November 15, 2004

याला शिक्षण ऐसे नाव !

पूर्वपीठिका : आजवर माझा शिक्षण क्षेत्राशी अनेक प्रकारे संबंध आला आहे. घरचे वातावरणही शैक्षणिक. आजी-आजोबा विद्यालय/ महाविद्यालयात शिक्षक, तर आई शाळेच्या मुलांच्या शिकवण्या घेत असे. माझे शिक्षण बालवाडी (रानडे बालक मंदिर), प्राथमिक (भावे प्राथमिक शाळा), माध्यमिक (पेरूगेट भावे हायस्कूल), कनिष्ठ (स.प.) व वरिष्ठ महाविद्यालय ( शासकीय अभियांत्रिकी, पुणे ) असे झाले. गेल्या ७-८ वर्षांत माझा अभियांत्रिकी अभ्यासक्रमाशी विद्यार्थी ( ज्ञानार्थी आणि परीक्षार्थी ), शिक्षक ( अर्धवेळ ) आणि परीक्षक असा अनेक प्रकारे संबंध आला. या निमित्ताने मी सतत आपण 'काय' शिकतो, 'का' शिकतो, आणि 'कसे' शिकतो याचं चिंतन करत असतो. या विषयीचे काही विचार मांडायचे ठरवले आहे.
माझे असे प्रामाणिक मत आहे की जे वर्षानुवर्षे चालत आलेले आहे त्यात कोणताही बदल करण्याची मानसिकता आणि धैर्य शिक्षणक्षेत्रातील मंडळींपाशी नाही. शिक्षणाचा प्रसार आणि दर्जा या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली बाब 'quantity'शी निगडीत आहे तर दुसरी 'quality'शी. पहिली बाब आहे की शिक्षण अधिकाधिक लोकांपर्यंत कसे पोहोचेल, तर दुसरी बाब आहे ती म्हणजे जे शिक्षण लोकांना मिळत आहे, ते सुधारता कसे येईल, त्यास अधिक उपयुक्त आणि रंजक कसे बनवता येईल. माझा कटाक्ष या दुस-या बाबीवर आहे. किंबहुना माझा असा दावा आहे की दुस-या बाबीवर जर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित केले तर त्या सुधारित शिक्षणाचा प्रसार अधिकाधिक लोकांपर्यंत करणे सोपे जाईल.शिक्षणाचा प्रसार करण्यातील जे मुख्य अडथळे आहेत त्यांतील काही म्हणजे चांगल्या शिक्षकांचा तुटवडा, विद्यार्थ्यांमधे शिक्षण घेण्यासाठी आवश्यक असलेली आवड आणि ईर्षा यांचा अभाव, आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यात येणा-या अडचणी. यांपैकी पहिले दोन अडथळे शिक्षणप्रक्रीया सुधारित केल्याने पार करता येतील.
शिक्षण घेणा-या लोकांची रचना शिक्षणाच्या पाय-यांनुसार केली तर एक 'पिरॅमिड' बनतो. तळाशी प्राथमिक शिक्षण, त्यावर माध्यमिक, महाविद्यालयीन, पदवी आणि पदव्युत्तर इ. 'पिरॅमिड' रचनेनुसार प्रत्येक पायरीवर असलेल्या लोकांची संख्या जसे वर जाऊ, तशी कमी होत जाते. प्रत्येक पायरी संपल्यावर अथवा मध्यातही लोक शिक्षणापासून दूर जातात. प्रत्येक पायरी संपल्यावर आपण विचार केला की 'या पायरीवर मी काय मिळवले' तर त्याचे उत्तर काय मिळेल ?
मी काही उदाहरणे देऊ इच्छितो. गावाकडे असलेला एखादा सधन शेतकरी - शेतकी ज्ञानाव्यतिरिक्त त्याला लिहिणे-वाचणे यावे, भाषेचे ज्ञान हवे, मूलभूत गणित यावयास हवे. आजकालच्या जगात इंटरनेट-इ मेल इ. माहीत असल्यास फारच छान. हा सधन शेतकरी जेव्हा दहावीच्या परीक्षेस बसतो, तेव्हा तो काय शिकतो ? बखर, एस्किमो लोकांची जीवनशैली, पानिपतच्या तीन लढाया, अंतर्वर्तुळ आणि पायथागोरस थिअरम, आणि अणूची रचना ! बर हे जमले नाही तर एकच शिक्का : "दहावी नापास".
शिक्षण पद्धतीत असलेला एक भयानक दोष म्हणजे प्रत्येक इयत्तेत प्राप्त होणा-या शिक्षणाला - ज्ञानाला - साध्य न समजता, प्रत्येक इयत्तेकडे आपण पुढल्या इयत्तेत जाण्याचे प्रवेशद्वार म्हणून पाहतो.पुढील काही परिच्छेदात मी आजवरच्या शिक्षणात/परीक्षांत आढळलेल्या आणि खटकणा-या गोष्टींची उदाहरणे दिलेली आहेत. ही उदाहरणे म्हणजे बर्फखंडाचा केवळ एक अष्टमांश भाग आहे ! ही उदाहरणे प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत.

प्राथमिक शिक्षण:
१) रामदास स्वामी-रचित मनाचे श्लोक आणि गीता :
पहिलीत असताना मनाचे श्लोक पाठ करण्याची स्पर्धा असे. आपल्या लोकांना परीक्षा आणि स्पर्धेशिवाय दुसरे काही दिसतच नसावे. आणि उद्योग-धंदे नसल्यासारखे दिसेल ते पाठ करायचे. त्यामुळे आपल्या शाळा या 'पोपट' जन्माला घालणारी प्रसूतिगृहे बनली आहेत ! मला सांगा :
मरे एक त्याचा दुजा शोक वाहे ।
अकस्मात तोही पुढे जात आहे ॥
हा श्लोक शिकवायचे 'पहिली इयत्ता' हे काय वय आहे काय ? एकीकडे पाठ्यपुस्तकात 'फुलपाखरे' आणि 'झरा' यांचे धडे-कविता, आणि जोडीला मनाचे श्लोक !! एवढ्याने नाही भागले, तर गीतेचे अध्याय आहेतच ! गीतेचे अध्याय पाठ करण्याच्या पण स्पर्धा ! कृष्णाला जर कल्पना असती, की आपण अर्जुनाला सांगितलेले हे अध्यात्मज्ञान, पोपटांची स्पर्धा घेण्यासाठी, आणि त्या पोपटांच्या आयांना शेखी मिरविण्यासाठी उपयोगात येणार आहे, तर त्याने अर्जुनाची शिकवणी ताबडतोब बंद केली असती ! अर्थ राहिला बाजूला, आणि आम्ही निघालो पाठांतर करायला ! या कल्पना ज्यांच्या मुरमाड टाळक्यातून बाहेर पडल्या त्यांना समर्थांनी नक्कीच 'पढतमूर्ख' म्हणले असते...

२) विषय: इतिहास.
धडा : महाभारतातील 'भीमाचे गर्वहरण'
कथासूत्र: मारुती भीमाला वानराच्या रूपात भेटतो. तो रस्त्यात शेपटी पसरून बसला असतो. भीम त्याच्याशी उद्धट वर्तन करतो. मारुती भीमाला स्वत:ची शेपटी दूर करण्यास सांगतो, जे भीम करू शकत नाही. मग मारुतीचा भीमाला उपदेश इत्यादी...
माझ्या नम्र मतानुसार या धड्यातील लक्षात ठेवण्याचा भाग : ( तात्पर्य ) शक्तिवान व्यक्तीने शक्तीचा गर्व करू नये, नम्र रहावे, इ.
आणि परीक्षेतील प्रश्न :
गाळलेल्या जागा भरा : वानर रस्त्यात ... बसला होता. ( उत्तर : "शांत" ).
हा आमच्या शिक्षणाचा दर्जा !!

३) विषय: भूगोल
"नांदेड नाशिक अहमदनगर धुळे जालना लातूर". हे काय आहे ? ही यादी आहे महाराष्ट्रातल्या अशा जिल्ह्यांची, जिथे ज्वारी का कुठलेसे धान्य पिकते. अशीच एक यादी आहे गहू पिकवणा-या जिल्ह्यांची, आणि अशा अजून असंख्य याद्या. आम्हाला हा कचरा डोक्यात भरण्यास भाग का पाडण्यात आले ? धान्य समोरच्या वाण्याच्या दुकानात, नाहीतर ग्राहक पेठेत मिळते; फारच हौस आली, तर रविवार पेठ आहेच. एवढेच ज्ञान आम्हाला पुरेसे आहे. जगभरात कुठे काय पिकते आणि विकते हे सारे ओझे विद्यार्थ्यांच्या पाठीवर लादायला विद्यार्थी म्हणजे काय गाढवे वाटली काय ?

४) विषय: भाषा
प्रश्न: कोण कोणास म्हणाले ? "खाविंद, मी बिरबलांना मंदिरात जाताना पाहिले".
उत्तर : पहिला सरदार (का दुसरा का तिसरा देव जाणे) अकबरास म्हणाला. या पाठात तीन सरदार होते, त्यांची नावेही पहिला, दुसरा, आणि तिसरा सरदार अशीच होती. आता ही चहाडी पहिल्याने केली की दुस-याने, ते काय करायचे आहे ? पण नाही. आपल्याला काय शिकायचे आहे, हेच मुळी माहीत नाही ना ? मग सगळे पाठ करा !!

(क्रमश:)