June 29, 2006

पुनर्जन्म

प्रिय वाचक-मित्रांनो,
एक वर्षाहून अधिक काळ चालू असलेल्या या ब्लॉग-प्रपंचाला काही महिन्यांपूर्वी अचानक खीळ बसली. या ब्लॉगवर नवे लेख आणि प्रतिक्रिया प्रकाशित होणे काही तांत्रिक कारणामुळे बंद पडले. बरेच प्रयत्न करूनही कोणताच उपाय चालेना, तेव्हा नाईलाजाने मी 'पामरस्मृति' हा नवा ब्लॉग सुरू केला.
आणि आज अचानक, ध्यानी-मनी नसताना, या ब्लॉगला नवजीवन मिळाले, गेल्या कित्येक दिवसांत वाचकांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांनी माझी मेल-बॉक्स तुडुंब भरली !
सर्व प्रतिक्रिया तर अजून वाचल्या नाहीत, पण या प्रतिक्रियांमध्ये काही वाचकांनी पुढला लेख लवकर लिहिण्यासाठी लकडा लावला आहे, तर काही जणांनी मैत्री करण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे. अपरिहार्य कारणांमुळे मी हे सारे आजवर वाचू शकलो नाही, आणि प्रतिसाद देण्याचाही संभव नव्हता. पण हे सारे प्रतिसाद वाचून जे समाधान झाले, ते शब्दांत सांगण्यासारखे नाही !! ही तांत्रिक अडचण समजून घेऊन, आपण माझ्यावर कोप धरला नसावा अशी आशा..

यापुढे 'पामरस्मृति' बरोबर येथेही लेख लिहिणे चालू ठेवीन .

आपल्या प्रेमाचा भुकेला,
पामर.

अहो आश्चर्यम् !

पामरावर परमेश्वर प्रसन्न झालेला दिसतो ! अथवा या ब्लॉगरूपी शिळेला प्रभू रामचंद्रांनी पदस्पर्श करून उद्धार केला असावा !!

June 27, 2006

फूल फुलताना ...

कारचे दार उघडून सागरने लॅपटॉपची बॅग आत ठेवली. सीटवर पाठ टेकून टायची गाठ सैल केली. उघड्या काचेतून थंड वारा लागला तेव्हा त्याला थोडेसे बरे वाटले. मनात विचारांचा कल्लोळ उठला होता. रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नल्स हिरवे-लाल रंग पालटत होते. पाय यांत्रिकपणे ब्रेक- ऍक्सिलरेटर ऑपरेट करत होते. गेल्या काही महिन्यांतल्या घटना डोळ्यासमोर चलतचित्राप्रमाणे सरकत होत्या...

वेगात आगेकूच करणा-या दुचाकी बाजारात कंपनीने नवी बाईक लॉंच केली होती. संपूर्ण युनिट एकच ध्यास घेऊन काम करत होते. माईलेज, पिक-अप, लुक्स, कंफर्ट - अनेक घटक विचारात घेऊन काम जोमाने चालले होते. या नव्या बाईकला मार्केटचा प्रतिसाद उत्तम मिळाला होता. वाढत्या स्पर्धेत टिकाव धरून कंपनीने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवले होते. हे यश साजरे करायला कंपनीने एक मोठी पार्टी आयोजित केली होती आणि तिथेच बिनसले होते ! डायरेक्टरनी यशाचे गमक म्हणजे 'तरुणाईला खेचणारा' बाईकचा 'सेक्सी लुक' असल्याचे आवर्जून नमूद केले. केवळ संबंधित विभागाच्या प्रतिनिधींना विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आले. सागरच्या युनिटमधे मात्र मोठीच निराशा पसरली होती. बहुतेक बाईकला वेग देणारे इंजिन असते, चाके असतात, हे टॉप मॅनेजमेंट विसरली असावी. 'कर्मण्येवाधिकारस्ते' प्रत्यक्षात उतरवणे किती कठीण आहे हे सागरला प्रथमच जाणवले ! विचारांच्या नादात गाडी घरापाशी आली तेव्हा सागर भानावर आला. ऑफिसच्या कटकटी उंबरठ्याबाहेरच सोडण्याचा तो नेहमी प्रयत्न करायचा...

दार उघडून नेहाने हसून त्याचे स्वागत केले.
लग्न होऊन पाच वर्षे झाली तरी प्रेम अजून ताजेतवाने होते.
'कसा काय गेला दिवस ?'
'झकास!'
'बा‍ऽबाऽऽ' चिमुकल्या सायलीने गळ्यात इवलेसे हात टाकले.
'काय म्हणते आमची चिमणी' ? सागरने लाडाने सायलीच्या गालगुच्चा घेतला.
"A man travels the world in search of what he needs and returns home to find it" किती खरंय हे वाक्य, सागरला जाणवले !
'अरे दिवसभर तिची भुणभुण चाललीये, तिला बागेत घेऊन जातोस का?'
'जातो की. तेवढे चहाचे इंधन टाक आमच्या टाकीत म्हणजे निघालो!'

सागरचे बोट पकडून सायलीची स्वारी बागेत निघाली. बागेत तिला तिच्याएवढे छोटे दोस्त मिळाले. लहान मुलांना काय, मैत्री करताना 'सोशल स्टेटस, फायनान्शिअल बॅकग्राऊंड, प्रोफेशन' असल्या भिंती आड येत नाहीत - सागरच्या मनात विचार आला. गुलाबांच्या एका ताटव्यापाशी बसून तो मुलांची किलबिल पाहत राहिला...

तासभर बागडून झाल्यावर सायली बाबांकडे आली आणि 'दमले' असे म्हणून त्याच्या मांडीवर आसन जमवले. एवढ्यात तिच्या चंचल डोळ्यांना मागच्या ताटव्यातले सुंदर गुलाब दिसले. 'अय्या कित्ती सुंदर आहेत ही फुलं' ती आनंदाने चित्कारली. पण त्या 'सुंदर' या शब्दाने सागरचा मनातल्या चुकीच्या तारा छेडल्या गेल्या... सायलीला जवळ घेऊन तो म्हणाला,
'बेटा, गुलाबाची फुलं सुंदर आहेतच. ती सगळ्यांनाच आवडतात. पण फुलं पाहतेस तेव्हा त्या फुलांना आधार देणारे डेख पहा. ते काटेरी दिसते न? तरीसुद्धा. ते खोड पहा. तेही सुंदर दिसत नाही न ? पण फूल फुलायला तेही लागतात... झाडाला जीवनरस आणून देणारी मुळं ? ती तर बिचारी जमिनीत राहतात - आपलं तोंड कायमचं लपवून...ती तर दिसतही नाहीत. दिवसभर राबणारे माळ्याचे रापलेले हात सुंदर दिसत नाहीत. पण बाग फुलवायला लागणारं पाणी तेच शिंपतात... त्यांचंही कौतुक कर'

सायलीला समजलं नाही की बाबा आज हे काय बोलतायत ! तिच्या चिमुकल्या मेंदूत झालेला विचारांचा गुंता सागरने तिच्या डोळ्यांत वाचला आणि त्याला आपली चूक समजली ! चटकन हसून तिचे केस विसकटून तो म्हणाला,
'तुला नाही समजलं ? तू लहान आहेस अजून. मोठी झालीस की समजेल !!'.

मग स्वतःशीच हलकेच उद्गारला 'कदाचित समजेल. कदाचित नाहीसुद्धा ! तसंही सगळ्याच मोठ्यांना थोडीच समजतं हे !'