May 10, 2009

पिंजरा आणि घर

नाही नाही, ’पिंजरा आणि घर’ हे टायटल थोडेसे दिशाभूल करणारे आहे ! पण विषय असा आहे -

मी लहान असताना आई बाबा मला आणि अर्चनाला ब-याच वेळेला पेशवे पार्क मधे घेऊन जायचे. तिथे ब-याच प्रकारचे प्राणीपक्षी दाटीवाटीने कोंबलेले असायचे ! हत्ती, पांढरा वाघ, चंडोल (हे त्या पक्ष्याचे खरे नाव होते की आम्हाला ते तसे वाटायचे कोण जाणॆ!) आणि गोल्डन पीझंट ही लक्षात राहिलेली काही खास नावे ! वरच्या बाजूला सारसबागेला लागून फुलराणी आणि घसरगुंड्या-झोपाळे ! मे महिन्याच्या सुटीत आई असेल तर रविवार सकाळ आणि बाबा पण असतील तर गुरुवार सकाळ या बेतात छान जायची !

तिथे वाघ-सिंह इत्यादि हिंस्र श्वापदांच्या पिंज-यामधे एक खास व्यवस्था असायची - ’आतला पिंजरा’. दुपारी प्राण्यांची जेवायची वेळ झाली की पिंज-यात खाणे ठेवायला, अथवा पिंजरा झाडून साफ करताना या प्राण्यांना ’आतल्या’ पिंज-यात हाकलायचे ! दोन्ही पिंज-यांमधे बाहेरून उघडता येणारे एक सरकते दार असायचे. बाबांनी मला खेळायला एक असाच पिंजरा बनवून दिला होता. ’ब्रुक बॉन्ड’ चहाच्या खोक्यापासून बनवलेला. पिंज-याच्या पूर्ण जाळीच्या भिंती, आतला पिंजरा, त्याचे सरकते दार, मुख्य दरवाजा, त्याला कडी !! अतिशय बारकाईने निरीक्षण करून हुबेहूब बनवलेले मॉडेल होते ते. पिंज-यात हवा खेळती रहावी म्हणून छपराला काही गोल आकाराची मोठी भोके सुद्धा होती. आम्ही त्याचा उपयोग फारच विनोदी प्रकारे करायचो ! ’चंडोल’ हा अर्चनाचा लाडका पक्षी आणि ’हत्ती’ मला जीव की प्राण ! आमच्या कडे खेळण्यातले अनेक चिमुकले प्राणी पक्षी होते, त्यात अर्थातच हे दोघेही होते. तेव्हा आमचे भांडण झाले की आम्ही एकमेकांवर सूड उगवायला बिचा-या ’चंडोल’ आणि ’हत्ती’ ला वाघाच्या पिंज-यात छपरातल्या भोकातून आत टाकायचो ! हा बालिशपणा आठवला की आता जाम हसू लोटते !

तसंच कुठल्याशा खोक्यापासून बाबांनी एक घर पण बनवले होते ! तो उद्योग तर कित्येक महिने चालू होता ! मी मधून मधून कामाचा progress review आणि follow up करत असे :) मॅनेजरचे पाय पाळण्यात दिसतात म्हणायला काही हरकत नाही :) ते घर तर फारच झकास होते. दुमजली, व्यवस्थित उघडणारी-मिटणारी सुबक खिडक्या-दारे, उतरते कौलारू छप्पर, घराच्या आतून आणि बाहेरून जिना, आतल्या जिन्यात प्रकाश यावा म्हणून भिंतीत बसवलेली जाळी, खिडकीची तावदाने, बाजरी काचेचा आभास निर्माण करायला लावलेला ब्लेडच्या आवरणाचा बटर पेपर ! विलक्षण कौशल्याने आणि विचारपूर्वक बनवलेले घर होते ते.

दर गुरुवारी असले काहीतरी करून घ्यायला बाबांच्या मागे माझी भुणभुण असे. आठवड्यातला एकच सुटीचा वार असूनही बाबा पण मोठ्या आवडीने हे उपद्व्याप करायचे.

आजच्या पिढीतले पालक मुलांना घेऊन मल्टिप्लेक्स मध्ये जातात, होटेलिंग आणि कपड्यालत्त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतात, महागडे विडिओ गेम्स घेऊन देताना पैशाचा विचार करत नाहीत. पण ते सुटीच्या दिवशी मुलांबरोबर तासनतास खर्च करून, ब्लेड-कर्कटक-कात्री आणि पुठ्ठे घेऊन मुलांना पिंजरा आणि घर बनवून देतात का ते माहीत नाही.

मला लहानपणी अंगात घातलेले कपडे विशेष आठवत नाहीत. कोणत्या होटेल मध्ये जायचो तेही आठवत नाही.
’पिंजरा आणि घर’ मात्र स्मृतीत कायमचे कोरले गेले आहेत.

---

’सेवा सहयोग’ या सेवाभावी संस्थेच्या 'School Kit Donation drive' या उपक्रमामध्ये मी सहभाग घेतला आहे. माझ्या कंपनीतल्या सहका-यांकडून वर्गणी गोळा करायला मला एक Drop-Box हवी होती. मी बाबांना ’बनवून देता का’ म्हणून विचारले. त्या निमित्ताने ’पिंजरा आणि घराची’ आठवण झाली !! आपल्याला 'School Kit Donation drive' ची माहिती येथे मिळेल. थोडक्यात सांगायचे तर - शाळेत जाणा-या आपल्या असंख्य चिमुकल्या दोस्तांना नवीन दप्तर-कंपास-वह्या विकत घेणे आर्थिक दृष्ट्या शक्य नसते. या लहानग्यांना हा आनंद मिळावा यासाठी हा प्रयत्न ! देशातल्या वा परदेशातल्या वाचकमित्रांना या स्तुत्य उपक्रमाला हातभार लावायचा असेल तर वेब-साईट वरील माहिती पहा अथवा माझ्याशी nikhilmarathe at gmail dot com येथे संपर्क साधा !