November 23, 2010

गिफ्ट

सकाळी सकाळी चिमणला जरा लवकरच जाग आली. पण अंगाचा उठायला विरोध होता. तडजोड म्हणून त्यानं एक डोळा उघडून पाहिलं. उजाडत होतं.
हं !
त्यानं एक लांबसा सुस्कारा सोडला.
आज काहीतरी स्पेशल आहे नं ? आज वाढदिवस !
म्हणजे तसं फार काही विशेष नाही - त्याचं एक मन त्याला सांगायचं. आपल्या निरर्थक आयुष्यातला जस्ट अनदर डे ! पण चिमणला उगाचच जरा सुखावल्यासारखं वाटलं ! लग्नानंतरचा पहिलाच वाढदिवस ! सवयीनं त्यानं हात लांबवला, पण बाजूला चिमणी नव्हती ! तो हिरमुसला. थोडा अंदाज घेतल्यावर त्याला स्वयंपाकघरात चाहूल वाटली. पण आतापर्यंत उघड्या असलेल्या डोळ्याने सुद्धा असहकार पुकारल्याने त्याने परत डोक्यावर पांघरूण ओढले.

एकदमच फोनची रिंग वाजल्याने त्याला जाग आली. आई बाबांचा फोन होता. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. इतके वर्ष एका घरात राहून कधी ’हॅपी बर्थ डे’ म्हणलं नसेल ! वाढदिवस ही गोष्ट या घरासाठी फारच किरकोळ होती. पण आता घरापासून दूर आल्यावर फोन मात्र आठवणीनं केला होता. आज वर्किंग डे असल्याने फोनवर गप्पा जरा आटोपत्या घेतल्या आणि फोन ठेऊन शेवटी आळस झटकून पांघरूण फेकून चिमणची स्वारी उठली.

स्वयंपाकघरात ओट्यावर पसारा मांडून चिमणीची स्वयंपाकाची धांदल चालली होती. "हॅपी बर्थ डे" नं तिनं स्वागत केलं. "मी आज शिरा करतिये, पूजेच्या वेळी नैवेद्य दाखव". चिमणनी खुर्चीत बैठक जमवली आणि पेपर वर नजर टाकली. ऍज यूज्वल, कुठल्याच बातमीनं आनंद व्हायचं काहीच कारण नव्हतं ! तरी पण उपचार म्हणून त्यानं पानं उलटली. मग घरभर नजर फिरवली. तेच घर. नेहमीचं. त्याच खोल्या, त्याच वस्तू, तोच पसारा. त्याच्या वाढदिवसाची या मंडळींना काही वार्ता नव्हती. त्यांना काही स्पेशल वाटत नसावं. त्यालासुद्धा. पण वाटावं, असं वाटत होतं ! खरं तर आपल्याला काय हवंय हे त्याला नीटसं उमगत नव्हतं. But something was amiss ! चहाचे घुटके घेताना त्याला आठवलं - केस कापायला झालेत. म्हणजे तसे बरेच दिवस झालेच होते, पण आज वाढदिवसाच्या दिवशी जरा बरा अवतार असावा असं त्याला वाटलं. मग केस कापायच्या मोहिमेवर स्वारी निघाली. तासाभरात परत येऊन मग ब्रेकफास्ट आणि बाकी आवरून आरामात ऑफिसला निघावं असा त्याच्या डोक्यात प्लॅन झाला.

दिवस रोजच्यासारखा सावकाश उगवत होता. कोप-यावरचा फळवाला दुकान मांडत होता. "येताना घेऊया थोडी फळं" त्यानं ठरवलं. सलूनपाशी पोचल्यावर आत तीन चार गि-हाइकं आधीच येऊन बसलेली दिसली. चिमण्याचा चेहरा त्रासिक झाला. आज सुटीचा दिवस नसताना पण गर्दी कशी ! आत गेल्यावर सेटीवर बसायला जागा नव्हती. एक गृहस्थ आलकट पालकट मांडी घालून पेपर वाचत बसले होते. ते जरा आटोपशीर बसते तर चिमणला बसायला जागा झाली असती. चिमणचे डोके एकदमच आऊट झाले. तसं "जरा सरकून घ्या" म्हणून सांगता आलं असतं. पण प्रश्न बसण्याचा वा उभं राहण्याचा नव्हता. प्रश्न होता ’तत्त्वाचा’. आपल्यामुळे इतरांची गैर सोय होते हे समजत कसं नाही लोकांना ! नो सिविक सेन्स. ’लोकांना चाबकाने मारले पाहिजे’ या त्याच्याच जुन्या मताशी तो परत सहमत झाला. खरंतर ’तत्वाच्या’ प्रश्नांनी आयुष्य उगाचच अवघड बनतं ! पण कळणं आणि वळणं यातला फरक त्यानं एव्हाना स्वीकारला होता. मग ’तुला *** गळवं होतील, बसता पण येणार नाही’ असा सणसणीत शाप त्यानं मनोमन ’मांडी’वाल्याला दिला. दुकानात एक दोघे खोकत होते ! खोकताना रुमाल वगैरे वापरायची आपल्यात पद्धत नाहीये. रेडिओवर आणि टीव्ही वर ’शिंकताना आणि खोकताना रुमाल वापरा’ असं किती वेळा का सांगोत ! आपला बाणा सोडायचा नाही. दुखणी कशी आपुलकीनी सर्वांना वाटली पाहिजेत. चिमण्याचा मूड खराब व्हायला छान सुरुवात झाली होती ! त्यात अजून भर - त्याला लक्षात आलं - सलूनवाले अण्णा आज नाहीयेत. दुसरे ’आप्पा’ पण नाहीयेत. एक नवशिका पो-या - चिमण त्याला ’बावरा’ म्हणायचा - आणि एक अजून वेगळाच माणूस होता. चिमणनं डोक्याला हात लावला. आज कुठून केस कापायची दुर्बुद्धी झाली असं त्याला वाटलं. चिमणला ’बाव-या’ ची दया यायची. त्याच्या हातात कौशल्य नव्हतं. बरेच दिवस सलून मधे राहून त्याला केस कापणं काही जमत नव्हतं. त्यामुळे मालकाचा राग आणि सर्वांची चेष्टा यांचा तो ’सॉफ्ट टार्गेट’ होता. त्याची लोकांनी फिरकी घ्यायला सुरुवात केली की चिमणच्या मनाला यातना व्हायच्या. त्याला काम जमत नसेल तर काढून टाकावं. पण असं रॅगिंग त्याला सहन व्हायचं नाही. सेटीवर तेच पेपर पडले होते. त्यांकडे नजर पण टाकावीशी वाटेना. शून्य नजरेने तो इकडे तिकडे पाहत राहिला. वेल, द डे वॉज स्पॉइल्ट...

शेवटी त्याची पाळी आली आणि तो खुर्चीवर जाऊन बसला. त्या नवख्या माणसाने "बारीक करायची ना" वगैरे विचारून सुरुवात केली. तेवढ्यात त्याला लक्षात आलं - शेजारच्या खुर्चीवरती गेल्या तासाभरापासून कटिंगचे एकच गि-हाईक होते आणि बाव-याला अजून पल्ला नजरेत येत नव्हता ! मग त्यानं चिमणचं डोकं सोडलं, आणि बाव-याला मदत करायला घेतली. हा नवा प्राणी कामात चांगला वाटत होता. त्यानं बाव-याला सांभाळून घेत गि-हाइकाचे ’डोके ठिकाणावर’ आणले आणि मग चिमणकडे मोर्चा फिरवला. चिमणची आठवड्याची दाढी पण वाढली होती. मग त्याच्या डोक्यात विचार आला - जरा फ्रेंच बिअर्ड ट्राय करावी. चिमणी ब-याच दिवसांपासून मागं लागली होती. मग नवीन अवतार धारण करून चिमण घरी पोचला. आता फळं वगैरे घ्यायला वेळ नव्हता.

घराला कुलूप होतं. चिमणी ऑफिसला गेली होती. चिमणला आता कशातच रस वाटेना. टेबलावर डब्याचे पदार्थ बनले होते. आंघोळ पूजा आटोपून, डबा भरून चिमण ऑफिसला निघाला. रोजच्यासारखा.

ऑफिसमधे चिमणनं आपला वाढदिवस कोणाला सांगितला नव्हता. त्याला संकोच वाटायचा. ऑफिसमधे ब-याच लोकांनी ’दाढी’ नोटिस केली आणि कॉंप्लिमेंट्स पण दिल्या! दिवस नेहमीप्रमाणं पुढे सरकत होता. चहा, जेवण, डुलक्या. रोजचंच सगळं. नथिंग स्पेशल. ’बर्थ डे’ च्या ब-याच मेल्स आणि एस.एम.एस. आले होते. तसा लग्नानंतरचा हा त्याचा पहिलाच वाढदिवस. त्यामुळे "आज काय स्पेशल" असं प्रत्येकानं विचारलं होतं ! व्हॉट स्पेशल ? ****. तो "स्पेशल" हा शब्द चिमण्याला छळायला लागला.

मग त्यानं कामात मन रमवलं. संध्याकाळी चहाला सगळे जमले तिथे टीम मधल्या कुणाला तरी कुणकुण लागली ! चिमण्याची ही टीम तशी नवीन. एक वर्षापूर्वीच सुरू झालेली. पण अतिशय घट्ट आणि उत्साही. मग केक बीक आणून जोरात सेलिब्रेशन झालं. चिमण्याच्या ’स्प्लिट’ माईंड मधलं एक हरखलं. "आज काय मग संध्याकाळचा प्लॅन ? आज काय गिफ्ट मिळाली?" सगळ्यांनी गिल्ला केला. चिमण्यानं गुळमुळीत हसून "आहे सरप्राईज !" म्हाणून सांगितलं. काम आटोपलं आणि चिमणा रिक्त मनानं घरी पोचला. कुलूप उघडून घरात आला, पण घरानं त्याचं थंडच स्वागत केलं. चिमणी यायला अवकाश होता. मग चिमण्याने देवळाची वाट धरली. मनाला हमखास शांती देणारी ही जागा. तिथे बराच वेळ बसून, प्रार्थना करून चिमणा घरट्याकडे परतला. या खेपेला त्याला कुलूप उघडायला लागले नाही. चिमणीने हसून दार उघडलं आणि एक सुंदर फुलांचा गुच्छ हातात देत स्वागत केलं. पण उमललेल्या फुलांचा गुच्छ पाहूनही चिमण्याची कळी खुलली नाही. त्याने शोधक नजरेने कुठे गिफ्ट दिसतंय का असा कानोसा घेतला. मग त्याला स्वत:च्या पोरकटपणाचा अजूनच राग आला.

रात्री चिमणा चिमणी जेवायला बाहेर पडले. जेवताना चिमण्याचं मन हरवलं होतं. निरर्थक विषयांवर गप्पा, आजूबाजूच्या टेबलांवरच्या माणसांचं निरीक्षण आणि समोरचं खाणं चिवडणं संपवून दोघं घरी आले. "तुझं काय बिनसलंय आज?" चिमणीनं ब-याच वेळा विचारलं. चिमण्याकडे उत्तर नव्हतं. बट यस, नथिंग वॉज स्पेशल. त्याच्या दोन मनांचे तरी अजून कुठं एकमत होत होतं ! दिवस संपला होता तसाही. दिवा मालवून चिमण्याने बिछान्यावर अंग टाकलं. अजून एक नॉट-सो-स्पेशल दिवस मावळला.

दिवस उगवला. कालचे चोवीस तास एक मळभ बनून चिमण्याच्या मनावर दाटले होते. त्याला उठावंसं वाटेना. त्यानं अनिच्छेने डोळे घट्ट मिटून घेतले. अचानक झुळुक यावी तसा एक विचार त्याच्या मनावर फुंकर मारून गेला. कंग फू पांड्याच्या - ’पो’ - च्या बाबांचा आवाज होता तो - "To make something special, you just have to believe it's special..."

चिमणच्या अंगावर एक छानशी शिरशिरी आली."There is no special ingredient. It's just you".

It's just you...

चिमण्याच्या मनावरचं मळभ क्षणात विरलं.
वाढदिवसाची गिफ्ट - बिलेटेड का होईना - त्याला मिळाली होती.