December 5, 2004

बुजरा बांबू

एक बांबूचं बेट होतं. रोपं अजून छोटी होती. एक दादा त्यांची निगराणी करत. त्या बांबूंमधलाच एक होता 'बुजरा बांबू'. तसा रूढार्थानं तो 'बुजरा' नव्हता. तसा चांगला बोलका आणि वटवट्या होता, पण स्वभाव भिडस्त. स्वत:च्या फायद्याची गोष्ट निघाली की मागे सरणारा.

बांबूंचं आयुष्य मजेचं होतं. दिवसा ऊन खायचं आणि रात्री अंधाराची दुलई ओढून झोपून जायचं. भणाणता वारा त्यांच्याशी दंगामस्ती करायचा. वा-याची मोठी सुरेल शीळ बांबूच्या त्या बेटात घुमायची.

एके दिवस त्यांच्या त्या शांत आयुष्यात छोटीशी हालचाल झाली ! दादांबरोबर कोणी एक गृहस्थ आला होता. त्यांचं संभाषण ऐकून बांबूंना कळलं की तो गृहस्थ बोरूंसंदर्भात काही विचारत आहे. बुजरा बांबू खूष झाला ! त्याला वाटलं, आपण बोरू बनून कोण्या चिमुकल्या हातात जाऊ... बोरू दौतीत बुडतील, करकर आवाज करत मुळाक्षरं आणि सुवचनं पुस्तीत उमटतील... दादा जवळ आल्यावर 'मी मी' असा बांबूंनी एकच गलका केला. मग बुजरा बांबूही कुजबुजला "मी सुद्धा...". दादांनी ऐकलं. पण बाकीचे बांबू ओरडत असताना 'कुजबूज' ऐकणं फायद्याचं नव्हतं ! बुज-या बांबूचे काही सखे बोरू बनायला गेले.
दुस-या दिवशी बुजरा बांबू दादांना म्हणाला, "दादा, मला पण बोरू बनायचंय...".
दादा म्हणाले, "अरे वेड्या, मग कालच नाही का सांगायचं ? पाठवलं असतं तुला पण !".
मग जवळ येऊन म्हणाले, "आणि दोस्ता, तुझ्याइतका सुंदर बांबू आपल्या बेटात कोणी आहे ? येणारे सगळे जण हेच म्हणतात. मालकांनापण तुझं खूप कौतुक आहे!".
बुजरा बांबू मनोमन सुखावला. त्याने खुषीत शेंडा घुसळला. वा-यानं त्याची थट्टा-मस्करी केली.

बांबूच्या बेटात वा-याची शीळ घुमली.
दिवस लोटले.
बांबू जोमाने वाढत होते.

अशाच एका सकाळी कोण्या देवस्थानचे लोक आले. त्यांनी दादांना सांगितलं "चार चांगले उंच बांबू द्या". बुज-याची कळी खुलली. तो चांगला उंच होताच ! दादा जवळ आले. बुज-याचे काही सखे चवड्यावर ऊंच होत ओरडले "मी मी". बुजरा बांबू चवड्यांवर उभा राहिला नाही. त्याने ओठ मिटून घेतले.
दुस-या दिवशी बुजरा बांबू दादांना म्हणाला, "दादा, काल मला नाही पाठवलंत ?"
दादा म्हणाले, "अरे वेड्या, मग कालच नाही का सांगायचं की तू उंच आहेस ? पाठवलं असतं तुला पण !".
मग जवळ येऊन म्हणाले, "आणि दोस्ता, तुझ्याइतका सुंदर बांबू आपल्या बेटात कोणी आहे ? येणारे सगळे जण हेच म्हणतात. मालकांनापण तुझं खूप कौतुक आहे!".
बुज-या बांबूनं एक उसासा सोडला. तो काही बोलला नाही.

बांबूच्या बेटात वा-याची शीळ घुमली.
दिवस लोटले.

एक नवा दिवस उजाडला, आणि कोणी एक जण दादांना भेटायला आला. बोलण्यावरून कळलं की त्याला बासरीसाठी काही बांबू हवे होते ! बुजरा आनंदला. होतं ते चांगल्यासाठीच ! बुज-याच्या डोळ्यापुढे चित्र उभं राहिलं - तो एक बासरी बनला होता, आणि एक संगीताचा उपासक तीतून सप्तसूर आळवीत होता. बुज-याचे काही सखे बासरी बनण्यास गेले. बुजरा होता तिथेच राहिला.
दुस-या दिवशी दादा आले. बुजरा काहीच बोलला नाही.
मग दादाच म्हणाले, "दोस्ता, तुझ्याइतका सुंदर बांबू आपल्या बेटात कोणी आहे ? येणारे सगळे जण "...
बुज-या बांबूनं कान बंद केले.
दादांच्या कपाळावर आठ्या आल्या.

बांबूच्या बेटात वा-याची शीळ घुमली.
दिवस लोटले.

बांबूच्या बेटाच्या मालकांनी बाजूलाच फुलांची लागवड केली. येणारे जाणारे कौतुकाने फुलं पाहू लागले. एके दिवशी सगळे बांबू एक ट्रक मध्ये घालून दादांनी पाठवले. त्यातच बुजरापण होता. त्याला आता कशानेच फरक पडत नव्हता. बांबू एका बांधकामापाशी आणले गेले. वर येणा-या इमारतीच्या बाजूबाजूने बांबूंचा सांगाडा उभा राहिला. तळाला 'बुजरा' होताच. वा-याशी खेळायच्या ऐवजी आता सिमेंट आणि पाण्याची सवय झाली.
एक दिवस बुज-याला एका कामगार महिलेने झोळी बांधली. बुज-याची जबाबदारी वाढली. झोळीतल्या बाळाच्या बाळलीला पाहताना बुज-याला आठवलं त्याचं बालपण... ते बांबूचं बेट, वा-याची शीळ, ते सोबती... 'बोरू'पाशी आल्यावर त्याची विचारमालिका तुटली. त्याला कायम लहानच रहायला आवडलं असतं खरं तर... पण आपल्या विचारांतली व्यर्थता लवकरच त्याच्या ध्यानात आली.

पुढे ? बुज-यानं ही कथा पामराला येथपर्यंतच सांगितली...
पुढे काय झालं कुणास ठाऊक !
काही का होईना ! विझलेल्या आयुष्याची अखेर कुठेही आणि कशीही झाली तरी काय फरक पडतो ?