August 28, 2020

पामराचा पॉलिटिकली करेक्ट गणेशोत्सव

आपल्या चातुर्यासाठी आणि शहाणपणासाठी श्री चतुरक जगप्रसिद्ध आहेत हे आपणास ठाऊक आहेच. 

भाद्रपद शुद्ध कुठल्याश्या तिथीला दुपारी श्री चतुरक विश्रांती आणि ध्यानधारणा करत असताना अचानक फोन वाजला. फोनवर पामर बोलत होता.

"बोल पामरा". 

पामर उवाच : बा चतुरका ! तू सणवार करत नाहीस हे ठाऊक आहे, तरी पण गणपती उत्सवाच्या शुभेच्छा! या वर्षी मी गणपतीसाठी पुस्तकांची सजावट करणार आहे. तुझा व्यासंग दांडगा, म्हणून 'कुठली कुठली पुस्तके घेऊ?' असं तुझं मार्गदर्शन घ्यायला फोन केलाय. 

चतुरक: अरे, तू प्रवीण तरडे यांची बातमी वाचलीस का?

पामर: नाही. काय आहे बातमी ?

चतुरक:  त्यांनी पण गणपतीसाठी पुस्तकांची सजावट केली होती. त्यांनी काय केले, की गणपतीची मूर्ती ज्या पाटावर वा चौरंगावर ठेवली होती त्याच्या चहू बाजूंनी पुस्तके ठेवली होती. त्या पाटाच्या खाली त्यांनी भारतीय संविधानाची प्रत ठेवली होती. पण त्यामुळे संविधानाचा, डॉ. आंबेडकरांचा, घटना समितीचा, भारताचा, भीम चळवळीचा, इ. अनेक गोष्टींचा अपमान झाला. त्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडीमार झाला. मग त्यांनी माफी मागितली. इत्यादी.

पामर: अरे बापरे. करायला गेले एक आणि झाले भलतेच ! 
अरे पण मी पूर्वी एक कथा वाचली होती. न्या. म. गो. रानडे यांच्याकडे एक ख्रिश्चन गृहस्थ काही कामानिमित्त आले असताना त्यांना दिसले की काही पुस्तके रचून ठेवली होती आणि त्यात बायबल सर्वात वर होते आणि भगवदगीता सर्वात खाली होती. त्यांना यावरून चिडविल्यावर रानड्यांनी असे सुचवले होते की गीता सगळ्याचा पाया आहे, म्हणून ती सर्वात तळास ठेवली आहे, अशी काही तरी ... 

चतुरक: होय. पण ती खूप जुनी गोष्ट आहे. आता काळ बदललाय.  आजकाल सगळ्यांना नाही, पण काही लोकांना चहू बाजूंनी विचार करूनच बोलायला लागतं. "रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग" असं संत तुकाराम महाराजांचं वचन आहे. शिवाय रामदास स्वामींनी "अखंड सावधान" राहायला सांगितले आहे. 

पामर: बरं झालं तू ही बातमी सांगितलीस. मी असं करतो, संविधान गणपतीच्या वर एका फळीवर ठेवतो. 

चतुरक: छे छे! भलतेच! कुठल्याही मूर्तीच्या वर काही ठेवायचे नसते. तसं शास्त्र आहे. 
शिवाय मग तो गणपतीचा अपमान होऊ शकेल. गणपती ही हिंदू देवता असल्याने तो हिंदू धर्माचा, कडव्या हिंदुत्वाचा, झाल्यास तर गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळकांचा किंवा भाऊ रंगारी यांचा (हा स्वतंत्र वाद आहे!), स्वराज्याचा, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, वाघनखांचा इ.अपमान होऊ शकेल. पूर्ण इम्पॅक्ट अनॅलिसिस करावा लागेल.

पामर: गुड पॉईंट. मी संविधान सरळ गणपतीच्या बाजूला ठेवतो.

चतुरक: इतकं सोपं नाहीये ते. संविधान बाजूला ठेवलं तर त्यास मधोमध नसून बाजूस ठेवल्याचा, म्हणजे कमी महत्व दिल्याचा मुद्दा येतो. शिवाय तुला डावा हात 'धुता' आणि उजवा हात 'खाता' हे कदाचित ठाऊक असेल.

पामर: हो. पँडेमिक मध्ये टॉयलेट रोल संपले तेव्हा आठवलं. 

चतुरक: तर गणपती किंवा संविधान डावीकडे किंवा उजवीकडे ठेवले तर त्यातल्या एकाचा अपमान होऊ शकतो.

पामर: अरे, मग काय माझ्या डोक्यावर ठेऊ का काय संविधान !

चतुरक: लेट मी थिंक. नाही. नाही. नाही. त्यात पण धोका आहे. हे बघ. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत ब्राह्मणाला समाजाच्या डोक्याची उपमा दिली आहे. त्यामुळे असा वाद होऊ शकतो की संविधान डोक्यावर ठेऊन तू अप्रत्यक्षपणे ब्राह्मणवाद, ब्राह्मण्य, मनुवाद, वर्णवर्चस्ववाद यांचा पुरस्कार करतो आहेस.

पामर: माय गॉड ! काय जबरदस्त प्रभुत्व आहे तुझं मराठी वर! आणि मराठी मध्ये हे सगळे शब्द आहेत, हे मला माहीतच नव्हतं. मला वाटलं फक्त इंग्लिश मध्ये misogynistic, chauvinistic, racist, xenophobic, sexist, homophobic असे विपुल शब्द आहेत, जे वापरून एकमेकांना नामोहरम करता येतं !

चतुरक: थिंक ग्लोबल. 

पामर: ते करतो नंतर, पण हे सगळं ऐकून मला काय आठवलं सांगू ? ती वडील, मुलगा आणि गाढव यांची गोष्ट - ऐकावे जनाचे, करावे मनाचे!

चतुरक: ती गोष्ट लिहिली गेली तो काळ वेगळा होता. ती आता विसर. आणि माझ्याशी बोललास ते ठीक. इतर कुणास सांगू नकोस. नाहीतर तू गणपती किंवा संविधान यांची गाढवाशी तुलना करतोयस असा अर्थ झाला, तर अनर्थ होईल ना?
लोकशाहीचा मंत्र आहे, ऐकावे जनाचे, करावे बहुमताचे.

पामर: मी यावर नवीन गोष्ट लिहून या तत्वाचा प्रसार करीन. पण मग आता मूळ प्रश्नाचं काय ? असं करतो, संविधान ठेवतच नाही सजावटीमध्ये ! ना रहेगा बास, ना बजेगी बासुरी!

चतुरक: हः ! इतकं सोपं वाटलं ? अरे, तू इतर अनेक पुस्तकं ठेवलीस, पण संविधान वगळलस, तर तू संविधानाचा अनुल्लेखाने मारून अपमान करतोयस असे नाही का होणार ?

पामर:  (हताश !) मग असं करतो, गणपतीच राहूदे, नुसतेच संविधान ठेवतो! गणपतीला होपफुली राग येणार नाही.

चतुरक: अरे पामरा, तुला समजत कसे नाही? इतकं सोपं नाहीये, सांगितलं ना? थिंक थ्रू . गणेश उत्सवात तू संविधान ठेवलंस पाटावर, तर त्याचा अर्थ असा होतो की तू धर्मनिरपेक्ष संविधानाला भगवा रंग देतोयस! हा धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सहिष्णुता यांचा द्रोह होईल. 
 
पामर: ( अतिशय शांत, तटस्थ, स्थितप्रज्ञ, विरक्त, निर्वाण अवस्थेत ) समजलं. मी या वर्षी गणपतीच बसवत नाही. त्या ऐवजी मनोमन नामसाधना करतो. 
 
चतुरक: वा! 
आता तू पामर राहिला नाहीस. 
तू या विलक्षण वैचारिक आणि भावनिक घुसळणी मधून परिपक्व, ज्ञानी झालास. 
हे करताना तू लौकिक आणि पारलौकिक अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालास. 
लौकिक जगात तू धर्माचा त्याग करून धर्मनिरपेक्षता, बुद्धिप्रामाण्यवाद, विज्ञानवाद, इत्यादीची पताका खांद्यावर घेतलीस तर पारलौकिक जगात तू सगुणाचा त्याग करून निर्गुणाचा संग केलास. स्थूलातून सूक्ष्माकडे गेलास.
धन्य झालास, पामरा!