December 13, 2011

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"

घंटेचे टोले झाले.

शाळा सुटली.

वर्गा वर्गा मधून मुलांचे थवे बाहेर पडले.

कोणी रिक्षावाल्या काकांच्या मागे पळाले. कोणी आई बाबांबरोबर सायकल/ स्कूटर वर बसले.

मंदार आणि अभिजित गप्पा मारणा-या आपापल्या आयांच्या मागे पुढे राहत, पाठीवरची दप्तरे उडवत, मस्ती करत घराकडे निघाले.

अभिजित चे घर आधी यायचे. तिथवर आले तरी आयांच्या गप्पा संपेनात. मग अभिजित ची आई म्हणली, "अहो मंदारच्या आई, घरी या ना. चहा घेऊन पुढे जा".

चहाबरोबर शि-याच्या बशा आल्या. थोड्या वेळाने मंदार आईच्या कानाला लगटून लाजाळूपणे काहीतरी कुजबुजू लागला. आईच मग म्हणली, "अरे मोठ्याने बोल ना, असं कानात कानात काय चाललंय ?"

"आई, या शि-याचा रंग असा का आहे" ?

"असा म्हणजे काय ? त्यात केशर घातलंय".

"मग आपण केशर का नाही आणत ? मग आपला पण शिरा चांगला होईल".

आई ला मेल्याहून मेल्यासारखं झालं. "बर, पुढल्या वेळी घालू या" असा तह करून आईने गप्पा आटोपत्याच घेतल्या.

आईने घराची कडी काढली आणि मंदारच्या पाठीत हलकासा धपाटा बसला.

"अवलक्षणी कार्ट्या, घरी शिरा केला की हात लावत नाहीस आणि आता डोहाळे लागलेत नाही का ? मागच्या आठवड्यात श्रीखंड केलं होतं त्यात केशर नाही तर काय रंगपंचमीचा रंग घातला होता का ? तेव्हा श्रीखंड पांढरं का नाहीये म्हणलास ना ?"

"अशीच अब्रू टांगा आमची वेशीवर. मुलांना घरात खायला प्यायला तरी देतात की नाही असं वाटायचं!"

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"


---


पंचवीस वर्षांनंतर


---


आई संध्याकाळची भाजीला बाहेर पडली होती. एकदम "हॅलो काकू" ऐकून आईनं वळून पाहिलं. अभिजित. ओळखायला जरा वेळच लागला !

"अय्या अभिजित नाही का तू, अरे किती बदललायस ! ब-याच दिवसात दिसला नाहीस कुठे ?"

"काकू मी ऑन साईट होतो, गेल्याच वर्षी परत आलो."

"अरे वा, तुमच्या पिढीचं हे एक छान आहे. इतक्या तरूण वयात जग बघून होतंय!"

"मंदार काय म्हणतोय? तो सध्या अमेरिकेला आहे ना? आमचा फ़ेसबुक वर कॉन्टॅक्ट असतो मधून मधून".

"हो, तो याच वर्षी गेलाय तिकडे. आता जरा स्थिर स्थावर झालाय असं म्हणतोय. आमचं काय फोन वर बोलणं होतं आठ पंधरा दिवसांत. एक तर ते दिवस रात्रीचं गणित आणि इंटरनॅशनल कॉल वर जास्त वेळ बोलायचं जिवावर येतं बाई आम्हाला!"

"का बरं ? कॉलिंग कार्ड नाही का वापरत?"

"कॉलिंग कार्डच आहे पण तरी उगाच डॉलर कशाला फोन वर खर्च करायचे!"

"नाही तर मग skype वापरा! घरी कंप्यूटर आहे ना ? ते तर फुकटच पडतं!"

"हो तो तर घेतलाय नवा मागच्याच वर्षी. हे तू काय म्हणलास ते विचारीन त्याला. मंदार म्हणजे तुला माहीतच आहे. एक नंबर चा उधळ्या आहे. असलं काही माहीत नको करून घ्यायला त्याला. विचारते आता !"

अमेरिकेतली शनिवार रात्र पुण्याला फोन करायला सोयीची. दोन्ही कडे निवांतपणा असतो.

ख्याली खुशाली आटोपल्यावर आईने विषय काढला.

"अरे तुझा मित्र अभिजित भेटला होता"

"हो, हो, त्याने पिंग केलं होतं मला आज सकाळी"

"अरे गधड्या, तो काय सांगत होता - ते कॉम्प्युटर वर स्वाईप का काहीतरी असतं त्यातून फुकट बोलता येतं म्हणून! आणि तुला काय डॉलर वर आलेत काय ? घरी तो कॉम्प्युटर घेऊन ठेवलायस महागातला तो काय पूजा करायला ? मी म्हणलंच त्याला, आमच्या मंदार ला असलं काही नको पहायला..."

"आई ... आई ... आई... तुझी आगगाडी थांबव.

एक तर त्या सॉफ्टवेअर चं नाव skype असं आहे. आणि मला ते चांगलं माहीत आहे. पण ते हवा पाण्यावर नाही चालत. त्याला इंटरनेट कनेक्शन लागतं.

तुम्ही घरी चांगलं असलेलं इंटरनेट कनेक्शन काढलंत - कश्श्याला हवं म्हणून. आणि वर अभिजित ला जाऊन सांग मला काही माहीत नसतं म्हणून".

"कुठे न्यायची सोय नाहीये तुला !"

:)