October 19, 2004

पण लक्षात कोण घेतो ?

मागच्या आठवड्यात COEP/PIET मध्ये परीक्षा शुल्क भरायला गेलो होतो.
संपूर्ण प्रक्रिया याप्रमाणे :
१. भांडारामध्ये जाऊन फॉर्म आणि चलन विकत घेणे.
२. फॉर्म भरणे. यात एक रकाना - माझा BE चा University Seat Number होता !
३. रस्ता (मुंबई-पुणे महामार्ग) ओलांडणे. हातपाय न मोडता रस्ता ओलांडला तर-
४. फॉर्मवर विभाग प्रमुख आणि प्रकल्प (project!) गाईड यांची स्वाक्षरी घेणे.
५. रस्ता ओलांडणे. हातपाय न मोडता रस्ता ओलांडला तर-
६. Accounts विभागात जाऊन नमुना चलन पाहून तुमचे चलन भरणे.
७. परीक्षा विभागात जाऊन फॉर्म तपासून घेणे.
८. बॅंकेत जाऊन पैसे भरणे.
९. पैसे भरल्याची पावती फॉर्मला जोडून फॉर्म परीक्षा विभागात नेऊन देणे.

अशी 'नवविधा' भक्ती झाली, की मग परीक्षारूपी परमेश्वर प्रसन्न होईल अशी आशा बाळगायची ! अर्थात मला याची सवय आहे. मी ( आणि माझ्या सहाध्यायांनी ) हे सारं, ८ वेळा परीक्षाशुल्क आणि ४ वेळा महाविद्यालयाचं वर्षाचं शुल्क, यासाठी केलं आहे ! कदाचित नव्या अभ्यासक्रमात, हे सारं चटकन कसं करावं, यासाठी 'time management' शिकवतील !

October 18, 2004

हॉर्न ओके प्लीज !

स्थळ : जंगली महाराज रस्ता, मॉडर्न विद्यालयासमोर.

वेळ : सकाळी ११ वा.

प्रसंग : रस्त्यावरून एक PMT बस चालली आहे. बसच्या मागून-डावीकडून एक मोटरसायकलस्वार येत आहे. त्याला आपण 'पहिला' म्हणू. त्याच्यामागून एका मोटरसायकलवर दोघेजण येत आहेत. पैकी चालवणा-याला आपण 'दुसरा' म्हणू. मॉडर्न विद्यालयासमोरील बस-थांब्याजवळ बस थांबते. ( थांब्याजवळ म्हणजे थांब्याच्या समोर, पण रस्त्याच्या मध्यात ! ). बस मधून उतरणारे उतारू आणि चढणारे चढारू यांची एकच धावपळ होते. समोर लोकांची गर्दी झाल्यामुळे 'पहिला' थांबतो. 'पहिला' वाटेत थांबल्यामुळे 'दुसरा'ही थांबतो ! उगाचच थांबायला लागल्यामुळे 'दुसरा' जोर-जोरात हॉर्न वाजवतो. पहिला रागाने मागे वळून पाहतो.

(वि)संवाद :

पहिला : का रे उगाच कशाला हॉर्न वाजवतो ?
दुसरा : तुला काय करायचंय ? रस्ता तुझ्या मालकीचा का ? समोर बघ.
पहिला : मग काय तुझ्या मालकीचा का ?
दुसरा : जास्त शहाणपणा आला आहे का ?
पहिला : मला शहाणपणा शिकवतोस काय ?
दुसरा : ( पुढे येउन ) थांब दाखवतो तुला...
पहिला : दाखव ना काय दाखवायचंय ते...

'पहिला' आणि 'दुसरा' यांना असे लक्षात येते की खाली उतरून मारामारी करणे फारसे हिताचे नाही. मग दोघेही आपापल्या गाड्यांवरूनच दम देतात, मग थोडे पडते घेतात.

पहिला : समोर दिसतय बस उभी आहे, लोक चढतायत, आणि हॉर्न कशाला वाजवतोस ? काय अंगावर गाडी घालू काय लोकांच्या ?
दुसरा : तो बसवाला - रस्त्यात मधे गाडी उभी करतोय. त्याच्या अंगावर हॉर्न वाजवतोय...
पहिला : आधीच इतका आवाज. त्याला काय हॉर्न ऐकू जाणार ? बहिरा करतो काय लोकांना ?

मागून येणारे वाहनचालक भांडणामुळे थांबलेले असतात. ते सगळे आपापले हॉर्न वाजवून 'पहिला' आणि 'दुसरा' यांना पुढे जाण्यास भाग पाडतात.

पहिला : ( मनात ) *** फुकट हॉर्न वाजवतोय. कशी ** मारली ***** ...
दुसरा : ( मनात ) *** माजलाय फार. म्हणे हॉर्न कशाला वाजवतो ! दहा वेळा वाजवीन !

वाहतूक 'सुरळीत' होते !

पार्श्वसंगीत : ( 'बाई मी विकत घेतला श्याम' ची चाल वापरावी. रीमिक्स केल्यास दुधात साखर ! )

फुकट फोडले कान, बाई मी फुकट फोडले कान ।
जन्मभरीच्या श्वासाइतके वाजविले मी हॉर्न ॥
। प्रवेश समाप्त ।
। ( धुराचा ) पडदा पडतो ।