October 1, 2004

स्मृति : मी आणि माझं घर


काही महिन्यांपूर्वी आमच्या घरासमोरील वाडा पाडला. छोटा वाडा होता; दुमजली, अंगण असलेला. पुढील बाजूला दुकानं, मागील बाजूस एक बि-हाड. एके दिवशी त्यांचं सामान हललं, तेव्हा लक्षात आलं की आता समोर ओनरशिप होणार...वाडा पाडल्यावर तेथे राहायला एक वॉचमन, आणि त्याचं कुटुंब आलं. पाया खणला आणि काहीतरी कारणाने बांधकाम थोडं थांबलं. एव्हाना वॉचमनच्या बायकोनं त्यांचा संसार तिथेच थाटला होता. एक विटांची चूल, चार भांडी, आणि थोडे कपडे. मग कधी खिडकीशी गेलं की नजर हटकून त्यांच्याकडे जायची.

"घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती" हे जरी खरं, तरी घराला भिंती तर हव्यात ! इथे ना भिंती होत्या ना छत... आणि मग या वर्षीचा पहिला पाउस बरसला. 'सकाळ' मधे आलं होतं, तसा बरसतच राहिला. त्या दिवशी त्या समोरच्या 'घरात' चूल पेटली नाही... नकळत स्वत:च्या डोक्यावरील छपराचं महत्व कळलं. पावसाच्या धारांमधे पाहताना मला माझं जुनं घर आठवलं...

कागदोपत्री ते "६८० नवा सदाशिव, मराठे वाडा" होतं. सदाशिव पेठ पोस्टाच्या शेजारी. समोर विंचूरकर वाडा होता. त्या शेजारी मदर डेअरी. वाड्यामधे आम्ही पहिल्या मजल्यावर रस्त्यावरच्या दोन खोल्यांत रहायचो. दोनच खोल्या असल्यामुळे एक खोली हॉल कम बेडरूम आणि दुसरी स्वयंपाक घर ! हॉलला जोडून बाल्कनी. स्वयंपाक घराला लाकडी पटईचे छत होते आणि हॉलला सिमेंट पत्र्याचे. हॉल मधे सीलिंगला झोपाळा टांगलेला असायचा. हॊलच्याच एका कोप-यात एका कोनाड्यात देवघर. जमीन शहाबादी फरशीची होती. त्यात मोठ्या मोठ्या दरजा होत्या. संकष्टीला मी आणि अर्चू आरती संपली की त्यात दुर्वा लावायचो !

त्या घरात मी जन्मापासून ते चौथी पर्यंत राहिलो. तो काळ मोठा सुखाचा होता. अभ्यास असा फारसा कधीच नसायचा. परीक्षा-पाण्याचे दडपण नसायचे. करिअर नावाची तर गोष्टही माहीत नव्हती ! मला आजोबांनी पक्के सांगितले होते की बाबा ऑफीस मधे फक्त आमटी भात खायला जातो ! वाचायला भरपूर पुस्तके, आणि भांडायला अर्चना ! वेळ कसा जायचा ते कळायचे देखील नाही.

घराच्या मागे आंगण होते. ते पार केले की आजोबांचे घर. मधे पत्रे घालून बंद केलेली विहीर. वाडा असल्यामुळे उंदीर, घुशी आणि मांजरे खूप होती. माझ्या जन्माची एक आख्यायिका मला आई नेहमी सांगायची. म्हणे माझ्या जन्माच्या थोडे दिवस आधी पर्यन्त एक शेपूट-तुटका बोका आमच्याकडे यायचा. कितीही हाकलले तरी पुन्हा यायचा. रात्री तो कोणाच्या तरी अंथरुणात येउन हळूच झोपायचा. आणि म्हणे तो यायचा बंद झाला आणि माझा जन्म झाला ! शक्य आहे. कदाचित म्हणूनच मला मांजरांचे एवढे प्रेम आहे !

आमच्याकडे तेव्हा तीन वाहने होती. एक बाबांची सेकंड हॅंड सायकल, माझी छोटी तिचाकी सायकल आणि एक लाकडी घोडा. माझ्या दोन्ही वाहनांचे रनिंग माझ्या इंडिकाच्या सद्ध्याच्या रनिंग पेक्षा जास्त होते !! मी सायकल चालवायला लागलो की खालच्या घरात माती पडायची, आणि त्या काकू ओरडायच्या !

पावसाळ्यात खूप मजा यायची. खिडकीमधे तासनतास उभा राहून मी पावसाची गम्मत पहायचो. समोर सांगली बॅंकेच्या ओट्यावरून वाहणारे माश्यांसारखे दिसायचे. विजेच्या तारांवरून हळूच ओघळत जाणारे, आणि मग एक मोठ्ठा थेंब बनून पडणारे पावसाचे थेंब बघणे हा माझा एक छंदच होता जणु ! हॊलचे छप्पर पावसाळ्यात जाम गळायचे. मग आम्ही पाच सहा ठिकाणी बादल्या ठेऊन ते पाणी त्यात गोळा करायचो. एका वर्षी बाबांनी छपरावर जाऊन जाड प्लास्टीक डांबराने चिकटविले. पण पुढल्या पावसात ते उडून गेले ! त्या वयात, आपल्या घरात डायरेक्ट पाऊस येतो, याची मजा वाटत असे ! आई बाबांच्या डोक्यावरचे ताण, उत्पन्न आणि जागांचे वाढते भाव, हे सारं समजण्याचे ते वय नव्हतं ...

दर वर्षी आमच्या घरा समोरून पालखी जायची. पालखीच्या आधी येणारा हत्ती, मग झेंडा नाचविणारी आणि टिप-या खेळणारी प्रबोधिनीची पथके आणि ग्यानबा-तुकाराम चा भक्तिपूर्ण जयघोष ! आमचे खूप नातेवाईक पालखी पहायला आमच्या कडे यायचे. तसेच गणपती ! रात्रभर आमच्या रस्त्यावरून आणि लक्ष्मी रोड वरून मिरवणूक जायची. रात्री एक वाजता गजर करून आम्ही उठायचो आणि मग उठून, चहा पिऊन फिरायला जायचो. दगडूशेठचा रथ बघणं हे मुख्य आकर्षण. ते अजूनही तसेच आहे. परवाच अक्षय आणि सन्दीप बरोबर मिरवणूक पहायला गेलो होतो; दगडूशेठची लखलखत्या रथात विराजमान झालेली ती लोभस देखणी मूर्ती पाहून अजूनही "गणपती बाप्पा मोरया" तोंडातून बाहेर पडतं ! काही भावनांना वयाचं बंधन नसतं...

घराची बाल्कनीशी माझ्या काही विनोदी आठवणी निगडीत आहेत. मी म्हणे अगदी लहान असताना, म्हणजे रांगण्याच्या वयात असताना त्या बाल्कनीला कठडे बसविण्याचे काम चालले होते. आणि मी रांगत जाऊन ते कठडे ढकलून मजल्यावरून खाली पाडले होते ! सुदैवाने कोणी खालून चालले नव्हते; अन्यथा तेव्हाच 'सदोष मनुष्यवध' व्ह्यायचा ! ही आमची लीला मातोश्रींनी "अवलक्षणी कार्टा ग ऽऽ लहानपणापासून !" च्या चालीवर मला अनेक वेळा ऐकवली आहे ! दुसरी आठवण आठवून आता हसू येते, तेव्हा रडू आले होते ! त्याचे असे झाले : एकदा मला केस कापायला घेऊन जायला बाबांना जरा एक आठवडा उशिर झाला. मग एका दुपारी मला स्वावलम्बनाची फार हुक्की आली आणि आईची शिवण यन्त्राची कात्री आणि कंगवा घेऊन मी स्वत:च प्रयोग करून पाहिला. हे सांगायला नकोच, की तो दारूण फसला !! पण त्या नादात मी केस फारच कापले, आणि घरी आल्या आल्या तीर्थरूपांनी पाहिले. मग आई आणि बाबांनी मिळून माझी प्राथमिक चौकशी सुरू केली, आणि लवकरच तिला उलट-तपासणी आणि "थर्ड डिग्री" असे स्वरूप प्राप्त झाले. काही नमुनेदार प्रश्न आणि उत्तरे :
( बा म्हणजे बाबा, आ म्हणजे आई, मी म्हणजे मी
* म्हणजे थोबाडीत / चपराक / फटका / चिमटा इत्यादी ! )

बा : केसांचे काय झाले ?
मी : काय झाले ?
बा : * मी सांगू का काय झाले ?
आ : अरे, दुपारी मी झोपले तेव्हा स्टोव्ह च्या जवळ गेलास का ? धग लागून होउ शकते असे. ( बाळ गुणाचा आहे ! )
मी : गेलो असीन. पण आठवत नाही.
बा : कसे आठवेल ? मी सांगतो ना त्याने केस कापले आहेत ते.
कुठली कात्री घेतलीस ? का ब्लेड वापरलेस ?
मी : * क * क कात्री.
बा : आणि केस कुठे आहेत ?
मी : ( मनात : ते काय करायचेत आता ? ) ते ब ब बाल्कनीतल्या रॊकेलच्या ड डब्यात पडले...
बा : पडले ? आपोआप पडले काय ? ***
मी : म म म्हणजे त ट टाकले...
*** *** *** !!!
त्यानंतर सलून मधे नेऊन थोडी सफाई झाली, पण माझी लीला पण तितकीच श्रेष्ठ होती !
नंतर कितीतरी दिवस लोक आई-बाबांना विचारायचे : याची घरगुती मुंज केली का ?
आजही माझे केस कधी जास्त वाढले की आई उद्धार करते : तेव्हा अगदी हौसेने केस कापले हो, आणि आता वाढवतोय !

आमचा वाडा जुना होता, पडका होता, अनेक गैरसोयी होत्या, पण तो आमचा वाडा होता.
प्रत्येक गोष्टीची होते, तशी कधीतरी त्या घराशी पण आमची ताटातूट होणार होती. मी चौथीमधे गेलो तेव्हा आई बाबांनी एक छोटे नवीन घर घेतले. जुन्या घराशी संबंध कमी झाला. कधी तरी वाटायचे की येथे पण ओनरशिप होईल. नवीन वास्तू बांधली जाईल. पण आपल्या इच्छेने फार थोड्या गोष्टी होतात. वाड्याच्या बाकी मालकांनी वाडा एक बिल्डरला विकायचा निर्णय घेतला. वाड्यावर कुदळ पडली, आणि आमचा त्या जागेशी असलेला ॠणानुबंध संपला. तेथे मागाहून एक बिल्डिंग उभी राहिली. आता मी त्या रस्त्याला जायचे टाळतो. गेलो तरी 'घराकडे' पाहत नाही. कारण पाहिले, तरी तेथे 'माझे घर' नसते. जे असते ते 'कुण्या दुस-याचे घर' असते. नकळत डोळे पाणावतात. आणि मग डोळ्यांसमोरचे दॄष्य अंधूक होते. .. तिथे मला दिसतं 'माझं घर'... खिडकीत हनुवटी टेकवून, टेल्को मधून येणा-या बाबांची आतुरतेने वाट पाहणारा एक गोबरा निरागस चेहरा...
... ते घरही आता नाही, आणि तो चेहराही आता निरागस राहिलेला नाही !
मान फिरवून मी चालत राहतो...

सा रम्या नगरी महान् स नृपति: , सामन्तचक्रं च तत् ,
पार्श्वे तस्य च सा विदग्ध परिषत् , ता: चन्द्रबिम्बानना: ।
उद्वृत: स च राजपुत्र निवह: , ते बन्दिन: , ता: कथा: ,
सर्वं यस्य वशाद् अगात् स्मृतिपथं कालाय तस्मै नम: ॥

- भर्तृहरि ( वैराग्यशतक )


---

डिज्नीलॅंड (लॉस ऍंजेलिस) मधील मिनी माऊस च्या घराचे मी टिपलेले छायाचित्र. फेब्रुवारी २००७.