ठाऊक आहेच. 

भाद्रपद शुद्ध कुठल्याश्या तिथीला दुपारी श्री चतुरक विश्रांती आणि ध्यानधारणा करत असताना अचानक फोन वाजला. फोनवर पामर बोलत होता.

"बोल पामरा". 

पामर उवाच : बा चतुरका ! तू सणवार करत नाहीस हे ठाऊक आहे, तरी पण गणपती उत्सवाच्या शुभेच्छा! या वर्षी मी गणपतीसाठी पुस्तकांची सजावट करणार आहे. तुझा व्यासंग दांडगा, म्हणून 'कुठली कुठली पुस्तके घेऊ?' असं तुझं मार्गदर्शन घ्यायला फोन केलाय. 

चतुरक: अरे, तू प्रवीण तरडे यांची बातमी वाचलीस का?

पामर: नाही. काय आहे बातमी ?

चतुरक:  त्यांनी पण गणपतीसाठी पुस्तकांची सजावट केली होती. त्यांनी काय केले, की गणपतीची मूर्ती ज्या पाटावर वा चौरंगावर ठेवली होती त्याच्या चहू बाजूंनी पुस्तके ठेवली होती. त्या पाटाच्या खाली त्यांनी भारतीय संविधानाची प्रत ठेवली होती. पण त्यामुळे संविधानाचा, डॉ. आंबेडकरांचा, घटना समितीचा, भारताचा, भीम चळवळीचा, इ. अनेक गोष्टींचा अपमान झाला. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. मग त्यांनी माफी मागितली. इत्यादी.

पामर: अरे बापरे. करायला गेले एक आणि झाले भलतेच ! 
अरे पण मी पूर्वी एक कथा वाचली होती. न्या. म. गो. रानडे यांच्याकडे एक ख्रिश्चन गृहस्थ काही कामानिमित्त आले असताना त्यांना दिसले की काही पुस्तके रचून ठेवली होती आणि त्यात बायबल सर्वात वर होते आणि भगवदगीता सर्वात खाली होती. त्यांना यावरून चिडविल्यावर रानड्यांनी असे सुचवले होते की गीता सगळ्याचा पाया आहे, म्हणून ती सर्वात तळास ठेवली आहे, अशी काही तरी ... 

चतुरक: होय. पण ती खूप जुनी गोष्ट आहे. आता काळ बदललाय.  आजकाल सगळ्यांना नाही, पण काही लोकांना चहू बाजूंनी विचार करूनच बोलायला लागतं. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असं संत तुकाराम महाराजांचं वचन आहे. शिवाय रामदास स्वामींनी "अखंड सावधान" राहायला सांगितले आहे. 

पामर: बरं झालं तू ही बातमी सांगितलीस. मी असं करतो, संविधान गणपतीच्या वर एका फळीवर ठेवतो. 

चतुरक: छे छे! भलतेच! कुठल्याही मूर्तीच्या वर काही ठेवायचे नसते. तसं शास्त्र आहे. 
शिवाय मग तो गणपतीचा अपमान होऊ शकेल. गणपती ही हिंदू देवता असल्याने तो हिंदू धर्माचा, कडव्या हिंदुत्वाचा, झाल्यास तर गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांचा किंवा भाऊ रंगारी यांचा (हा स्वतंत्र वाद आहे!), स्वराज्याचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, वाघनखांचा इ.अपमान होऊ शकेल. पूर्ण इम्पॅक्ट अनॅलिसिस करावा लागेल.

पामर: गुड पॉईंट. मी संविधान सरळ गणपतीच्या बाजूला ठेवतो.

चतुरक: इतकं सोपं नाहीये ते. संविधान बाजूला ठेवलं तर त्यास मधोमध नसून बाजूस ठेवल्याचा, म्हणजे कमी महत्व दिल्याचा मुद्दा येतो. शिवाय तुला डावा हात 'धुता' आणि उजवा हात 'खाता' हे कदाचित ठाऊक असेल.

पामर: हो. पँडेमिक मध्ये टॉयलेट रोल संपले तेव्हा आठवलं. 

चतुरक: तर गणपती किंवा संविधान डावीकडे किंवा उजवीकडे ठेवले तर त्यातल्या एकाचा अपमान होऊ शकतो.

पामर: अरे, मग काय माझ्या डोक्यावर ठेऊ का काय संविधान !

चतुरक: लेट मी थिंक. नाही. नाही. नाही. त्यात पण धोका आहे. हे बघ. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मणाला समाजाच्या डोक्याची उपमा दिली आहे. त्यामुळे असा वाद होऊ शकतो की संविधान डोक्यावर ठेऊन तू अप्रत्यक्षपणे ब्राह्मणवाद, ब्राह्मण्य, मनुवाद, वर्णवर्चस्ववाद यांचा पुरस्कार करतो आहेस.

पामर: माय गॉड ! काय जबरदस्त प्रभुत्व आहे तुझं मराठी वर! आणि मराठी मध्ये हे सगळे शब्द आहेत, हे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं फक्त इंग्लिश मध्ये misogynistic, chauvinistic, racist, xenophobic, sexist, homophobic असे विपुल शब्द आहेत, जे वापरून एकमेकांना नामोहरम करता येतं !

चतुरक: थिंक ग्लोबल. 

पामर: ते करतो नंतर, पण हे सगळं ऐकून मला काय आठवलं सांगू ? ती वडील, मुलगा आणि गाढव यांची गोष्ट - ऐकावे जनाचे, करावे मनाचे!

चतुरक: ती गोष्ट लिहिली गेली तो काळ वेगळा होता. ती आता विसर. आणि माझ्याशी बोललास ते ठीक. इतर कुणास सांगू नकोस. नाहीतर तू गणपती किंवा संविधान यांची गाढवाशी तुलना करतोयस असा अर्थ झाला, तर अनर्थ होईल ना?
लोकशाहीचा मंत्र आहे, ऐकावे जनाचे, करावे बहुमताचे.

पामर: मी यावर नवीन गोष्ट लिहून या तत्वाचा प्रसार करीन. पण मग आता मूळ प्रश्नाचं काय ? असं करतो, संविधान ठेवतच नाही सजावटीमध्ये ! ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी!

चतुरक: हः ! इतकं सोपं वाटलं ? अरे, तू इतर अनेक पुस्तकं ठेवलीस, पण संविधान वगळलस, तर तू संविधानाचा अनुल्लेखाने मारून अपमान करतोयस असे नाही का होणार ?

पामर:  (हताश !) मग असं करतो, गणपतीच राहूदे, नुसतेच संविधान ठेवतो! गणपतीला होपफुली राग येणार नाही.

चतुरक: अरे पामरा, तुला समजत कसे नाही? इतकं सोपं नाहीये, सांगितलं ना? थिंक थ्रू . गणेश उत्सवात तू संविधान ठेवलंस पाटावर, तर त्याचा अर्थ असा होतो की तू धर्मनिरपेक्ष संविधानाला भगवा रंग देतोयस! हा धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सहिष्णुता यांचा द्रोह होईल. 
 
पामर: ( अतिशय शांत, तटस्थ, स्थितप्रज्ञ, विरक्त, निर्वाण अवस्थेत ) समजलं. मी या वर्षी गणपतीच बसवत नाही. त्या ऐवजी मनोमन नामसाधना करतो. 
 
चतुरक: वा! 
आता तू पामर राहिला नाहीस. 
तू या विलक्षण वैचारिक आणि भावनिक घुसळणी मधून परिपक्व, ज्ञानी झालास. 
हे करताना तू लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालास. 
लौकिक जगात तू धर्माचा त्याग करून धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद, इत्यादीची पताका खांद्यावर घेतलीस तर पारलौकिक जगात तू सगुणाचा त्याग करून निर्गुणाचा संग केलास. स्थूलातून सूक्ष्माकडे गेलास.
धन्य झालास, पामरा!    

July 29, 2016

क्वालिटी टाइम

चार वेळेला स्नूज केलेला अलार्म पाचव्यांदा वाजल्यावर चिमण नाइलाजाने डोळे उघडतो. पिल्लाच्या पलीकडे झोपलेल्या चिमणीला तो हातानं ढोसून उठवतो. 
चिमणी दचकून उठते. 
"काय झालं ?" 
"अग किती वाजले बघ की!" चिमण करवादतो.
"ओह् चल उठू या"
"शू .. हळू .. पिल्लू उठेल. तू चहा टाक आणि मला हाक मार. मी तोवर लोळतो."
"नाही रे. मी एकटी नाही जाणार. तू पण चल"
"प्लीज ... 5 च मिनिटं ...प्लीज" चिमण गयावया करतो.
चिमणी फणकारुन एकटीच किचन मधे जाते.

चिमण शेजारी झोपलेल्या पिल्लाला अलगद जवळ ओढून कुशीत घेतो. त्याच्या मुलायम केसांवर हलकेच ओठ टेकवतो. 
घड्याळाचा काटा पुढे जाऊच नये असं त्याला वाटतं.
पिल्लाची झोप चाळवते. ते अर्धवट उठून, रागावून, झोपेतच तरातरा रांगत, गादीच्या दुस-या टोकाला जाऊन, इवलंसं कुल्लं उंच करून परत झोपतं.
चिमणला अपराधी वाटतं.

बराच वेळ चिमणीची चाहूल लागत नाही, तेव्हा चिमण नाईलाजानं उठतो.
पंख्याच्या वा-यानं अंग जड झालेलं असतं. सत्तर वर्षांच्या वृद्धासारखं हळू हळू चालत तो बेसिनपर्यंत पोचतो. आरशात त्याला एक केस पिंजारलेलं, दाढी वाढलेलं, डोळे तांबारलेलं भूत दिसतं. रोजसारखंच !

किचनकडे जाताना वाटेत त्याला 'फुस्' 'फुस्' असा आवाज येतो. गेस्ट बेडरूम मधे चिमणी प्राणायाम करत असते.
"अग हे काय चाललंय? चहा?"
"फुस् फुस् - ओट्यावर ठेवलाय - फुस् फुस्"
"तू पण चल ना"
"फुस् फुस् - 10 मिनिटं - फुस् फुस्"
"च्च"
"फुस् फुस् - तू ही व्यायाम कर - इच्छा असेल तर -  फुस् फुस्"
चिमणचं डोकं थोडं सटकतं, पण उघडपणे चिडायला काहीच कारण नसतं. चडफडत तो ओट्यावरून चहाचा कप उचलतो, आणि सोफ्यावर फतकल मारतो.
एका हातात चहाचा कप सांभाळत दुस-या हातानं तो मॅक बुक उघडतो आणि ते करताना त्याच्या मांडीला एकदम चिमटा बसतो.
"च्या *** त्या स्टीव जॉब्सच्या.... " चिमण मृतात्म्याला पण सोडत नाही!

मेल बॉक्स मधे 133 अन् रेड मेल्स असतात. आता त्याचं डोकं पूर्ण फिरतं.
"*****, रात्री झोपताना मेलबॉक्स क्लीन केलेली, सकाळी 133 मेल्स ? रात्रभर साले काय **** का काय ?"
मग पुढली काही मिनिटं मुरारबाजीच्या आवेशात तो मेल्स डिलीट करतो. 

पिल्लाच्या रडण्यामुळे त्याला एकदम ब्रेक लागतो.
लॅपटॉप बाजूला आदळून तो बेडरुमकडे धावतो. पायात मुंग्या आल्यामुळे त्याला जोरात पळता येत नाही! 
चिमणीनं पिल्लाला आधीच पंखाखाली घेतलेलं असतं.
"आता उठवतीये मी त्याला."
चिमण नाराजीनं मान हलवतो. पिल्लाच्या रडण्यात पर्यवसान होऊ शकेल अशा कुठल्याही गोष्टीनं चिमणच्या पोटात गोळा येतो.
"तू ज्जा इथून" पिल्लू डोळे उघडल्या उघडल्या संतप्त फर्मान सोडतं.
"का रे मऊ ?" चिमण आर्जव करून पाहतो.
"तू ज्जा ..."
चिमणी "तुझं चालू देत, मी बघते त्याच्याकडे आता" अशा आशयाची खूण करते.
पण सगळीकडे मधे मधे डुचकून घोळ घालायची सवय असल्याने चिमणचा पाय निघत नाही.
जरा शांतता प्रस्थापित झाल्यावर पिल्लू विचारतं - 
"बा-शीप, बा-शीप ... तू आज ऑफिश ला जानालेश ?"

'बा-शीप' :) पिल्लानं चिमणला ठेवलेलं नाव. पिल्लू छोटं असताना चिमणला 'बाबा' म्हणायला शिकत होतं, नेमकं तेव्हाच त्यानं 'बा बा ब्लॅक शीप' चं गाणं पाहिलं, आणि तेव्हापासून त्यानी चिमणला आधी 'बाबा शीप' आणि मग 'बा-शीप' म्हणायला सुरुवात केली !
चिमणला ही  'बा शिप', हजार स्कॉलरशिप्सपेक्षा मोलाची वाटते. मग त्याने पण पिल्लाला कधी 'बाबा' म्हणायला सुचवलं नाही.
पिल्लाच्या मूडनुसार बाशीपची 'बाशा', 'बाश्या',  'बाशूप', 'बाशू' अशी सुद्धा रूपं होतात!

ऑफिसचा विषय निघाल्यावर चिमणच्या पोटातला गोळा मोठा होतो. 
चिमणचे उत्तर चटकन् येत नाही, तसा पिल्लाचा चेहरा कावराबावरा होतो. 
चिमण वेळ मारून न्यायचा प्रयत्न करतो  - "अम् नाही. म्हणजे मला साहेबांनी फोन केला ना, तरच जाणारे, नाहीतर ना ही !".
"न्नाई जायचं". पिल्लू निर्णय देतं.
"बर बर. नको जायला. आता पट्कन् दातू घाशुन टाकु, चला !"
"दात नाइ धाशायचे. नुस्तं खुलखुल कलायचं"
"'धा'सायचे नाही रे, 'घा'सायचे, घ घ"
"'गा'त 'घा'शायचे"
"'दा'त घासायचे"
"'दा'त 'धा'सायचे"
चिमण गिव अप् करतो.

"आधी माझी टल्न. पन माझ्या टल्न ला पेश्त नाइ लावायची".
पिल्लू निवांतपणे दातावर ब्रश फिरवत बसतं.
चिमणचा एक डोळा घड्याळावर असतो. त्याचे ठोके वाढायला लागतात !

मग चिमणीबरोबर आयपॅड लाऊन पिल्लाचा दूध पिण्याचा कार्यक्रम पार पडतो. चिमणला स्टीव जॉब्सचा उद्धार केल्याबद्दल पश्चात्ताप होतो.

"आज अंगा मी शिलेक् कलनाल".
"चालेल"
पिल्लू  बझ् लाइट्-इअर चा शर्ट आणि स्पायडर्मॅनची पँट सिलेक्ट करतं.
"मनी, आपण स्पायडर्मॅनचा शर्ट आणि स्पायडर्मॅनचीच पँट घालायची का ?" चिमणी प्रयत्न करते.
"नको आई, हेच असू दे. हे छान दिसतंय". चिमणीचे पडलेले तोंड बघून पिल्लू तिची समजूत काढतं !

"बा-शीप, मला आज्जी कले न्नाई जायचंय."
"का रे बाळा, आजी वाट बघतिये. तिचा फोन आला होता, पिल्लू कुठे आहे म्हणून"
"पन मग तू आज्जी कलून ऑफिश मधे न्न्नाई जायच"
"बर, नाई जात"
"तू खोतं सांगतोस. तू प्लॉमिस कलतोस की, तू प्लॉमिस करतोस की तू , तू प्लॉमिस करतोस की तू  ऑफिश मधे, आज जानाल नाइ आनि, आनि मग जातोस"
वयाला न झेपणारं लांबलचक वाक्य, पिल्लू शर्थीचे प्रयत्न करून, पोटतिडकीनं बोलतं.

"वा, पोरानं चांगली लायकी केली आपली !" चिमणचे डोळे पाणावतात.

गाडीत फक्त पिल्लाच्याच आवडीची गाणी वाजतात. आजचा दिवस "लुंगी डान्स" चा असतो.
"मुचो को तोला लाउंद गुमाके , अन्ना के जैसा चच्मा लगाके ....."
लुंगी डान्स" चा ट्रॅक दोन-तीनदा वाजतो.

पिल्लाला मधेच शहाणपण सुचतं  - "बाशीप आपन हे गानं ओल्देली ऐकलंय ना, मग तू फुन्ना फुन्ना का लावतोयस?"
चिमण कपाळाला हात लावतो.

गाडीतून उतरून आज्जीच्या दाराशी जाईपर्यंत रडारडी सुरू होते. घट्ट् बिलगू पाहणा-या पिल्लाला दूर करून, स्वत:च्या आईच्या हातात देताना चिमणच्या हृदयाची कालवाकालव होते.
पालकांना नोकरी का करायला लागते? त्याचं मन कुढतं. घर-कर्जाची आठवण आल्यावर डोकं पुन्हा ताळ्यावर येतं.
मग खचलेल्या मनाला उभारी आणायला तो वाटेत थांबून एक गरम गरम कॉफी घेतो.

ऑफिसमधे मिटिंग मागून मिटिंग मागून मिटिंग चालतात. किचकट समस्या आणि त्यांची उत्तरे एका पानावरून दुस-या पानावर सरकतात.
मतलबी मांजरे, भुंकणारे श्वान, लबाड कोल्हे, डरकाळ्या फोडणारे वाघ सिंह, चिरडणारे हत्ती, आंधळी मेंढरे, गरीब गाई  - सगळ्यांशी दिवसभर मुकाबला करता करता तन आणि मन थकून जातं.

संध्याकाळ होते. 
मुंगीच्या पावलांनी सरकणा-या ट्रॅफिकबरोबर चिमण त्याच्या आईच्या घरी पोहोचतो.
आज्जीच्या घरी किलकिलाट चालू असतो.

चिमणला पाहताच पिल्लू रुसून आज्जीला बिलगतं. "बा शीप. तू ज्जा. मला घली नै जायचय"
आज्जी म्हणते - "अरे त्याला मगाचपासून झोपाळा खेळायचाय. त्यानं खाल्लं होतं म्हणून जरा थांबलोय".
"झुले बाई झुला माझा झुले बाई झुला" म्हणत पिल्लू झोपाळा खेळतं.
आज्जीनं तिच्या मोठ्या पिल्लासाठी चहा करून ठेवलेला असतो.

चिमणी पिल्लाला भेटायला आतुर झालेली असते. ती चिमणला फोन करून "निघालास का रे?" म्हणून विचारते.

पिल्लाला अज्जिबात घरी जायचं नसतं.
मग चिमण त्याची थट्टा करतो - "काय रे, सकाळी 'आज्जी कले नाई जायचं' असं कोण म्हणत होतं रे?"
खोडसाळपणे हसत पिल्लू सांगतं  - "बाशीप म्हणत होता !!" 

मग चिमण त्याला "स्टिअरिंग् वील" खेळायचं आमीष दाखवून, उचलून निघतो. चिमणीचा अजून एकदा फोन येतो.

घरी स्वयंपाक तयार असतो. चिमणला आता सिरियल्सचे वेध लागलेले असतात.
जेवता जेवता पिल्लाचं आयपॅडवर ऑक्टॉनॉट, पेप्पा पिग, पिंगू, अन् स्पायडरमॅनचं पारायण सुरू असतं.   
चिमणा चिमणी फालतू दर्जाच्या, अतर्क्य अशा सिरियल्स चवीचवीने, टीका टिप्पण्ण्या करत बघत असतात.

रात्रीच्या कार्यक्रमाची सूत्रे चिमणी हातात घेते.
"पिल्लू, आता काय करायचं?" चिमणी कमांडिंग टोन मधे विचारते.
"आता, झोपायचं, .........  नाही!" पिल्लाचा मिष्किल पणा सुरू होतो.
"ना  ही  ? थांब आता बघतेच तुझ्याकडे !" मग चिमणी आणि पिलाची घरभर पकडापकडी, आरडा ओरडा, आणि दंगामस्ती चालते.
चिमण तेवढ्यात मेल्स चेक करतो.

बेडरूमचा दिवा मालवल्यावर पिल्लाची निषेधार्थ रडारडी होते. मग गोष्टीची मागणी होते.
इवली इवली बोटे उघडून पिल्लू मोजून दाखवतं - "वन, टू, थ्री, फोर, फ़ाईव्" एवल्या गोष्टी सांगायच्या.
"नाही, फक्त दोन". चिमण धैर्य गोळा करून सांगतो.

"बर. म मला वाधोबा, सिंह, ने ने हॉर्स, कांगारू, बाशीप, ससुल्या, आणि शार्क अशी गोश्त सांग. आणि व्हेल. आणि ऑक्टोपस. फक्त एवलेच". 
"बर. सांगतो".
चिमण मग झू मधल्या पिकनिक ची गोष्ट सांगतो. 
त्यात एक चांगला राक्षस हवा अशी रन-टाईम डिमांड येते.
चिमणच्या गोष्टी सहन करण्याची ताकत आता चिमणीमधे राहिलेली नसते. ती हताशपणे उसासा सोडते.
पिल्लाला एकदम टवटवी येते.
"आई, तू असा ...(प्रात्यक्षिक दाखवून) ... आवाज का केलास?"

पिल्लू झोपेच्या राज्यात रमतं.

चिमण फोन उचलून एकदा मेल्स चेक करतो.
मग "हाउ टु स्पेण्ड क्वालिटी टाईम विथ युअर टॉड्लर" असा सर्च करून वाचत बसतो.

पिल्लू एकदम रडत उठतं.
"मनी, काय झालं ? घाबरू नकोस. आम्ही आहोत ना" चिमणा चिमणी पिल्लाला समजवतात.
"सिद्धपू मला मारायला आलाय" - पिल्लानं हिरण्यकश्यपूला "सिद्धपू" असं सुटसुटीत नाव ठेवलेलं असतं!
"घाबरू नकोस. मी सिद्धपूला बडवून काढेन". सिद्धपू मेलेला असल्यामुळे चिमण बेशकपणे ठोकून देतो.
मग शशिंग आणि "ये ग गाई गोठ्यात" असे आपापले ट्रॅक्स मिक्स करून चिमण आणि चिमणी पिल्लाला दामटतात.

रात्र चढते.
काटे पुढे सरकतात.
चिमण आणि चिमणीच्या समांतर रेषांवर लंब टाकून, आईच्या पोटावर डोकं, आणि बा-शीपच्या शब्दश: पोटावर पाय आणून पिल्लू स्वप्नांच्या दुनियेत बागडत असतं.

हा त्या तिघांचा बेस्ट क्वालिटी टाईम असतो.